चांगल्या योजनेची अधिकाऱ्यांनी लावलेली वाट पाहून भुजंगरावांना दुःख झाले होते.. - Bhujangrao was saddened by the officials for a good plan | Politics Marathi News - Sarkarnama

चांगल्या योजनेची अधिकाऱ्यांनी लावलेली वाट पाहून भुजंगरावांना दुःख झाले होते..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

या योजनेचे धोरण ठरवणाऱ्या नेत्यांनी वैयक्तिक अनुदानाऐवजी दलितांना सामुहिक लाभ मिळतील अशा योजनांवर भर द्यावा.

औरंगाबाद : निवृत्त सनदी अधिकारी आणि मराठवाड्यासह राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले भुजंगराव कुलकर्णी यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले. स्वातंत्र्यपूर्व हैदराबाद संस्थानात १९३९ मध्ये प्रशासकीय नोकरीतून आपल्या कारकीर्दीचा श्रीगणेशा केल्यांनतर १९७४ च्या अखेरीस राज्याच्या सिंचन विभागाचे  सचिव म्हणून ते निवृत्त झाले होते. या दरम्यान आलेल्या अनेक चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी त्यांनी लिखीत स्वरुपात आपल्या पुस्तकात ठेवली आहे. औरंगाबादेत काम करतांना आपल्या एका चांगल्या योजनेची कशी वाट लावली गेली, याचा कटू अनुभवही त्यांनी लिहून ठेवला आहे. 

मी मराठवाडा आणि महाराष्ट्र या पुस्तकातील एक प्रसंग आणि त्याबद्दलची खंत व्यक्त करतांना भुजंगराव कुलकर्णी म्हणतात, भारतीय राज्य घटनेने दलितांच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची तरतूद केली आहे. या शिवाय राज्याच्या विशेष घटक योजनेतून देखील अनेक लाभ गोर-गरीब दलित जनतेला दिला जातो. राज्याच्या एकूण भांडवली तरतुदीतून दलितांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हा निधी राखीव ठेवला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून हा निधी राज्य सरकारकडून खर्च केला जातो.

परंतु दुर्दैवाने विशेष घटक योजनेतील बहुतांश निधी हा वैयक्तिक पातळीवर अनुदानाच्या स्वरुपात खर्च केला जातो. पण यात काही मध्यस्थ शिरून भागीदार होतात, त्यामुळे यांचा पुर्ण लाभ खऱ्या माणसापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे या योजनेचे धोरण ठरवणाऱ्या नेत्यांनी वैयक्तिक अनुदानाऐवजी दलितांना सामुहिक लाभ मिळतील अशा योजनांवर भर द्यावा.

औरंगाबादेत जिल्ह्याच्या विशेष घटक योजनांचा लाभ देणाऱ्या समितीमध्ये मी होतो. तेव्हा एका बैठकीत मी दलित मुला-मुलीसाठी पाॅलिटेक्नीक काॅलेज सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. समितीने देखील तो चांगला असल्याचे सांगत तातडीने ५० लाखांची तरतूद केली. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीमध्ये हा प्रस्ताव समोर आला तेव्हा डीपीडीसीने देखील प्रस्तावाला पंसती दर्शवत निधीमध्ये वाढ करून तो एक कोटी रुपये केला.

पुढे हा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयात गेला, तिकडून काही आक्षेप नोंदवण्यात आले, त्याला समितीचा सदस्य म्हणून मी उत्तरे दिली. मी स्वःत मंत्रालयात जाऊन सहसचिवांची भेट घेतली. योजनेची उपयुक्तता आणि महत्व त्यांना पटवून दिले. पण याजनेला काही मान्यता मिळाली नाही आणि नियोजित निधी वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या अनुदानानूसार खर्च झाला.

चांगल्या योजनेचीही हितसंबंधामुळे कशी वाट लागते याचा अनुभव मी घेतला. ती योजना मान्य न झाल्याचे दुःख माझ्या इतके फार कमी लोकांना झाले असावे, अशी खंत भुजंगराव यांनी व्यक्त केली होती.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख