जिल्हा बॅंक निवडणुकीत बागडेंचा गेम, पॅनल आले, पण नाना पराभूत..

जिल्हा बॅंकेच्या राजकारणात सर्वात अनुभवी असलेले हरिभाऊ बागडे हे बाहेर फेकले गेले आहेत. बागडे यांचा शिवसनेने गेम केला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Aurangabad District Bank Election News
Aurangabad District Bank Election News

औरंगाबाद : राज्याचे लक्ष लागून असलेल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. गेली २५ वर्ष बॅंकेच्या संचालक मंडळात असलेले भाजपचे विद्यमान आमदार व ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. सहकारात वय नाही, तर अनुभव महत्वाचा असतो असे म्हणत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना तुम्हाला सहकारातलं काय कळतं असे सडेतोड उत्तर देणारे बागडेच आज पराभूत झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे जिल्हा बॅंक निवडणूकीत शिवसेना- राष्ट्रवादी व भाजपच्या शेतकरी विकास पॅनलची मात्र सरशी झाली आहे.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकारण चांगलेच गाजले. मतदानाच्या दोन दिवसाआधी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शेतकरी विकास पॅनलचे कर्तेधर्ते शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार व शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी भाजपला सोबत घेत पॅनल उभे केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. एवढ्यावरच ते थांबले नव्हते तर त्यांनी उघडपणे काॅंग्रेसच्या शेतकरी सहकार बॅंक विकास पॅनलला पाठिंबा दर्शवत त्यांच्यासाठी प्रचार देखील केला.

रविवारी (ता.२१) जिल्हा बॅंकेच्या १८ संचालकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आज सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला तेव्हा सुरूवातीपासूनच शिवसेना- राष्ट्रवादी- भाजपच्या शेतकरी विकास पॅनलला दणदणीत यश मिळाले. सात पैकी सहा जागा जिंकत शेतकरी विकास पॅनल एकतर्फी विजय मिळवणार की काय? असे वाटत असतांना दुपारी धक्कादाय निकाल हाती आला. गेली अनेक वर्ष सहकार क्षेत्रात यशस्वीपणे काम करत असलेल्या आमदार हरिभाऊ बागडे यांचा बिगरशेती संस्था मतदारसंघातून पराभव झाला.

दानवे, सतीश चव्हाण यांची एन्ट्री..

एकीकडे हरिभाऊ बागडे यांचा जिल्हा बॅंक संचालक मंडळ निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे. तर दुसरीकडे सहकार क्षेत्रातील पहिलीच निवडणूक लढवत असलेले शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे, मराठवाडा पदवीधरचे राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण हे मात्र विजयी झाले आहेत. या विजयाने या दोन्ही विद्यमान आमदारांचा जिल्हा बॅंकेच्या राजकारणात प्रवेश झाला आहे.

शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे हे यापुर्वीच बिनविरोध निवडूण आले आहेत. तर राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे कृषी पणन व शेत माल प्रक्रिया संस्था मतदारसंघातून ३३ मते घेऊन दणदणीत विजयी झाले आहेत. एकंदरित जिल्हा बॅंकेच्या राजकारणात सर्वात अनुभवी असलेले हरिभाऊ बागडे हे बाहेर फेकले गेले आहेत. बागडे यांचा शिवसनेने गेम केला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com