सत्तारांच्या ताब्यात असलेल्या नगर परिषद विरोधात भाजपचा रास्ता रोको.. - Block BJP's way against the ruling city council | Politics Marathi News - Sarkarnama

सत्तारांच्या ताब्यात असलेल्या नगर परिषद विरोधात भाजपचा रास्ता रोको..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

काही दिवसापुर्वी सिल्लोड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी भाजपचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांच्या घराच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम पाडले. यामुळे १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा दावा भाजपकडून केला जातोय.

औरंगाबाद ःराज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगर परिषद विरोधात भाजपने आज रास्तारोको आंदोलन केले. शहरातील हिंदूंच्या बांधकामांना अवैध ठरवत ती पाडण्याचा सपाटा सत्तार यांच्या सांगण्यावरून नगर परिषदेतील अधिकारी करत असल्याचा आरोप यावेळी भाजपने केला.

सिल्लोड नगर परिषदेवर गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून अब्दुल सत्तार यांची सत्ता आहे. दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नी, मुलगा यांनी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. काही दिवसापुर्वी सिल्लोड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी भाजपचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांच्या घराच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम पाडले. यामुळे १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा दावा भाजपकडून केला जातोय.

खाजगी मालकीच्या जागेवर संरक्षक भिंत बांधत असतांना नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ते पाडल्याच्या निषेधार्थ भाजपने आज दुपारी रास्तारोको केला. भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नगर परिषदेकडे जाणारा रस्ता तासभर रोखून धरला. यावेळी अब्दुल सत्तार, नगर परिषदेतील अधिकारी व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी भाजपने सत्तार यांच्यावर जातीयवाद करत असल्याचा आरोप करतांनाच ते हिंदूंना नाहक त्रास देत असल्याचे म्हटले.शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी आम्ही मेहनतीने बांधलेल्या घरासाठी संरक्षक भिंत ती देखील आमच्याच जागेत बांधत असतांना नगर परिषदेने ते पाडले. विशेष म्हणजे कुठेलही बांधकाम सूचना किंवा नोटीस दिल्याशिवाय पाडता येत नाही. परंतु राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माझ्यावर राजकीय सुड उगवण्यासाठी नगर परिषदेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे बांधकाम पाडल्याचा आरोप केला.

सत्तेच्या जोरावर गरीबांच्या घामाच्या पैशातून बांधलेली घरं कुठलेही कारण नसतांना पाडण्यात येत असून या विरोधात आता जनतेनेच रस्त्यावर उतरावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले. बांधकाम पाडण्यासाठी आलेल्या नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा, अशी मागमी करतांनाच आंदोलकांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी केली.

Edited By : Jagdish Pansare 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख