वेरूळच्या मालोजीराजे भोसले गढीच्या संवर्धनासाठी अमित देशमुख सरसावले - Amit Deshmukh moved for the conservation of Maloji Raje Bhosale fort of Verul | Politics Marathi News - Sarkarnama

वेरूळच्या मालोजीराजे भोसले गढीच्या संवर्धनासाठी अमित देशमुख सरसावले

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

गढीला अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करायला हवेत. पुरातत्त्वीय संकेतानुसार संशोधन करून गढी संदर्भातील माहिती, छायाचित्रे गोळा करावीत.

औरंगाबाद: जगप्रसिद्ध वेरूळ या ठिकाणी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मालोजी राजे भोसले गढीच्या दुरूस्ती व संवर्धनासाठी शासनाकडून तातडीने निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. 

वेरूळ येथील हॉटेल कैलास येथे मालोजी राजे भोसले गढी दुरूस्ती व संवर्धनाबाबत आढावा बैठक देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. मालोजी राजे गढीची बारकाईने पाहणी केल्यानंतर येथील अवशेषांचे जतन करण्याबाबत त्यांनी संबंधितांना निर्देश दिले.

या गढीला अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करायला हवेत. पुरातत्त्वीय संकेतानुसार संशोधन करून गढी संदर्भातील माहिती, छायाचित्रे गोळा करावीत. गढी परिसरातील अवशेषांची माहिती देणारे फलक अवशेषा नजिक लावावेत. गढीचे स्वरूप कसे होते, याबाबत माहिती देणारे ऑडियो, व्हिडिओ गाईडच्या माध्यमातून तसेच प्रतिकृती स्वरूपात प्रदर्शित करण्याबाबत विचार करण्यात यावा असेही अमित देशमुख म्हणाले.

स्थानिक कलावंतांना वाव मिळावा या हेतूने सांस्कृतिक विभागाने पुरातत्त्व विभागाशी समन्वय साधून वारसा स्थळांवर कार्यक्रम सादर करण्याबाबत नियोजन करावे आणि कलावंतांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही त्यांनी  केल्या.

शहाजी महाराज जयंती राज्यस्तरावर साजरी करण्यात यावी, वेरूळ गावालगत असलेल्या सिकमी (डमडम) तलावास राज्य संरक्षित स्मारक घोषित करावे, कर्नाटकातील शहाजी महाराजांच्या समाधी स्थळी शहाजीराजांचा पुतळा उभारण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, शहाजी राजे अध्यासन केंद्र सुरू करावे, इतर राज्याच्या धर्तीवरच स्थानिक कलावंतांना कला सादर करण्यासाठी प्रोत्साहित करावे आदी मागण्या देखील यावेळी अमित देशमुख यांच्याकडे बैठकीत करण्यात आल्या. बैठकीपूर्वी देशमुख यांनी वेरूळ गावातील मालोजी राजे भोसले गढी आणि शहाजी राजे भोसले स्मारकाची पाहणी केली.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख