कोरोना निदानासाठी ॲन्टीजेन चाचणी बेभरवशाची, आरपीटीसीआरच करा.. - Antigen testing for corona is unreliable, just do RPTCR. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

कोरोना निदानासाठी ॲन्टीजेन चाचणी बेभरवशाची, आरपीटीसीआरच करा..

माधव इतबारे
मंगळवार, 13 एप्रिल 2021

ॲन्टीजेन चाचणीत निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर आरटीपीसीआर चाचणीत तब्बल ७०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यासाठी शहरात आरटीपीसीआर व ॲन्टीजेन पद्धतीच्या चाचण्या केल्या जात आहेत. पण ॲन्टीजेन चाचण्या शंभर टक्के परिणामकारक नसल्याचे वारंवार समोर आले आहे. ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये निगेटिव्ह आल्यानंतर आरटीपीआर चाचण्यांमधून तब्बल ७०७ जण पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.

शहरात गतवर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर सुरवातीस बाधितांच्या संपर्कातील प्रत्येकाची आरटीपीआर चाचणी केली जात होती. आयसीएमआरने या चाचणीला गोल्ड सॅन्डर्ड मानले आहे. पण नंतर तातडीने रिझल्ट देणाऱ्या रॅपीड ॲन्टीजेन चाचण्यांचा प्रकार समोर आला.

आरटीपीसीआर चाचण्यांचा निकाल येण्यासाठी पूर्वी २४ तास लागत होते तर आता १२ तासात निकाल मिळतो. संसर्ग झालेल्या रुग्णांना तातडीने बाजूला करून त्यांच्यापासून होणारा संभाव्य धोका कमी करण्यासाठी ॲन्टीजेन चाचण्यांना प्राधान्य दिले जात आहे.

असे असले तरी कोरोनाबाधिताच्या क्लोज संपर्कातील व्यक्तीच्‍या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातात. ॲन्टीजेन चाचणीत निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर आरटीपीसीआर चाचणीत तब्बल ७०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

ॲन्टीजेनचे प्रमाण अधिक

महापालिकेने केलेल्या चाचण्यांमध्ये आरटीपीसीआरपेक्षा ॲन्टीजेन चाचण्यांचे प्रमाण जास्त आहे. महापालिकेने आत्तापर्यंत सहा लाख २५ हजार ६१३ चाचण्या केल्या आहेत. त्यातील चार लाख ३४ हजार ८९४ जण निगेटिव्ह आले असून, ७१ हजार ९९७ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. यातील निम्म्यापेक्षा जास्त चाचण्या ॲन्टीजेन पद्धतीच्या आहेत.

ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आरटीपीसीआर चाचणीत ७०७ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे संशयितांनी ॲन्टीजेन चाचण्यांच्या भरवशावर न राहता शंभर टक्के परिणामकारक असलेली आरटीपीसीआर चाचणी देखील करून घ्यावी, असा सल्ला महापालिकेच्या आरोग्य अधिकारी निता पाडळकर यांनी केले आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख