Calling of BJP leaders in the district for unemployed posts | Sarkarnama

बिनकामाच्या पदांवर जिल्ह्यातील भाजप नेत्यांची बोळवण

गणेश पांडे
शनिवार, 4 जुलै 2020

या कार्यकारणीत सात प्रमुख आघाड्या देखील जाहीर झाल्या आहेत. यात प्रामुख्याने प्रदेशाचे कार्यालय, मीडिया, सोशल मीडिया या सर्वांचे प्रमुख घोषीत करण्यात आले, मात्र याच्या अध्यक्ष किंवा इतर पदावर देखील जिल्ह्यातील कुणालाच संधी देण्यात आलेली नाही हे विशेष. 

परभणी : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या निवडी शुक्रवारी करण्यात आल्या. परंतु या निवडीनंतर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे प्रदेशावरील वजन घटल्याचे स्पष्ट झाले आहे. या यादीत बिनकामच्या पदावरच जिल्ह्यातील भाजप नेत्यांची बोळवण केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हा भाजपमधील नेत्यांमध्ये खदखद पहायला मिळते.
 
भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातील कार्यकारिणी शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. परंतू प्रदेशपातळीवरील या पदाधिका-यांमध्ये या जिल्ह्याच्या एकाही पुढा-यांचा समावेश करण्यात आलेला नाही.

या कार्यकारणीत सात प्रमुख आघाड्या देखील जाहीर झाल्या आहेत. यात प्रामुख्याने प्रदेशाचे कार्यालय, मीडिया, सोशल मीडिया या सर्वांचे प्रमुख घोषीत करण्यात आले, मात्र याच्या अध्यक्ष किंवा इतर पदावर देखील जिल्ह्यातील कुणालाच संधी देण्यात आलेली नाही हे विशेष. 

राज्याच्या सर्व सामाजिक स्तर आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देण्यासाठी या कार्यकारणीचा उपयोग होईल, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी म्हटले असले तरी, जिल्ह्यातील एकाही पुढाऱ्याचा या यादीत समावेश नसल्याने सामाजिक स्तर आणि भौगोलिक न्याय मिळाला हा खरा प्रश्न आहे?

माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे व माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे या दोघांची प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. निमंत्रीत सदस्य म्हणून  माजी आमदार विजय गव्हाणे, माजी आमदार रामराव वडकुते (हिंगोली),  माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, डॉ.अनिल कांबळे, जिल्हा परिषद सदस्य गणेशराव रोकडे, माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रबदडे व महानगरातून मोहन कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. परंतू वरिष्ठ पातळीवरील समितीत या पैकी एकासही मोठी पद किंवा जबाबदारी देण्यात आलेली नाही. 

परभणी जिल्ह्याच्या तुलनेत मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद या जिल्ह्यांना मात्र प्रदेश कार्यकारणीत झुकते माप देण्यात आल्याचे दिसून आले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर भाजपने जिल्ह्यात शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत पक्षाची ताकद वाढवण्याचे सातत्याने प्रयत्न केले आहेत.

कापूस खरेदी असो की शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा प्रश्न या विरोधात आंदोलन उभारत जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी सरकारला जाब विचारण्याचे काम केले. अशावेळी प्रदेश कार्यकारणीत काही नेत्यांचा समावेश करून त्यांना बळ देण्याची गरज होती. परंतु याकडे राज्याच्या नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख