सत्तारांनी जे आधी मिळवले ते भुमरेंना सोळा महिन्यांनी मिळाले.. - Bhumre got what the Sattar got earlier after sixteen months. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

सत्तारांनी जे आधी मिळवले ते भुमरेंना सोळा महिन्यांनी मिळाले..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 एप्रिल 2021

कॅबिनेट मंत्री असूनही त्यांना पालकमंत्री पद मिळाले नव्हते. आता उशीरा का होईना भुमरे यांचा पालकमंत्री पदासाठी विचार झाला.

औरंगाबाद ः राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पैठण विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून येण्याचा विक्रम असलेल्या शिवसेनेचे संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. अर्थात त्यांना स्वःताच्याच पक्षातून संजय शिरसाट आणि ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या अब्दुल सत्तार यांच्यांशी स्पर्धा करावी लागली. पण पक्षनिष्ठा आणि वियजातील सातत्य या जोरावर भुमरे यांनी बाजी मारली. पण राज्यातील पालकमंत्र्यांच्या नेमणूका झाल्या तेव्हा मात्र भुमरे यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले.

या उलट पक्षात येताच राज्यमंत्री पद आणि धुळे- नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद पटकावत सत्तार यांनी भुमरे यांच्यावर कुरघोडी केल्याचे दिसून आले होते. राज्याचे रोहयो मंत्री म्हणून काम करत असतांना कोरोनाचे मोठे संकट असल्याने भुमरे यांना फार काम करण्याची संधी मिळाली नाही. आता राज्यातील सत्तांतरानंतर तब्बल १६ महिन्यांनी भुमरे यांना विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले.

शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर  विस्कटलेली घडी बसवण्यासाठी भुमरे यांच्याकडे हे पद देण्यात आल्याचे बोलले जाते. सध्या यवमाळ जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सरासरी दररोज २० कोरोना बाधितांचा मृत्यू या जिल्ह्यात होत असल्याचे सांगितले जाते. अशा पार्श्वभूमीवर तेथील सरकारी यंत्रणा आणि करायवयाच्या उपयायोजना यांना वेग देण्यासाठी शिवसेनेने संदीपान भुमरे यांच्याकडे यवतमाळचे पालकत्व दिल्याची चर्चा आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्याने संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून पालकमंत्री पद रिक्त होते. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर यवतमाळचे पालकमंत्री पद काॅंग्रेसला मिळावे यासाठी देखील प्रयत्न केले गेले. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांचे नाव त्यासाठी चर्चेत होते. परंतु संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर यवतमाळ व एकंदरितच विदर्भात पक्ष म्हणून शिवसेनेचे झालेले नुकसान या नव्या नियुक्तीने भरून काढण्याचा पक्ष नेतृत्वाचा प्रयत्न आहे.

दोन मंत्री, पण पालकमंत्री मुंबईचाच

संदीपान भुमरे यांना यापुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ आॅगस्ट, २६ जानेवारी, १ मे महाराष्ट्र दिन अशा शासकीय ध्वजारोहणाच्या दिवशी झेंडा फडकवण्याचा मान म्हणून गडचिरोली जिल्ह्यात पाठवले होते. परंतु कॅबिनेट मंत्री असूनही त्यांना पालकमंत्री पद मिळाले नव्हते. आता उशीरा का होईना भुमरे यांचा पालकमंत्री पदासाठी विचार झाला. औरंगाबाद जिल्ह्यात कधी नव्हे ते शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून आले. राज्यातील सत्तातंरानंतर औरंगाबाद जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार का? मिळाले तर कॅबिनेट मिळणार की मग राज्यमंत्री पद याचीही  उत्सूकता होती.

पण उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्याला दोन मंत्री पदे दिली. कॅबिनेट मंत्री करत भुमरे यांना न्याय दिल्याची भावना तेव्हा त्यांच्या समर्थकांमध्ये होती. जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील भुमरे यांना मिळेल, अशी चर्चा त्यावेळी होती. पण मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादवर मुंबईहून लक्ष ठेवता यावे यासाठी ठाकरे यांनी आपल्या विश्वासातील खास असलेल्या सुभाष देसाई यांना पालकमंत्री म्हणून नेमले.

तर विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षात आलेल्या सत्तार यांना धुळे- नंदुरबारचे पालकमंत्री केले. त्यामुळे भुमरेंना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्यानंतरही त्यांना पालकमंत्री न करता ती संधी बाहेरून आलेल्या सत्तारांना आधी मिळाल्याची चर्चा आणि नाराजी त्यांच्या समर्थकांमध्ये होती. आता सोळा महिन्यांनी का होईना, भुमरेंना यवतमाळचे पालकमंत्री करण्यात आले आहे. आता ते किती दिवस पालकमंत्री राहतात, की प्रभारी ठरतात हे लवकरच कळेल.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख