Beed districts five candidate sucsess in upsc exam | Sarkarnama

बीडच्या पंचरत्नांचा युपीएससीत डंका

दत्ता देशमुख
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

युपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत नावलौकिक मिळवला आहे. यात मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर या भागातील विद्यार्थ्यांनी देखील आपल नाणं खणखणीत असल्याचे सिध्द केले.

बीड : भारतीय लोकसेवा आयोगाच्या (आयएएस) परीक्षेत बीडच्या पंचरत्नांनी यशाचा डंका वाजविला आहे. मंदार पत्कीने पहिल्या प्रयत्नात यशाला गवसणी घालत २२ वा रँक मिळविला, तर, जयंत मंकले यानेही अंधत्वावर मात करत १४३ रँकसह युपीएससीचा डोंगर सर केला. त्यांच्यासह नेहा किर्दक, डॉ. प्रसन्न लोध, वैभव वाघमारे यांनीही युपीएससीत यश मिळविले आहे. एकाचवेळी जिल्ह्यातील पाच जणांनी युपीएससीत यश मिळवत नेत्रदिपक कामगिरी केल्याबद्दल या सर्वांचे कौतुक होत आहे.

युपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत नावलौकिक मिळवला आहे. यात मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर या भागातील विद्यार्थ्यांनी देखील आपल नाणं खणखणीत असल्याचे सिध्द केले. बीड शहरातील मंदार पत्की याने पुणे येथून अभियांत्रिकी पदविका व पदवीचे शिक्षण पुर्ण करुन भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. अवघ्या २३ व्या वर्षी त्याने पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली, त्याला २२ वा रँक मिळाला आहे. निवृत्त अभियंता जयंत पत्की यांचा तो मुलगा आहे.

अंधत्वावर मात, रॅंकमध्येही झेप..

शहरातीलच जयंत किशोर मंकले यानेही अंधत्वावर मात करत भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा फडकवला. १४३ व्या रॅंकसह तो यशस्वी ठरला आहे.  मागच्या वेळी ज्याला ९३७ वा रँक मिळाला होता. परंतु एवढ्याने समाधान न झाल्याने जंयत याने आणखी मेहनत घेत रात्रंदिवस अभ्यास केला आणि ९३७ वरून थेट १४३ रॅंकवर उडी घेतली.

आडस (ता. केज) येथील नेहा लक्ष्मण किर्दक हिनेही युपीएससी परीक्षेत यश मिळविले असून तीला ३८३ वा रँका मिळाला आहे. सामान्य कुटूंबातील नेहाने मेहनत व अभ्यासाच्या बळावर यश संपादन केले. या शिवाय डॉ. प्रसन्न लोध यांनीही युपीएससीत यश मिळविले असून मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुग्णालयातून वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) घेतल्यानंतर त्यांनी याच ठिकाणी दोन वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणूनही काम केले.

पुढे २०१७ ला राजीनामा देऊन त्यांनी नवी दिल्ली गाठून भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. दोन परीक्षांत त्यांना अपयशाचे तोंड पहावे लागले. मात्र, न खचता त्यांनी मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर अभ्यास सुरु ठेवला आणि २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेत यश मिळवलेच. त्यांच्या पत्नी अनु यांनी त्यांना यासाठी प्रोत्साहन दिल्याचे प्रसन्न सांगतात.

अपयशावर मात..

अंबाजोगाई तालुक्यातील नांदडी येथील मुळ रहिवाशी व अंबाजोगाईत स्थायिक असलेल्या वैभव वाघमारे यानेही भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ७७१ वी रँक मिळविली. वडिल विकास व आई आशा दोघेही शिक्षक आहेत. पुण्याच्या सिओइपी महाविद्यालयातून त्याने मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर २०१८ मध्ये युपीएससीची परीक्षा दिली होती. मात्र, त्यांना अपयश आले, पण निराश न होता त्यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेत यश मिळविले.
 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख