शिवसेनेच्या खैरेंनी भाजप खासदार डाॅ. कराडांना फोन करून का बोलावले?

खैरे लोकसभेत पराभूत झालेले असतांना दानवे यांनी कराड यांना भरवलेला हा आनंदाचा पेढा खैरे समर्थकांना चांगलाच खटकला होता.
Shivsea Leader Chandrakant Khaire- Bjp Mp Dr. Karad Meeting News Aurangabad
Shivsea Leader Chandrakant Khaire- Bjp Mp Dr. Karad Meeting News Aurangabad

औरंगाबाद ः भाजपचे खासदार डाॅ. भागवत कराड आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांची एक सदिच्छा भेट खैरे यांच्या संपर्क कार्यालयात नुकतीच झाली. आता ही भेट ठरलेली होती, की मग मुद्दाम घडवून आणली याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

राज्यात व देशात शिवसेना-भाजप युती असतांना देखील कराड आणि खैरे यांच्या फारसे सख्य होते असे नाही. उलट २०१९ मध्ये जेव्हा दोन्ही पक्षांनी स्वतंत्र तयारी सुरू केली होती, तेव्हा डाॅ. कराड हे लोकसभेचे उमेदवार होऊ शकतात का? अशी टिंगल खैरेंकडून केली जायची. पण नशीब कुणाला काय देईल हे सांगता येत नाही, हे म्हणतात ते कराड यांच्या बाबतीत मात्र खरेच ठरले.

आज खैरे हे माजी खासदार आहेत, तर कराड यांची राज्यसभेवर निवड होऊन ते खासदार झाले आहेत. आता ज्या कराड यांचे नाव काढले की खैरे संतापायचे त्याच खैरेंनी कराड यांना फोन करून भेटीसाठी बोलावल्याचे बोलले जाते. कराड यांनी देखील मागंच झालं गेलं विसरून युतीच्या आपल्या जुन्या नेत्याच्या शब्दाला मान देत मछली खडक येथील संपर्क कार्यालय गाठले.

खैरे यांची भगवी शाल आणि तोंडात भरवलेला पेढा याने कराड भारावून गेले. यावेळी दोघांमध्ये बरीच चर्चा झाली, कराड यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आपण कसे महापौर झालो याची आठवण खैरेंना करून दिली. ही भेट एवढ्या पुरतीच मर्यादित होती का? तर निश्चितच नाही. या भेटीमागे अनेक गोष्टी दडलेल्या आहेत.

चंद्रकांत खैरे हे शिवसेनेत सध्या एकाकी पडल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मुंबईतील वरिष्ठ नेत्यांशी खैरे यांचा संपर्क आता काहीसा कमी झाल्याचे बोलले जाते. जिल्ह्यातील महत्वाच्या निर्णय प्रकियेत देखील खैरेंचे मत विचारात घेतले जात नाही हे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत दिसून आले.

खैरे यांचे दबाव तंत्र ?

या  उलट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेते आलेले आणि आता राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांचे पक्षात व जिल्ह्यात वजन वाढले आहे. शिवसेनेतील खैरे विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबादास दानवे यांनी देखील सत्तार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला कार्यभाग साधण्याचे काम सुरू केले आहे. एकंदरित अशा परिस्थितीत खैरे यांच्याकडून देखील दबावाचे राजकारण तर केले जात नाहीये ना? अशी शंका कराड-खैरे भेटीनंतर उपस्थित केली जात आहे.

भागवत कराड जेव्हा खासदार झाले होते, तेव्हा अंबादास दानवे यांनी कराड यांची त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. कराड यांना पेढा भरवून त्यांचे अभिनंदनही केले होते. खैरे लोकसभेत पराभूत झालेले असतांना दानवे यांनी कराड यांना भरवलेला हा आनंदाचा पेढा खैरे समर्थकांना चांगलाच खटकला होता. यावरून खैरे-दानवे यांच्यात तूतूमैमै देखील झाली होती.

खैरे आमचे जुने नेते..

आता मात्र त्याच खैरेंनी भागवत कराड यांना फोन लावून भेटीसाठी बोलावून घेतले आणि त्यांचा सत्कार केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खैरेंनी कराड यांच्याशी काही गुप्त खलबते केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेत सत्तार-दानवे यांचे वाढत असलेले वजन, त्याला वरिष्ठ नेत्यांचा मिळत असलेला अशिर्वाद याला कुठे तरी चेक देण्यासाठी खैरेची ही नवी खेळी असल्याचे देखील बोलले जाते.

आता शिवसेनेत या भेटीचे काय पडसाद उमटतात हे लवकरच दिसेल. डाॅ. भागवत कराड यांनी मात्र खैरे हे आमचे युतीतील जुने नेते आहेत, त्यांनी बोलावल्यावर नाही कसे म्हणणार, असे म्हणत यावर अधिक बोलणे तुर्तास तरी टाळले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com