भास्कर जाधव यांनीच शिवी दिली;अभिमन्यू पवार यांचा दावा.. - Bhaskar Jadhav himself swears, claims Abhimanyu Pawar .. | Politics Marathi News - Sarkarnama

भास्कर जाधव यांनीच शिवी दिली;अभिमन्यू पवार यांचा दावा..

जगदीश पानसरे
सोमवार, 5 जुलै 2021

भाजपचे संख्याबळ कमी करून मग विधानसभा अध्यक्षांची निवडणूक सरकारला घ्यायची आहे.

औरंगाबाद ः तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृहात येऊन त्यांच्या दालनात झालेल्या प्रकाराबद्दल जी माहिती दिली ती चुकीची आणि खोटी होती. भाजपच्या कुठल्या सदस्याने त्यांना शिवी दिली नाही, उलट त्यांनीच आम्हाला शिवी दिली. (Bhaskar Jadhav himself swears, claims Abhimanyu Pawar) त्या केबिनमध्ये सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा, असे आव्हान मी त्यांना दिले आहे, अशी माहिती भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सरकारनामाशी बोलतांना दिली.

सभागृहात वेलमध्ये येऊन गोंधळ घालत तालिका अध्यक्षांचा माईक हिसकावून त्यांना धक्काबुक्की, राजदंड पळवण्याचा प्रयत्न व उपाध्यक्षांच्या दालनात शिवीगाळ झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. (Bjp Mla Abhimanyu Pawar) यामध्ये लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचा देखील समावेश आहे.

नेमक उपाध्यक्षांच्या दालनात काय घडलं, या संदर्भात बोलतांना पवार म्हणाले, सभागृहात ओबीसी आरक्षण व इम्पेरिकल डाटा केंद्र देत नाही हे सांगून सरकारकडून जनतेचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांना बोलू दिले जात नव्हते. म्हणून आम्ही आक्रमक झालो होतो.

कुठलाही  प्रस्ताव सभागृहात मांडण्याआधी त्यावर चर्चा व विरोधी पक्षाला बोलण्याची संधी दिली जाते. पण तालिका अध्यक्षांनी विरोधी पक्षाला बोलूच दिले नाही. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. पण ते कारण पुढे करत माझ्यासह १२ आमदारांचे निलंबन हा या सरकारचा ठरवून केलेला कार्यक्रम होता.

विरोधकांची संख्या घटवण्यासाठीच कारवाई..

भाजपचे संख्याबळ कमी करून मग विधानसभा अध्यक्षांची निवडणूक सरकारला घ्यायची आहे. परंतु विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात जो प्रकार घडला, त्याबद्दल भास्कर जाधव यांनी सभागृहात येऊन जी माहिती दिली, ती धादांत खोटी होती.

भाजपच्या कुठल्याच आमदाराने जाधव यांना शिवीगाळ केली नाही, उलट त्यांनीच आम्हाला शिवीगाळ केली. त्यामुळे तेव्हाचे केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासा असे खुले आव्हान मी त्यांना दिले आहे. निलंबनाची झालेली कारवाई ही एकतर्फी आणि लोकशाहीला काळीमा फासणारी असल्याचेही पवार म्हणाले.

विरोधी पक्षाच्या आमदारांना निलंबित करून सरकारला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेता येणार नाही, असा दावा देखील पवार यांनी केला आहे.

हे ही वाचा ः निलंबित आमदार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकणार का?

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख