चिखल तुडवत भाजप आमदार आदिवासी वस्तीवर; रस्ता करण्याचे दिले आश्वासन.. - BJP MLAs treading mud on tribal settlements; Promise to make way | Politics Marathi News - Sarkarnama

चिखल तुडवत भाजप आमदार आदिवासी वस्तीवर; रस्ता करण्याचे दिले आश्वासन..

राजाभाऊ नगरकर
बुधवार, 14 जुलै 2021

पावसाळ्यात तर कच्च्या रस्त्यावरील चिखलामुळे गावाबाहेर जाणे कठीण होते. शेतकरी,विद्यार्थी व त्यांच्या शिक्षणाचे देखील हाल होतात.

जिंतुर ः पिंप्राळा हे तालुक्यातील आदिवासी गाव, पण या गावाला गेल्या कित्येक वर्षापासून डांबरी रस्ता माहित नाही. गावातून मुख्य रस्त्याला जायचे म्हटले तर तीन-चार किलोमीटर खड्डे तुडवत अन् पावसाळ्यात चिखलातून राज्य रस्ता गाठावा लागतो. निवेदन, अर्ज, विनंत्या करून देखील कुणीच रस्त्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही. (BJP MLAs treading mud on tribal settlements; Promise to make way ) त्यामुळे वेळवर उपाचार न मिळाल्यामुळे गावातील काही वृद्ध नागरिकांना आपले प्राण देखील गमवावे लागले. या शिवाय विद्यार्थी, शेतकरी या सगळ्यांचेच हाल होत आहे. या ग्रामस्थांची कैफियत ऐकण्यासाठी भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी नुकतीच या गावाला भेट दिली.

पायी चालायला धड रस्ता नाही, तिथे मोठ्या महागड्या वाहनाचे काय? त्यामुळे बोर्डीकर यांना देखील चिखल तुडवतच गाव गाठावे लागले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांची व्यथा जाणून घेतली, रस्त्याचे काम जिल्हा परिषद अंतर्गत असले तरी यासाठी आपण वैयक्तिकरित्या प्रयत्न करून रस्त्याचे काम करून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. (Bjp Mla Meghna Bordikar-Sakore Jintur-Parbhani) पिंप्राळा या आदिवासी लोकवस्तीच्या गावापासून राज्य रस्त्याला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

पावसाळ्यात तर कच्च्या रस्त्यावरील चिखलामुळे गावाबाहेर जाणे कठीण होते. शेतकरी,विद्यार्थी व त्यांच्या शिक्षणाचे देखील हाल होतात. आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या आजारी व्यक्तीला उपचारासाठी शहरात न्यायचे म्हटले तर मोठी कसरत करावी लागते.  प्रसंगी वेळेवर उपचार मिळाल नाही म्हणून गंभीर रुग्णाला जीव देखील गमवावा लागतो. दोन आठवड्यापूर्वी एका गरोदर महिलेवर माळरानात बाळंत होण्याची वेळ आली होती.

तर चार दिवसापूर्वी (ता.११) गावातील पार्वतीबाई ढाकरे या वृध महिलेला अर्धांगवायू झाला तेंव्हा उपचारासाठी रुग्णालयात वेळेवर पोहचू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे गावकरी सांगतात. अशा घटनांमुळे मागील वर्षभरापासून येथील रस्त्याचा प्रश्न जिल्ह्यात चर्चिला जात आहे. लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी  विविध प्रसिद्धी माध्यमांनीही सातत्याने हा प्रश्न मांडला. अखेर आमदार बोर्डीकर यांनी मंगळवारी त्यांनी गावाला भेट दिली.

गावातील हनुमान मंदिरासमोर गावकऱ्यांची बैठक घेऊन मुख्य रस्त्यासह इतर समस्या जाणून घेतल्या. या रस्त्याचा प्रश्न जिल्हा परिषद स्तरावरील असला तरी तो सोडवण्यासाठी व्यक्तीशः प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.  असे असले तरी दोन आठवड्यात ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी बोर्डीकरांच्या समक्षच दिला.

हे ही वाचा ः बाळासाहेबांनंतर शिवसेना बिघडली, आता शाखांमध्ये तोडपाणी चालते..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख