मुख्यमंत्र्यांचे औरंगाबादवर लक्ष; विकासकामे फास्ट ट्रॅकवर पुर्ण करण्याचे आदेश..

गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगाने करावी व पुढील काही महिन्यांत हे काम पूर्ण करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
Chief Minister Uddhav Thackeray- Meeting News Aurangabad
Chief Minister Uddhav Thackeray- Meeting News Aurangabad

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात औरंगाबाद जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या निजामकालीन शाळांचे रूप आता बदलणार आहे. त्याचबरोबर शहरातील सर्व रस्त्यांची अवस्था तातडीने सुधारणार असून सातारा-देवळाई मधील भूमिगत मलनि:सारणाची समस्याही दूर होणार आहे. (CM's focus on Aurangabad; Order to complete development work on fast track.) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा येथील बैठकीत औरंगाबादच्या विविध विकासकामांना फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

तसेच राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे श्री संत एकनाथ महाराज संतपीठात अभ्यासक्रम सुरु करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे संत परंपरा आणि साहित्याच्या अभ्यास-संशोधनाला चालना मिळणार आहे. (Chief Minister Uddhav Thackeray, Maharashtra) औरंगाबाद- अहमदनगर रेल्वेमार्गासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून, हा मार्ग पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या प्रकल्पांचे सादरीकरण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर करण्यात आले.  पैठण येथे श्री संत एकनाथ महाराज संतपीठाची इमारत तसेच वसतिगृह तयार आहे. मात्र अद्याप प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू झालेला नाही, असे निदर्शनास आणून देण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्यासारख्या संत साहित्याच्या अभ्यासकांना एकत्र बोलावून चर्चा व्हावी. तसेच अशांच्या सहभागाने ट्रस्टची पुनर्रचना करावी. राज्याचे संस्कृतीचे प्रतिक असणाऱ्या या संतपीठात शैक्षणिक वर्ष सुरु करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. हे संतपीठ विद्यापीठ व्हावे, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे अधिक पाठपुरावा करावा, असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले.

निजामकालीन शाळांची पुनर्बांधणी..

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील १४४ शाळांच्या इमारती निजामकालीन असून, त्यातील बहुतांश मोडकळीस आलेल्या आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या शाळांच्या पुनर्बांधणी आणि दुरूस्तीचा शाश्वत कार्यक्रम हाती घेऊन ठोस आणि चिरकाल टिकणारी गोष्ट करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मनपा आयुक्त पांडेय यांनी शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये आणि शहरातील विविध मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७. २२ कोटी रुपये निधी आवश्यक असल्याचे सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी ही कामे तातडीने नगरविकास विभागास महाराष्ट्र नगरोत्थान निधीतून पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

सफारी पार्क जागितक दर्जाचे करा..

यावेळी औरंगाबाद शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन उभारणीच्या कामाचा आढावा देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला. तसेच हे स्मृतीवन स्थानिक वृक्षसंपदेच्या जतनासाठी तसेच पक्षी उद्यान म्हणून ओळखले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

महापालिका आयुक्तांनी औरंगाबादमध्ये गुंठेवारी कक्ष स्थापन करण्यात आला असून, ५२ संस्थामार्फत विभागनिहाय प्रस्ताव प्राप्त करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. त्यावर गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगाने करावी व पुढील काही महिन्यांत हे काम पूर्ण करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

औरंगाबाद सफारी पार्क जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण पार्क होण्यासाठी तसे वेगळेपण निर्माण करावे, विविध प्राणी त्याठिकाणी असावेत यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत सूचना दिल्या. प्राणी उद्यान व सफारीसाठी जमिनीची मागणी महापालिकेने केली आहे. त्यादृष्टीने वन विभागाच्या समन्वयाने ही कार्यवाही करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com