औरंगाबादेत चोवीस तास ऑक्स‍िजनच्या पुरवठ्यासाठी पथकाची नेमणूक - Appointment of team for smooth supply of oxygen in Aurangabad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

औरंगाबादेत चोवीस तास ऑक्स‍िजनच्या पुरवठ्यासाठी पथकाची नेमणूक

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 एप्रिल 2021

ऑक्सिजनचा आकस्मिक साठा चोविस तास उपलब्ध असणे आवश्यक आहे, यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.

औरंगाबाद:जिल्ह्यातील रुग्णालये तसेच त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या वितरकांनाआवश्यकते नुसार प्रथम प्राधान्य देऊन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, यासाठी पैठण तालुक्यातील चितेगाव येथील आर.एल.स्टील कंपनी अधिग्रहित करण्यात आली आहे.तत्काळ ऑक्स‍िजन पुरवठा करावा यासाठी पुढील आदेशापर्यंत कंपनी अधिग्रहित करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

ऑक्सिजनचा तुटवडा व त्या अभावी रुग्णांचे प्राण जावू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. आवश्यकता भासेल तेव्हा शासकीय रुग्णालये व त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या वितरकांना नियमित ऑक्सिजन मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने एक पथक देखील नेमले आहे. 

अधिग्रहित करण्यात आलेला उत्पादक कंपनीच्या ऑक्सीजन प्लांटमधून शहरातील अथवा जिल्हयातील कोणत्याही हॉस्पिटल, वितरक यांना विनाविलंब ऑक्सिजन पुरवठा करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या कामात कोणताही  निष्काळजीपणा अथवा दुर्लक्ष होणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

या यंत्रणेवर देखरेख करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकातील सनियंत्रण अधिकारी म्हणून प्रादेशिक पर्यटन महामंडळाचे उपसंचालक श्रीमंत हारकर  व सह-आयुक्त औषधे अन्न व औषध प्रशासन,औरंगाबाद यांच्याशी समन्वय ठेवून वेळोवेळी अहवाल सादर करण्याचा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

कोविड बाधित रुग्णांस व अशा रुग्णांवर उपचार करणारे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडिकेटेड कोविड केअर सेंटर  यांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन लागतो. मार्च महिन्यात वाढलेली ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता भविष्यात औरंगाबाद जिल्हयात व औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी ऑक्सिजनचा (जम्बो सिलेंडरच्या स्वरुपात) आकस्मिक आवश्यकते प्रमाणे तत्काळ उपलब्ध होणे बंधनकारक असल्याचे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. 

पुरवठ्या पेक्षा मागणी अधिक..

कोविड१९ प्रथम लाटेच्या वेळी व मार्च २०१२ मध्ये काही वेळा पुरवठयापेक्षा ऑक्सिजनची मागणी वाढल्यामुळे निकडीची परिस्थिती उद्भवली होती. जिल्हयामध्ये ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढल्यामुळे ऑक्सिजनचा आकस्मिक साठा चोविस तास उपलब्ध असणे आवश्यक आहे, यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.

ऑक्सिजन उत्पादकांनी जम्बो सिलेंडर वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार व जिल्ह्यातील कोविड रुग्णालयाच्या, वितरकांच्या ऑक्सिजनच्या आवश्यकतेनुसार प्रथम प्राधान्य देऊन तत्काळ पुरवठा करावा, यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे, मनोज तलवारे, एरोनॉटिकल इंजिनियरिंग विभाग शासकीय तंत्र निकेतन औरंगाबाद हे पथकाचे  संनियंत्रण अधिकारी असतील.

या शिवाय.जि.द.जाधव,औषध निरीक्षक,अन्‍न व औषध प्रशासन हे  वितरक,रुग्णालय यांची मागणी नोंदविणे व प्‍लांट मधून होणारे वितरण व वितरीत ऑक्‍सीजन सिलेंडरची संख्‍या या बाबतचा अहवाल प्रशासनाला सादर करतील. शी.गो.देशमुख, लिपीक,अन्‍न व औषध प्रशासन, डी.डी.महालकर,तलाठी
रांजनगाव खुरी ता.पैठण,जि.औरंगाबाद, व बी. डी. राठोड ग्रामसेवक, पैठण यांचा देखील या पथकात समावेश असणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख