कंबरडे मोडले आहे, टाळेबंदी नकोच; परभणीत व्यापारी रस्त्यावर - The collarbone is broken, don't lock up; On the merchant road in Parbhani | Politics Marathi News - Sarkarnama

 कंबरडे मोडले आहे, टाळेबंदी नकोच; परभणीत व्यापारी रस्त्यावर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

राज्य शासनाने ३० एप्रिल पर्यंत पुन्हा बाजारपेठ बंद करण्याचे आदेश काढल्याने व्यापाऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले जात असल्याचा आरोप व्यापारी संघटनाकडून होत आहे.

परभणी ः कोरोना संसर्गाचा प्रसार वेगाने वाढत असल्याने राज्यशासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात अशंत: टाळेबंदीचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. परंतू सातत्याने गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील व्यापारी या टाळेबंदीमुळे कोलमडला आहे. आता बाजारपेठेचे कंबरडे मोडले असल्याने आता टाळेबंदी करू नका अशी आर्त हाक व्यापाऱ्यांनी प्रशासनला दिली आहेे. व्यापार बंद असल्याने आम्हाला आर्थिक मदत देवून या दुष्टचक्रातून बाहेर काढावे अशी मागणी करत आज व्यापारी रस्त्यावर उतरले होते. 

कोरोना काळात शासनामार्फत वेळोवेळी बाजारपेठ बंदच्या आदेशाने व्यापारी हतबल झालेले आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या एक वर्षापासुन शासनाच्या आदेशाचे पालन व्यापाऱ्यांनी केले आहे. आता सर्व महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे.

शासनाचे कर, बॅकेच्या कर्जाचे व्याज, दुकान भाडे, कामगारांचे पगार, लाईट बिल, शिवाय घर खर्च आदीमुळे व्यापाऱ्यांचे गणित बिघडले आहे. असे असतांनाही या व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सरकारी पातळवरील आर्थिक मदत मिळत नाही. किंबहूना व्यापाऱ्यांनी ती कधी मागितली देखील नाही. परंतू आज व्यापाऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज निर्माण झाली आहे.

सगळे नियम पाळू पण..

राज्य शासनाने ३० एप्रिल पर्यंत पुन्हा बाजारपेठ बंद करण्याचे आदेश काढल्याने व्यापाऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले जात असल्याचा आरोप व्यापारी संघटनाकडून होत आहे. बंदच्या आदेशाला परभणी जिल्ह्यातील व्यापारी महासंघाचा विरोध आहे. आर्थिक अडचणीमुळे व्यापारी त्रस्त असून त्यांची मानसिकता बिघडली आहे. आता कोणत्याही परिस्थितीत व्यापारी राज्यशासन व जिल्हा प्रशासनाचे नियम पाळणार नाहीत अशी भूमिका व्यापारी महासंघाने घेतली आहे.

आमची व्यथा जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडावी. आम्हाला सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्याची अनुमती द्यावी. त्यात कोणतीही आस्थापना बंद ठेवण्यात येऊ नये. आम्ही सर्व व्यापारी सगळ्या नियमांचे काटेकोरपणे पालन करू, असा विश्वास महासंघाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे. दर शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा वगळून बाजार पेठ बंद ठेवण्याच्या आदेशाचे आम्ही पालन करू, असेही जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुर्यंकांत हाके यांनी म्हटले आहे. 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख