भाजप व्हर्च्युल रॅलीः शिवसेना म्हणते गरज होती का? एमआयएमची कारवाईची मागणी

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या चार हजारांच्या दिशेने झपाट्याने वाढते आहे. मृतांचा आकडा देखील दोनशे पार गेला आहे. हे कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असतांना भाजपकडून नियमांना केराची टोपली दाखवून व्हर्च्युल रॅली सारखे कार्यक्रम कसे घ्यावे वाटतात.
mim and shvsena attack on bjp news
mim and shvsena attack on bjp news

औरंगाबादः औरंगाबादेत भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांनी व्हर्च्युल रॅलीत सहभागी होण्यासाठी आयोजन केले होते. सोशल डिस्टनन्सच्या नियमाला हरताळ फासून एकाच ठिकाणी गर्दी केल्याचा आरोप त्यांच्यावर शिवसेना व एमआयएमकडून होत आहे. कोरोनाच्या संकटात अशा रॅलीची गरज होती का? असा सवाल शिवसेनेने, तर नियमांची पायमल्ली झाली असेल तर पोलिस आणि प्रशासनाने संबंधित भाजपच्या संयोजकांवर कुणाच्याही दबावाला बळी न पडता कारवाई करावी अशी मागणी एमआयएमने केली आहे.

भाजपच्या वतीने सुरू असलेल्या व्हर्च्युल रॅलीवर विरोधकांकडून टिका सुरू आहे. मराठवाडा आणि विदर्भासाठी केंद्रीय कृषी व ग्रामविकास राज्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काल या भागातील ३० हजार बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. केंद्रातील मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात आणि आताच्या एक वर्षात केलेल्या कामगिरीची माहिती यावेळी देण्यात आली.

भाजपची मराठवाडा विदर्भासाठीची व्हर्च्युल रॅली सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. मोदी सरकारने सहा वर्षात घेतले निर्णय आणि राबवलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी या जनसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आयएमए हॉलमध्ये या व्हर्च्युल रॅलीत सहभागी होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे यांच्यासह शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, उद्योजक आणि भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. एक ते दीड तास हा जनसंवाद कार्यक्रम सुरू होता.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी भाजपवर टिका करतांना कोरोनाचे संकट शहर व जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणात आलेले असतांना अशा प्रचारसभा किंवा व्हर्च्युल रॅलीची खरंच गरज होती का? असा सवाल उपस्थित केला आहे. गर्दी करू नका, सोशल डिस्टन्स पाळा हे नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का? राजकीय नेते आणि पक्षांनी ते पाळू नयेत का? कोरोनाच्या संकटात राजकारणाची हे वेळ नाही, असा टोला देखील अंबादास दानवे यांनी भाजपला लगावला.

तर तिकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील शिवसेनेची री ओढत भाजपवर निशाणा साधला. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या चार हजारांच्या दिशेने झपाट्याने वाढते आहे. मृतांचा आकडा देखील दोनशे पार गेला आहे. हे कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असतांना भाजपकडून नियमांना केराची टोपली दाखवून व्हर्च्युल रॅली सारखे कार्यक्रम कसे घ्यावे वाटतात.

लग्न समारंभ एवढेच काय पण एखाद्याच्या मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यसंस्कारातील उपस्थितीवर देखील प्रशासनाने बंधने आणली आहेत. मग भाजपने गर्दी कशी केली? पोलिस व प्रशासनाने याची चौकशी करून कुणाच्याही दबावाला बळी न पडता संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी देखील इम्तियाज जलील यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com