सत्तार यांच्यापासून सावध राहा, नितीन पाटील यांना खैरेंचा सल्ला..

जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे संपर्क कार्यालय गाठत त्यांची भेट घेतली.
Shivsena Leader Chandrakant Khaire -District Bank Chairman Nitin Patil News Aurangabad
Shivsena Leader Chandrakant Khaire -District Bank Chairman Nitin Patil News Aurangabad

औरंगाबाद ः अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर आज अचानक नितीन पाटील यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली. शेतकऱ्यांच्या हिताचे काम करा, तुमच्या वडिलांनी चागंले काम केले, मी नेहमीच त्यांना सहकार्य केले, तुमच्याही पाठीशी उभा राहीन, पण तुमच्या मागे खूप शुक्लकाष्ठ आहे, तेव्हा सावधपणे कारभार करा, सत्तार यांच्यापासून सावध राहा, असा वडिलकीचा सल्ला चंद्रकांत खैरे यांनी नितीन पाटील यांना या भेटीत दिला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. कुरघोडीचे राजकारण झाले, अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावरून नाट्यही रंगले. आरोप-प्रत्यारोप, गद्दारीचा आरोप व भविष्यात फळ भोगावे लागेल असा इशारा देखील देण्यात आला. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत अगदी शेतकरी सहकार पॅनल तयार करण्यापासूनच शिवसेनेत मतभेद होते हे समोर आले होते. सत्तार, भुमरे, दानवे यांनी भाजपला सोबत घेतल्याने चंद्रकांत खैरे यांनी या तिघांवर टीका केली होती.

परंतु या टीकेला न जुमानता या तिन्ही नेत्यांनी भाजपमध्ये असलेल्या नितीन पाटील यांचा शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रवेश करवून घेतला आणि काल झालेल्या निवडणुकीत त्यांना बिनविरोध अध्यक्षही केले. इतपर्यंत सगळं काही सुरळीत सुरू असतांना उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून शिवसेनेत फूट पडली आणि भुमरे, दानवे यांनी संताप व्यक्त करत बॅंकेतून काढता पाय घेतला.

या घडामोडीनंतर आज दुपारी जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे संपर्क कार्यालय गाठत त्यांची भेट घेतली. खैरे यांनी देखील नितीन पाटील यांना पेढा भरवत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी पाटील यांना काही सल्ले देखील दिले. सुरेश पाटील यांनी जिल्हा बॅंक कशी यशस्वीपणे सांभाळली, संकटातून बाहेर काढली या जुन्या आठवणींना उजाळाही दिला.

जिल्हा बॅंकेचा कारभार करतांना माझे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, कधीही काही अडचण असली तर बोलवा मी मदत करायला तयार आहे, असा शब्द खैरे यांनी यावेळी नितीन पाटील यांना दिला. राज्यमंत्री अब्दुल सत्तार व बॅंकेच्या काही संचालकांपासून सावध राहा, तुम्हाला कधीही धोका होऊ शकतो, असा इशारा देखील खैरे यांनी यावेळी दिला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com