लाॅकडाऊनच्या विरोधात मोर्चाची घोषणा, अन् सत्ताधाऱ्यांची गोची

इम्तियाज जलील यांच्या लाॅकडाऊन विरोधातील मोर्चाच्या घोषणेनंतर त्यांना समाज माध्यामातून मोठा पाठिंबा मिळत आहे. लोकांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतांनाच सत्ताधाऱ्यांच्या गप्प बसण्याच्या भूमिकेवर देखील आश्चर्य व्यक्त केले आहे.
Mim Mp Imtiaz Jalil- Morcha Agianst Lockdowun News Aurangabad
Mim Mp Imtiaz Jalil- Morcha Agianst Lockdowun News Aurangabad

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची वाढती संख्या अन मृतांचे प्रमाण यावर प्रशासनाने ३१ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान कडक लाॅकडाऊनची घोषणा केली. व्यापारी, उद्योजक, छोटे-मोठे व्यावसायिक, हातावर पोट असणारे, फळ- भाजीपाला विक्रेते ते सर्वसमान्य नागरिक या पैकी कुणालाही लाॅकडाऊन नको आहे. तरी देखील प्रशासनाने लाॅकडाऊनची घोषणा केल्याने एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्याला आक्रमकपणे विरोध केला.

एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर लाॅकडाऊनच्या विरोधात ३१ मार्च रोजी मोर्चा काढण्याची घोषणा करत यात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन देखील केले. त्यांच्या या भुमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत असले तरी त्यांच्या मोर्चा काढण्याच्या निर्णयाने सत्तेत असलेले काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व विरोधी पक्ष असलेल्या भाजपची गोची झाली आहे.

कोरोना संकट आणि त्यामुळे लागलेल्या लाॅकडाऊनने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले होते. अनेकांचे रोजगार, उद्योग, व्यवसाय बुडाले, हातावर पोट असणाऱ्यांवर तर उपासमारीची वेळ आली. कोरोना प्रादुर्भाव कमी झाला तशी राज्य सरकारने मिशन बिगिन अंतर्गत हळूहळू सूट दिली. कोरोना गेला असे गृहित धरून लोक बेफिकरीने बाहेर पडले.

पोटासाठी बाहेर पडणे गरजेचे होतेच पण कोरोना गेला हा भ्रम बाळगून ज्या निष्काळजीपणाने आपण वागलो त्याच परिणाम म्हणजे आपण दुसऱ्या लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर उभे आहोत. कोरोना रुग्ण व मृतांची वाढती संख्या निश्चितच जनता आणि प्रशासनाला देखील आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

प्रशासनाला यावर लाॅकडाऊन हाच एकमेव पर्याय वाटतोय, तर भाजप, एमआयएम हे विरोधी पक्ष सोडले तर राज्यातील सत्ताधारी पक्षाने यावर हाताची घडी तोंडावर बोट असे धोरण अंवलबले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी सत्ताधारी व विरोधी पक्ष भाजपची ही कोंडी ओळखून एका महत्वाच्या विषयाला हात घातला आहे.

लाॅकडाऊनला लोक वैतागले हे हेरून इम्तियाज यांनी त्याला आरोग्य व वैद्यकीय सेवेचा उडालेला बोजवारा याची जोड देत सर्वसमान्यांची सहानुभूती मिळवली आहे. आता उद्या, इम्तियाज जलील यांच्या मोर्चाला परवानगी मिळणार का? मिळाली नाही तरी ते मोर्चा काढणार का? त्यात प्रत्यक्ष नागरिकांचा किती सहभाग असेल की मग हा फक्त एक इव्हेंट होईल हे लवकरच स्पष्ट होईल.

भाजपचा विरोध, पण मोर्चाचे काय?

इम्तियाज जलील यांच्या लाॅकडाऊन विरोधातील मोर्चाच्या घोषणेनंतर त्यांना समाज माध्यामातून मोठा पाठिंबा मिळत आहे. लोकांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतांनाच सत्ताधाऱ्यांच्या गप्प बसण्याच्या भूमिकेवर देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. लाॅकडाऊन किंवा त्या विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चावर शिवसेना, राष्ट्रवादी, काॅंग्रेसच्या एकाही आमदार, लोकप्रतिनिधीने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. भाजपचा लाॅकडाऊनला विरोध असला तरी ज्या एमआयएमला नेहमी भाजपची बी टीम म्हणून हिणवले जाते, त्या पक्षाच्या मोर्चाला किंवा भूमिकेला पाठिंबा दर्शवणे त्यांना अडचणीचे ठरत आहे.

एकंदरित लाॅकडाऊनच्या विरोधात लोकांमध्ये असलेल्या भावनांना वाट करून देण्यासाठी इम्तियाज जलील यांनी मोर्चाचे माध्यम निवडले आहे. त्यामळे मोर्चा निघाला आणि लाॅकडाऊन संदर्भात जिल्हा प्रशासनाने फेरविचार केला, किंवा त्यात काही बदल केले तर याचे सर्व श्रेय हे एकट्या एमआयएमला जाणार आहे. लाॅकडाऊनच्या निर्णयाचा वापर राजकारणासाठी न होता तो सामान्यांना दिलास देण्यासाठी व्हावा, एवढीच अपेक्षा औरंगाबादकर व्यक्त करत आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com