`कदम मिला के चलना होगा`, हे वाजपेयींचे विचार भाजपचे नेते विसरले - BJP leaders forgot Vajpayee's thoughts on 'Kadam Mila Ke Chalna Hoga' | Politics Marathi News - Sarkarnama

`कदम मिला के चलना होगा`, हे वाजपेयींचे विचार भाजपचे नेते विसरले

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मार्च 2021

कोरोनाचा सामना करत असातंना आम्ही महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात, गावाला पाठवण्यासाठी ते आमचे मतदार नसतांना देखील माणुसकीच्या भावनेतून रेल्वेने, बसने पाठवले.

औरंगाबाद: कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रातील आघाडी सरकार चांगले काम करत असतांना केंद्राकडून मात्र निधी अडवला जातोय. याबद्दल केंद्राकडे एक साधे पत्र न पाठवणारे राज्यातील भाजप नेते राज्याची बदनामी करतायेत. माजी पंतप्रधान भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांचेच विचार आजचे नेते विसरले असल्याचा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सभागृहात लगावला. `कदम मिला के चलना होगा`, हा विचार लक्षात घेऊन एकत्रित काम करण्यासाठी पुढे या असे आवाहन देखील पवार यांनी केले.

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलतांना रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस, मुनगंटीवार यांनी सभागृहात केलेल्या टीकेला उत्तर दिले. केंद्राने राज्य सरकारच्या हक्काचा कोट्यावधींचा निधी अडवून ठेवला असा आरोप करतांनाच तो मिळावा यासाठी भाजपच्या नेत्यांनी केंद्राला एक पत्र तरी पाठवले का? असा सवाल देखील केला.

रोहित पवार म्हणाले, अॅक्ट आॅफ गाॅड म्हणत केंद्रातील सरकारने राज्य सरकारच्या हक्काच्या विविध योजनांचा ८० हजार कोटी रुपये निधी थकवला. मग आम्ही तो मागितला तर विरोधक म्हणतात प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडे बोट का दाखवता? हा दुटप्पीपणा योग्य नाही, उलट हा पैसा मिळावा यासाठी विरोधी पक्षातील लोकांनी आमच्या सोबत केंद्राकडे हा निधी मिळावा यासाठी मागणी केली पाहिजे.

कोरोना संकटामुळे राज्य अडचणीत असतांना मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून आपण सीआरए फंड उभारण्याचा प्रयत्न केला. पण विरोधी पक्षाच्या आमदारांनी आपला निधी पंतप्रधान केअर फंडात दिला, त्यामुळे राज्याचे १ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. एकीकडे कोरोनाचे संकट असतांना राज्यावर नैसर्गीक संकटही ओढावले. यातून शेतकरी, सर्वसामान्यांना मदत करता यावी यासाठी केंद्राकडे १ हजार कोटींची मागणी केली तर केंद्राने केवळ २६० कोटी रुपये दिले.

म्हणेज राज्याला मदत करतांना देखील केंद्राकडून राजकारण केले गेले. मग पुन्हा मला माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या कवितांचे शब्द आठवतात. ते म्हणायचे बांधाये बहुत आयेगी, लेकीन देश का लोकतंत्र अमर रहना चाहिये, पण त्यांचे हे शब्द कागदावरच राहिले, असे दुर्दैवाने दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच्या वागणूकीवरून म्हणावे लागते, असा चिमटा देखील रोहित पवार यांनी काढला.

कोरोनाचे संकट असतांना सुद्धा महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वीस हजार कोटींची कर्जमाफी दिली. यापैकी १९ हजार पाचशे कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात देखील जमा झाले आहेत. भाजपने केलेल्या कर्जमाफी पेक्षा अधिकची माफी आमच्या सरकारने दिली असल्याचा दावा रोहित पवार यांनी आपल्या भाषणात केला.

तुम्ही सेल्फी काढल्या, आम्ही काम केले..

कोरोना काळात भ्रष्टाचार झाला, या विरोधकांच्या आरोपाचा देखील रोहित पवार यांनी समाचार घेतला. कोल्हापूर, सांगलीत जेव्हा पुराचे संकट आले, तेव्हा राज्यातील तेव्हाचे सत्ताधारी भाजपचे नेते दिल्लीत जाऊन बसले होते, जे मदत करायला आले ते मदतीपेक्षा सेल्फी घेण्यात दंग होते. आम्ही आणि सरकारमधील प्रत्येक मंत्री, आमदार हा आपापल्या भागात कोरोना रुग्णांची काळजी घेत होता, त्यांना मदत करत होता. राज्याचे आरोग्य मंत्री तर आई आजारी असतांना देखील लोकांची सेवा करत होते. कदाचित आम्ही आमचे काम लोकांपर्यत पोहचवण्यात, प्रसिद्धीत कमी पडलो असूत, असा टोलाही पवार यांनी लगावला.

कोरोनाचा सामना करत असातंना आम्ही महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात, गावाला पाठवण्यासाठी ते आमचे मतदार नसतांना देखील माणुसकीच्या भावनेतून रेल्वेने, बसने पाठवले. त्यासाठी कोट्यावधी उपलब्ध करून दिले. शिवभोजन थाळीवर विरोधाकांकडून टीका केली जातेयं, पण याच शिवभोजन थाळीने लाॅकडाऊन आणि कोरोनामुळे रोजगार, हाताचे काम गेलेल्या लाखो गरजुंना आधार दिला.

उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढवी यासाठी सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले आणि वर्षभरात १९ हजार ८६५ कोटी रुपयांची गुतंवणूक एफडीआयच्या माध्यमातून राज्यात झाल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. परंतु केंद्र सरकारने राजकारण करत महाराष्ट्राच्या हक्काचे आयएफसी सेंटर गुजरातला हलवले, ते महाराष्ट्रात यावे यासाठी विरोधकांनी देखील सोबत येऊन प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील रोहित पवार यांनी भाषणाच्या शेवटी केले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख