अशोक चव्हाण म्हणतात, पेट्रोलच्या शंभरीसाठी फक्त १.५७ रुपये बाकी.. - Ashok Chavan says, only Rs.१.५७ just near About Fuel prize for Hundred.. | Politics Marathi News - Sarkarnama

अशोक चव्हाण म्हणतात, पेट्रोलच्या शंभरीसाठी फक्त १.५७ रुपये बाकी..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

अशोक चव्हाण यांनी देखील ट्विटवरून वाढत्या पेट्रोलच्या किंमतीवर केंद्र सरकारला चिमटा काढला आहे. पेट्रोल दराची शंभरी गाठण्यासाठी आता फक्त १.५७ रुपयेच बाकी असल्याचे चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

औरंगाबाद ः देशातील वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमंतीवरून राज्यातील नेते केंद्र सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाहीयेत. सार्वजनिक बांधकामंत्री काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी देखील ट्विटवरून वाढत्या पेट्रोलच्या किंमतीवर केंद्र सरकारला चिमटा काढला आहे. पेट्रोल दराची शंभरी गाठण्यासाठी आता फक्त १.५७ रुपयेच बाकी असल्याचे चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

गेल्या महिनाभरापासून देशातील पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या किंमती भडकल्या आहेत. यावर राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना, काॅंग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने, आंदोलने करत संताप व्यक्त केला. हेच का मोदींचे अच्छे दिन, असा टोला देखील विरोधकांकडून भाजपला लगावण्यात येत आहे.

पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या मनात संतापाची भावना आहे, तर या दरवाढीला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत राज्यातील सत्ताधाऱ्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. काॅंग्रेस नेते व मंत्री अशोक चव्हाण यांनी यावरून भाजपवर निशाणा साधणारे एक ट्विट नुकतेच केले  आहे.

यात पेट्रोलला शंभरी गाठण्यासाठी आता फक्त १ रूपया ५७ पैसेच शिल्लक असल्याचे खोचक ट्विट चव्हाण यांनी केले आहे. या सोबतच महाराष्ट्रात सर्वाधिक ९८.४३ पैसे इतका पेट्रोलचा दर मराठवाड्यातील परभणीत असल्याचे देखील त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. एकीकडे पेट्रोलचे दर शंभरी गाठत आहे तर दुसरीकडे भाजपकडून मात्र या भाववाढीसाठी महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याची टीका केली जातेय.

राज्य सरकारने पेट्रोलवर लावलेले विविध कर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी काही दिवसांपुर्वीच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. शिवसेनेवर टिका करतांना आंदोलनांची नौटंकी न करता त्यांनी त्याच्या जे हातात आहे ते करावे, कर कमी करावे, आमची सत्ता असतांना आम्ही ते केले होते आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीचा बोझा जनतेवर येऊ दिला नव्हता, असा दावा देखील केला होता.

एकीकडे राज्यातील भाजपचे नेते पेट्रोल-डिझेल दरवाढीचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे इंधनाच्या दरात रोजच वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे राज्यातील भाजपच्या नेत्यांची देखील फजिती झाली आहे. अशोक चव्हाण यांनी वरील ट्विट करत भाजपच्या राज्यातील नेत्यांना एक प्रकारे चिमटाच काढल्याचे या ट्विटवरून दिसून येते.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख