फडणवीसांचे दोन्ही टार्गेट हीट..

सरकार किंवा गृहविभागाकडे नव्हती त्यापेक्षा कितीतरी पट माहिती आणि मनसुख हिरेन प्रकरणाचे कागदोपत्री पुरावे फडणवीसांकडे होते.
Assembly Session Anyalisis News-Devendra Fadnvis-Rathod-Vaje
Assembly Session Anyalisis News-Devendra Fadnvis-Rathod-Vaje

औरंगाबाद ः यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजले ते वेगळ्याच कारणाने. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असेच काहीसे चित्र विधीमंडळात व बाहेरही दिसले. फडणवीस यांचे लक्ष्य महाविकास आघाडी सरकार असले तरी त्यांचा प्रमुख रोख हा कधीकाळी आपला मित्र व सत्ता पक्ष असलेल्या शिवसेनेवरच अधिक होता हे दिसून आले.

विधिमंडळ अधिवेशनात आपण मित्राला शत्रुत्व काय आहे हे दाखवून देवू याची झलक त्यांनी अधिवेशन सुरू होण्याआधी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीमाना घ्यायला भाग पाडून शिवसेनेला दाखवून दिले. एवढ्यावर फडणवीस थांबले नाही, तर दहा दिवसांच्या अधिवेशनात प्रत्येकवेळी त्यांनी शिवसनेनेला खिंडीत गाठले. याचा शेवट देखील फडणवीसांनी शिवसेनेचे आवडते पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची बदली करवूनच केला. हे प्रकरण बदलीवरच थांबले नाही तर वाझे अधिक खोलात गेल्याचे रोजच्या घटना घडामोडींवरून दिसते आहे.

सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणायचं आणि आपले इप्सित साध्य करायंच ही भूमिका विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस नेहमीच चांगली वठवतात. मुद्देसूद, कागदोपत्री पुरावे, कायद्याचा आधार या सगळ्या गोष्टी हाताशी धरून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्यात त्यांचा हातखंडा आहे. हातातोंडाशी आलेला मुख्यमंत्रीपदाचा घास मित्रपक्षाच्या खेळीने गेल्यामुळे फडणवीस कमालीचे नाराज झाले होते. पण यातून बोहर पडून त्यांनी केंद्रातील नेत्यांनी या सरकारला अडचणीत आणण्याची जी जबाबदारी फडणवीस यांच्यावर सोपवली ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली असेच म्हणावे लागेल.

टिकटाॅक स्टार पुजा चव्हाण हिच्या आत्महत्येत शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव आले आणि तिथूनच अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेला घेरण्याची तयारी फडणवीस यांनी सुरू केली होती. पुजा चव्हाण प्रकरणातील व्हायरल व्हिडिओ, आॅडिओ क्लीप, यासह पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात दाखवलेली कुचराई या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर फायदा उचलत फडणवीस यांनी शिवसेनेवर दबाव वाढवला.

याचा फायदा एकट्या भाजपनेच नाही, तर सत्तेतील राष्ट्रवादी व काॅंग्रेसने देखील उचलला. एकीकडे फडणवीस यांनी संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशनच चालू देणार नाही, अशी धमकी दिली, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील राठोड यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी भूमिका घेतली. फडणवीस यांनी टाकलेल्या फाश्यांमध्ये शिवसेना अलगद अडकली आणि अधिवेशनाच्या पुर्वसंध्येलाच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याचे जाहीर करावे लागले. सभागृहा बाहेरील फडणवीस यांचा हा पहिला विजय होता.

विशेष म्हणजे संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यानंतर दहा दिवसांच्या सभागृहातील कामकाजात त्याचा फारसा उल्लेख देखील विरोधी पक्षाकडून झाला नाही. शेतकऱ्यांचा पीक विमा, कर्जमाफी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई, राज्यातील कायदा व सुव्यवस्था या मुद्यांवरील चर्चा सभागृहात करून विरोधी पक्षाने आपण किती साळसूद आहोत हे दाखवण्याचा देखील यशस्वी प्रयत्न केला.

पण राठोंडाचा बळी घेतल्यानंतर देशातील प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी, त्यानंतर गाडी मालकाचा मुंब्राच्या खाडीत सापडलेला मृतदेह आणि या प्रकरणात रस दाखवणारे पोलिस अधिकारी सचिन वाझे हे आयते कोलित फडणवीसांच्या हाती लागले आणि शेवटचे तीन दिवस फडणवीसांनी या विषयाची जी काही चिरफाड सभागृहात आणि प्रसार माध्यमांसमोर केली, त्यानंतर सचिन वाझे यांच्यावर देखील कारवाई होणार हे स्पष्ट जाणवत होते.

फडणवीसांचा वाझेंवर इतका राग का? असा प्रश्न पडावा इतक्या आक्रमकतेने एखादा निष्णात वकील जशी न्यायालयात बाजू मांडतो तसेच फडणवीस सभागृहात सचिन वाझेंचा मनसुख हिरेन प्रकरणात कसा संबंध आहे हे पुराव्यानिशी मांडत होते. भाजप खासदार मोहन डेलकर आत्महत्येच्या घटनेतून विरोधी पक्षाला रोखण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून झाला, पण तो डाव देखील फडणवीसांनी सरकारवरच उलटवला.

फडणवीस भारी पडले..

सभागृहात बेफाम सुटलेल्या फडणवीसांना आवर घालण्यासाठी सीडीआरची चौकशी करा, डेलकर प्रकरणातील भाजप नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करू, अशा धमक्या सत्ताधारी पक्षाकडून दिल्या गेल्या, पण ते सगळे प्रयत्न फोल ठरले. अंबानी यांच्या घरासमोरील स्कार्पिओमध्ये स्फोटके सापडल्यानंतर स्थानिक पोलीस किंवा गुन्हे शाखेचे कुणीच तिथे पोहचले नाही, पण सचिन वाझे हजर होते हा मुद्रा फडणवीसांनी प्रकर्षाने सभागृहात मांडला. मनसुख हिरेन पोलिसांनी बोलावले सांगून घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांचा प्रवास, मोबाईल लोकेशन, संभाषण ते कुणाला भेटले या सगळ्या गोष्टी फडणवीसांनी पुराव्यानिशी सभागृहात मांडल्या.

सरकार किंवा गृहविभागाकडे नव्हती त्यापेक्षा कितीतरी पट माहिती आणि मनसुख हिरेन प्रकरणाचे कागदोपत्री पुरावे फडणवीसांकडे होते. कधी काळी शिवसेनेत असलेले सचिन वाझे रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आघाडीवर होते. म्हणून फडणवीसांचा त्यांच्यावर राग आहे का? असा आरोप देखील शिवसेनेकडून करण्यात आला. पण त्याकडे फारसे लक्ष न देता फडणवीस यांनी मोठ्या चतुराईने मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्या, अशी मागणी सभागृहात केली.

आश्चर्य म्हणजे काही दिवसांतच हा तपास एनआयएने हाती घेतला. सचिन वाझे यांना सरकार वाचवत आहेत, ते सरकारचे जावई आहेत क? त्यांना निलंबित का केले जात नाही? असे प्रश्न उपस्थित करत फडणवीसांनी सभागृह दणाणून सोडले होते. अखेर दबावात आलेल्या महाविकास आघाडी सरकारने सचिन वाझे यांची बदली केली. आता एनआयएने सचिन वाझे यांना अटक देखील केली आहे. राठोड पाठोपाठ सचिन वाझे यांच्या बदलीने शिवसेना पुन्हा एकदा बॅकफुटवर गेली. एकंदरित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात दोन पक्षी तर मारलेच पण मित्रपक्ष शिवसेनेला `करून दाखवले`, असेच म्हणावे लागेल.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com