अशोक चव्हाण शासकीय मालमत्तेला स्वतःची समजत आहेत?

अशोक चव्हाण यांनी सत्तेचा दुरुपयोग करुन शासकीय मालमत्तेच्या दगडावर स्वत:चे नाव कोरले असले तरी नांदेड जिल्ह्यातील जनतेच्या ‍हदयात माझे नाव कोरलेले आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेने प्रचंड मतांनी खासदार म्हणून निवडून दिले आहे, याचे भान पालकमंत्र्यांनी ठेवायला पाहिजे.
mp chikhlikar and aschok chavan news nanded
mp chikhlikar and aschok chavan news nanded

नांदेड - पालकमंत्री अशोक चव्हाण आणि भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे.  यावेळी निमित्त होते नांदेडला नवीन शासकीय रुग्णालय तसेच सीटी स्कॅन विभागाच्या उद्‍घाटनाचे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी रुग्णालयाचे उद्‍घाटन झाले. मात्र, या कार्यक्रमास नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना डावलण्यात आल्याने ते चांगलेच संतापले. अशोक चव्हाण जिल्ह्यातील शासकीय मालमत्ता स्वतःची खाजगी मालमत्ता असल्याच्या अविर्भावात वावरत असून सत्तेचा दुरूपयोग करत असल्चा आरोप चिखलीकर यांनी केला आहे.

राज्याचे बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या दबावाला बळी पडून जिल्हा प्रशासनाने राजशिष्टाचाराचा भंग केला आहे. विरोधी पक्षाच्या खासदार व विधानपरिषद सदस्यांना डावलून दोनशे खाटांच्या नवीन रुग्णालयाचा व सीटी स्कॅन विभागाचा लोकार्पण सोहळा गुपचुपरित्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उरकरण्यात आल्याचा आरोप करत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या प्रकाराचा निषेधही केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करत असताना अशोक चव्हाण यांना सुबुध्दी सुचेल असे वाटले होते परंतु तसे झाले नाही, असा टोला लगावतांनाच चिखलीकर यांनी चव्हाण जिल्हा प्रशासनावर दबाव टाकून राजशिष्टाचार मोडीत काढण्याचा उद्योग करत असल्याची टिका देखील केली. 

गेल्या आठवड्यात अर्धापूर पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले. त्या कार्यक्रमास नांदेडचा खासदार या नात्याने आपणाससह भाजपाच्या विधान परिषद सदस्यांला डावलण्यात आले. शासकीय रुग्णालयाच्या दोनशे खाटांच्या नवीन हॉस्पीटलचा लोकार्पण सोहळाही गुपचुप उरकण्यात आला.

जिल्ह्याचा खासदार या नात्याने या सोहळ्याचे साधे निमंत्रण आपणास देण्यात आले नाही. नांदेडचा खासदार हा विरोधी पक्षाचा असला तरी राजशिष्टाचारानुसार शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण देणे आवश्यक होते. पण जिल्हा प्रशासनाने माझ्यासह विधानपरिषदेचे सदस्यांना डावलून हा लोकार्पण सोहळा उरकून घेतला, या कृतीचा मी तीव्र निषेध करतो, असेही चिखलीकर म्हणाले.

माझे नाव जनतेच्या मनावर कोरलेले..

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण असल्यामुळे शासकीय मालमत्तेच्या इमारतीवर केवळ आपले एकट्याचेच नाव कोरले जावे, या हेतूने त्यांनी खासदाराला डावलून हा कार्यक्रम घेण्याचे फर्मान सोडले आहे.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्तेचा दुरुपयोग करुन शासकीय मालमत्तेच्या दगडावर स्वत:चे नाव कोरले असले तरी नांदेड जिल्ह्यातील जनतेच्या ‍हदयात माझे नाव कोरलेले आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेने प्रचंड मतांनी खासदार म्हणून निवडून दिले आहे, याचे भान पालकमंत्र्यांनी ठेवायला पाहिजे, असा टोलाही खासदार चिखलीकर यांनी लगावला या निमित्ताने लगावला.

लोकसभेत त्यांना त्यांची जागा जनतेने दाखवून दिल्यानंतरही त्यांना शहाणपणा आला नाही हे दुर्देव आहे. जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा खासदार, विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर हे आहेत. राजशिष्टाचारानुसार या लोकप्रतिनिधींना शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण देणे बंधनकारक होते. पण जिल्हा प्रशासनावर दबावतंत्राचा वापर करुन आम्हाला डावलण्यात आल्याचा पुनरुच्चारही चिखलीकर यांनी केला.
 

edited by- jagdish pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com