फसवणूक झाल्याची एक तक्रार,अन् सात जणांची टोळीच जाळ्यात..

आरोपींनी गेल्या दहा वर्षापासून महाराष्‍ट्रासह ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यासह इतर अनेक राज्यातील बेरोजगार मुलांची फसवणुक केली आहे.
Nanded - Hingoli Police Trapped News
Nanded - Hingoli Police Trapped News

नांदेड- हिंगोली ः भारतातील सुशिक्षित तरूणांना रेल्वेसह इतर विविध विभागात नोकरीचे अमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणुक करणाऱ्या टोळीला हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि वसमत पोलिसांनी अटक केली आहे. (A complaint of fraud, a gang of seven people trapped)  टोळीतील सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून विविध विभागाची बनावट कागदपत्रे, ओळखपत्रे, नियुक्ती पत्रे, एटीएम कार्ड, मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

तसेच बॅंकेच्या विविध खात्यातील अकरा लाख रुपये गोठविण्यात आले आहेत. आठ लाखाची कार, रोख ५६ हजार, पन्नास हजाराचे सात मोबाईल असा एकूण २० लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी ही माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. (Nanded And Hingoli Police)  हिंगोलीचे पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस अधीक्षक यतिष देशमुख, पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, वसमतचे पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.

वसमत (जि. हिंगोली) पोलिस ठाण्यात तालुक्यातील एका युवकाने फसवणुक केल्याची तक्रार दिली.  संतोष बनवारीलाल सरोज (रा. बोडेपुर, ता. मच्छली, जि. जोनपुर, उत्तर प्रदेश) याने २०१८ मध्ये रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून दहा लाख रुपये घेऊन फसवणुक केल्याची तक्रार  १३ मे रोजी दिली होती. त्यानुसार वसमतला फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची दोन पथक कार्यरत करण्यात आले.

एक आरोपी ताब्यात, अन टोळी जेरबंद..

एका पथकाने ९ जून रोजी नांदेडच्या रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून रविंद्र उर्फ राबिंद्र दायनिधी संकुवा (वय ४६, रा. ओडीसा, हल्ली मुक्काम काटेमान्नीवली, ता. कल्याण, जि. ठाणे), ॲड. नरेंद्र विष्णुदेव प्रसाद (वय ५५, रा. लयरोपरूवार, ता. कोपागंज, जि. महू, उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेऊन आधिक तपास केला असता त्यांनी भारतात अनेकांची फसवणुक केल्याची कबुली दिली. तसेच  इतर साथीदार नांदेड, मुंबई, दिल्ली व लखनौ या ठिकाणी असल्याचे सांगितले.  

त्यानुसार पथकाने सायबर सेलच्या तांत्रिक विश्लेषणावरून ११ जून रोजी नांदेड शहरात सापळा रचून सतिश तुळशीराम हंकारे (वय २६, रा. बोरगाव, ता. लोहा, जि. नांदेड. हल्ली मुक्काम अहमदपूर व नांदेड), आनंद पांडुरंग कांबळे (वय २४, रा. अहमदपूर, जि. लातूर) या दोघांना ताब्यात घेतले. नांदेडला पोलिस भरती प्रशिक्षणाची ॲकडमी चालवून सुशिक्षित बेरोजगार मुले हेरून फसवणुक करत असल्याचे सांगून त्याने  इतर आरोपींची नावे सांगितली.  

त्यानंतर पथकाने मुंबईहून  १३ जून रोजी गौतम एकनाथ फणसे (वय ५६, रा. वाघनी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे, मुंबई) यास ताब्यात घेतले. त्याने मुंबई व परिसरातील मुलांची फसवणुक केल्याची कबुली दिल्यानंतर पथकाने दिल्ली गाठली.  त्या ठिकाणी अभय मेघशाम रेडकर उर्फ राणे (वय ४८, रा. मोतीनगर, नवी दिल्ली, मुळ पत्ता शिरोडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) यास मोतीनगर नवी दिल्लीत सापळा रचून ताब्यात घेतले.

मुख्य आरोपी उत्तर प्रदेशातला..

त्याच्या सांगण्याप्रमाणे गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोषकुमार बनवारीलाल सरोज (वय २९, रा. बोडेपुर, ता. मच्छली, जि. जौनपुर, उत्तर प्रदेश) यास पकडण्यासाठी पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात गेले. मात्र, सरोज हा मूळ गाव सोडून लखनौ येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एका लॉजमधून त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे विविध मंत्रालयातील सचिव दर्जाच्या अधिकारी यांचे बनावट स्टॅम्प, रेल्वे अधिकारी यांच्या नावे बनावट नियुक्ती पत्र, भारत व उत्तर प्रदेश सरकार अशी नावे असलेले लिफाफे तसेच बनावट नियुक्ती पत्र तयार करण्यासाठी लागणारा कागद, लॅपटॉप, रेल्वे व इतर विभागाचे बनावट ओळखपत्र, अनेक मुलांचे बनावट नियुक्ती पत्र, एटीएम कार्ड, मोबाईल आदी साहित्य जप्त करण्यात आले.

सदरील गुन्ह्याची व्याप्ती पूर्ण भारतभर असल्यामुळे अनेक आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. आरोपींनी गेल्या दहा वर्षापासून महाराष्‍ट्रासह ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यासह इतर अनेक राज्यातील बेरोजगार मुलांची फसवणुक केली आहे. त्यामुळे या आरोपींकडून कोणाची फसवणुक झाली असल्यास त्यांनी वसमत पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा येथे संपर्क करण्याचे आवाहन हिंगोलीचे पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com