भाजपची शतप्रतिशतच्या दिशेने वाटचाल; मराठवाड्यातील प्रभारी जाहीर

विधानसभा निवडणुकीत १०५ सर्वाधिक आमदार असतांनाही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. हातातोंडाशी आलेले मुख्यमंत्रीपद व सत्ता गेल्याने भाजपने आता स्वबळावर शतप्रतिशतची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या प्रभारींची नियुक्ती हा त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जाते.
bjp appoint prbharis in marathwada news
bjp appoint prbharis in marathwada news

औरंगाबाद ः प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत भाजपने मराठवाड्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील प्रभारींच्या नियुकत्या जाहीर केल्या आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या भाजपला मराठवाड्यात घवघवीत यश मिळाले. तर २०१९ मध्ये युतीत देखील भाजपने चांगली कामगिरी केली. परंतु विधानसभा निवडणुकीत १०५ सर्वाधिक आमदार असतांनाही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. हातातोंडाशी आलेले मुख्यमंत्रीपद व सत्ता गेल्याने भाजपने आता स्वबळावर शतप्रतिशतची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या प्रभारींची नियुक्ती हा त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जाते. 

प्रदेश कार्यकराणीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली. आगामी काळात होऊ घातलेल्या औरंगाबाद महापालिका निवडणुका पाहता भाजपने माजी मंत्री तथा निलंग्याचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचीऔरंगाबाद शहरचे प्रभारी म्हणून नेमणूक केली. लातूर महापालिका व जिल्हा परिषद कॉंग्रेसच्या ताब्यातून हिसकावून तिथे भाजपचे कमळ फुलवण्यात निलंगेकरांची भूमिका महत्वाची होती.

लातूरमध्ये केलेला चमत्कार ते औरंगाबादेत देखील करतील या अपेक्षेसह त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे दिसते. खासदार डॉ. भागवत कराड हे देखील त्यांच्या सोबत असणार आहेत. कराड यांच्यावर ग्रामीण भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. कराड यांचा जिल्ह्यात चांगला जनसंपर्क आहे याचा फायदा निश्चितच भाजपला ग्रामीण भागात होईल. 

तर लातूर ग्रामीणचे प्रभारी म्हणून भाजपचे प्रदेश प्रवक्ते व औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी नाव नोंदणी करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या शिरीष बोराळकर यांची नियुक्ती केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे जिल्ह्यात दोन आमदार निवडूण आले आहेत.

निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर तर औसा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक असलेले अभिमन्यू पवार विद्यमान आमदार आहेत. या शिवाय लातूर शहर व ग्रामीण मतदारसंघात अनुक्रमे अमित व धीरज देशमुख हे कॉंग्रेसचे तर अन्य दोन मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडूण आले आहेत. 

लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुधाकर श्रृगांरे विजयी झाल्यामुळे लातूर जिल्ह्यात भाजपची ताकद निश्चितच जास्त आहे. त्यामुळे भविष्यात लातूर जिल्हा पुर्णपणे भाजपमय करण्याचे मोठे आव्हान बोराळकर यांच्या समोर असणार आहे. शहराचे प्रभारी म्हणून दत्ता कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

शहर भाजपमधील अंतर्गत गटबाजी मोडून काढत महापालिकेतील आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांवर अंकुश ठेवण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहर मतदारसंघ भाजपकडे कसा येईल यासाठी कुलकर्णी यांना आतापासूनच कंबर कसावी लागेल.

औरंगाबाद पुर्वचे भाजप आमदार माजी राज्यमंत्री अतुल सावे यांच्याकडे नांदेड शहरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नांदेडमधील राजकीय परिस्थिती देखील भाजपसाठी समिश्र अशीच म्हणावी लागेल. लोकसभेसह तीन विधानसभा व एक परिषद असे भाजपचे जिल्ह्यात चार आमदार आहेत. नांदेड शहराचा विचार केला तर तिथे मात्र कॉंग्रेसचे अशोक चव्हाण यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे.

तसेच नांदेड-वाघाळा महापालिका, जिल्हा परिषद देखील कॉंग्रेसच्याच ताब्यात आहे. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भाजपची ताकद वाढविणे अतुल सावे यांचे लक्ष्य असणार आहे. तर ग्रामीण भागात भाजप मजबुत करण्याची जबादारी पक्षाने नागनाथ निडवदे यांच्यावर सोपवली आहे. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मदतीने ही नवीन प्रभारी जोडी कॉंग्रेसच्या अशोक चव्हाणांना भविष्यात कसे तोंड देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सिल्लोडच्या मुलतानींवर परभणीचा भार..

सिल्लोडच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व आताच प्रदेश कार्यकारणीत स्थान मिळालेले इद्रीस मुलतानी यांच्यावर परभणी शहरचे प्रभारी म्हणून जबाबदारी आहे.  केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या मुल्तानी यांच्यासाठी ही जबाबदारी मोठीच म्हणावी लागले. परभणी जिल्ह्यात जिंतूर विधानसभा मतदारसंघ सोडला तर भाजपची फारशी ताकद नाही.

महापालिका कॉंग्रेसच्या तर जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भाजप सदस्यांची संख्या ही एक आकडी आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच वर्चस्व राहिलेल्या परभणीत इद्रीस मुलतानी भाजप कशी वाढवणार हा मोठा प्रश्न आहे.

परभणी ग्रामीणचा विचार केला तर जिंतूर मतदारसंघ वगळता भाजपचा एकही आमदार जिल्ह्यात नाही. बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रितम मंडे यांच्यावर ग्रामीण प्रभारी म्हणून जबाबदारी आहे. बीड मतदारसंघातच प्रितम मुंडे यांना पुरेसा वेळ देता येत नसल्याची ओरड विरोधकांकडून केली जाते. त्यात परभणी ग्रामीणची जबादारी आणि पक्ष वाढवण्याचे काम त्या कशा करणार? याकडे आता सगळ्याचे लक्ष असणार आहे. स्थानिक आमदार मेघना बोर्डीकर यांच्या मदतीने जिल्ह्यात भाजपचे बस्तान बसवण्यासाठी प्रितम मुंडे यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

या शिवाय बीड गोविंद केंद्रेकर, हिंगोली बनबराव लोणीकर, जालना ॲड. मिलिंद पाटील व उस्मानाबाद रमेश पोकळे यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी आहे. उस्मानाबादेत पक्ष वाढीच्या कामात पोकळे यांना आमदार तथा प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची साथ मोलाची ठरणार आहे. जालना जिल्ह्यात भाजपची ताकद चांगली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह तीन मतदारसंघात भाजपचे आमदार निवडूण आलेले आहेत. त्यामुळे या सर्वांची मदत मिलिंद पाटील यांना जिल्‍ह्यात भाजप आणखी मजबुत करण्यासाठी निश्चितच होऊ शकते.

हे आहेत प्रभारी..

अतुल सावे- नांदेड ( शहर)
नागनाथ निडवदे- नांदेड ( ग्रामीण)
इद्रीस मुलतानी- परभणी (शहर)
प्रितम मुंडे - परभणी (ग्रामीण)
बबनराव लोणीकर (हिंगोली)
ॲड. मिलिंद पाटील (जालना)
संभाजी पाटील निलंगेकर -औरंगाबाद (शहर)
डॉ. भागवत कराड - औरंगाबाद (ग्रामीण)
गोविंद केंद्रे - (बीड)
दत्ता कुलकर्णी - लातूर (शहर)
शिरीष बोराळकर- लातूर (ग्रामीण)
रमेश पोकळे- उस्मानाबाद


   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com