मुख्यमंत्र्यांच सभागृहातील भाषण म्हणजे चौकातील राजकीय सभा

स्वातंत्र्य संग्रामात शिवसेनेचा सहभाग नव्हता हे मुख्यमंत्र्यांनीच मान्य केले हे एका अर्थाने बरे झाले.
Devendra Fadanvis-Uddhav Thackeray News
Devendra Fadanvis-Uddhav Thackeray News

औरंगाबाद: राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेले भाषण हे आतापर्यंतच्या काळातील सर्वात सुमार भाषण होते. तासाभराच्या भाषणात ते महाराष्ट्रात येऊच शकले नाहीत, महाराष्ट्रातील शेतकरी, त्यांचे प्रश्न कोरोना काळातील भ्रष्टाचारा संदर्भात आम्ही उपस्थित केलेले प्रश्न यावर त्यांना बोलताच आले नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांचे आजचे सभागृहातील भाषण म्हणजे चौकातील राजकीय सभा होती, असा टोला देखील फडणवीसांनी लगावला.

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात उत्तर दिले. ते देत असतांना त्यांनी विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेले हिंदुत्व, कोरोना काळात झालेला भ्रष्टाचार, मुंबई मेट्रो, कांजुरमार्ग कारशेड, मराठवाडा-विदर्भ वैधानिक विकास मंडळ आदी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. ते देत असतांना ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारचा वारंवार उल्लेख करत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावाला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी केलेले भाषण सुमार होते अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केली.

फडणवीस म्हणाले, तासभराच्या भाषणात मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले नाही, ते दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू कश्मीर, पाकिस्तान, चीन, दक्षिणेत फिरून आले, पण त्यांना महाराष्ट्रात येताच आले नाही. सभागृहात राज्याच्या प्रश्नावर बोललं पाहिजे याचं भान देखील मुख्यमंत्र्यांना राहिले नाही. आता त्यांना वर्ष झाले आहे, ते नवे नाहीत, त्यामुळे सभागृहातील भाषण आणि चौकात केलेले राजकीय भाषण याच्यातील फरक त्यांना समजायला हवा.

राज्यातील शेतकऱ्यांच्या वीजेचा प्रश्न, बोंडआळी, अनुदान, कोरोना भ्रष्टाचारा संदर्भात विचारलेले व राज्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचे कट केलेले वीज कनेक्शन या प्रश्नावर त्यांना उत्तरच देता आले नाही. त्यामुळे भ्रमनिरास करणारे, राज्याला कुठलीही दिशा न देणारे सुमार असे हे भाषण होते. सरकारने राज्यपालांना लिहून दिलेल्या दिशाहीन अभिभाषणासारखेच ते होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या वीजेचे प्रश्न, त्यांची कनेक्शन तोडली जात असतांना मुख्यमंत्र्यांना चिंता होती ती सिंगुर इथे उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची, त्यांची वीज तोडल्याची, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

भाषण करतांना चीन येताच पळेपळे असे विधान करून त्यांनी भारतीय जवानांचा घोर अपमान केल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला. चीनला पाहताच आमचे सैनिक पळून जातात असे म्हणत त्यांना पळपुटे ठरवण्याचा घाणेरडा आणि अपमानजनक प्रकार मुख्यमंत्र्यांनी केला. चीनच्या सीमेवर उणे ३० डिग्री तापमानात आमचे सैनिक चीनशी लढा देत आहेत. गलवान खोऱ्यात शौर्य गाजवत त्यांनी चीन सैन्याला एक इंच भारताचा भूभाग न बळकावू देता हुसकावूण लावले, आणि मुख्यमंत्री आमच्या जवानांना पळपुटे म्हणतात ही शरमेची गोष्ट आहे.

गृहमंत्र्यांनी कुठलाही शब्द दिला नव्हता..

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहा यांनी बंद खोलीत आपल्याला शब्द दिल्याचा उल्लेख केला. पण हे धादांत खोटं आहे, खर काय आहे हे त्यांना चागंल माहित आहे. पण खोटं बोल पण रेटून बोल या पद्धतीने त्यांनी पुन्हा एकदा सभागृहात खोटे सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा मुद्दा उपस्थित करून आमच्या हिंदुत्वावर मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला.

पण ज्या काॅंग्रेसने सावरकरांना देशद्रोही आणि समलैगिंक म्हणणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सत्तेत बसलात. सावरकरांनची बदनामी करणारे पुस्तक तुम्ही सत्तेवर आल्यानंतर काॅंग्रेसनी काढलं. त्यामुळे सत्तेसाठी तुम्ही त्यांच्यासोबत गेलांत मान्य करा, त्यामुळे आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका, असे आव्हान देखील फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

स्वातंत्र्य संग्रामात शिवसेनेचा सहभाग नव्हता हे मुख्यमंत्र्यांनीच मान्य केले हे एका अर्थाने बरे झाले, पण संघाचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान नव्हते हे त्यांचे म्हणणे म्हणजे इतिहास माहित नसण्याचे लक्षण आहे. हे विधान करण्यापुर्वी त्यांनी संघाचे सरसंघचालक केशवराव हेडगेवार हे स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी होते, त्याचा या लढ्यात सहभाग होता याची माहिती करून घ्यायला हवी होती, असा चिमटा देखील फडणवीसांनी काढला.

खंडणी मागणाऱ्यांना समर्पण काय कळणार?

आयोध्येत बाबरी मशीद पाडली तेव्हा हे कुणीही तिथे नव्हते, मशीद पाडण्यात आम्हीच पुढे होते, हे तेव्हा घरी झोपलेले होते, अशी टिका करतांनाच राम मंदिरासाठी जनतेकडून निधी गोळा करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा देखील फडणवीस यांनी समाचार घेतला. ज्यांना खंडणीची भाषा समजते, त्यांना जनतेने समर्पण वृत्तीने राम मंदिरासाठी दिलेल्या निधीचे महत्व काय कळणार? राम मंदिरासाठी लोक आपणहून निधी देत असतील तर तुमचा आक्षेप कशासाठी, असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या तासाभराच्या भाषणात काही मुद्देच नव्हते. ते भरकटलेले भाषण होते. विरोधी पक्ष त्यांच्या विधानांची चिरफाड करेल या भितीपोटी त्यांनी विरोधकांना बोलू दिले नाही. विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणून कामकाज संपवले असा आरोप देखील फडणवीसांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला.

हिंदू विरोधात बोलण्याची हिमंत शरजील उस्मानीची उत्तर प्रदेशात झाली नाही, पण तो महाराष्ट्रात येऊन बोलून गेला, अशी टीक करतांना सरकारला प्रश्न विचारले, त्यांच्या भ्रष्टाचारावर बोललं की आम्हाला महाराष्ट्रद्रोही ठरवले जाते, आमच्यावर महाराष्ट्राचा अपमान करत असल्याचा आरोप केला जातो. पण आमच्यामुळे नाही तर तुमच्या भ्रष्ट कारभारामुळे राज्याची बदनामी होत आहे, आम्ही तो चव्हाट्यावर आणला तर किमान तुमची बदनामी होणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com