शिवसेनेचे नाही तर निलंगेकर- देशमुखांचेच सेटिंग : माजी जिल्हाप्रमुखाचा आरोप - amit deshmukh and nilangekar made adjustments not shivsena alleges Kulkarni | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेचे नाही तर निलंगेकर- देशमुखांचेच सेटिंग : माजी जिल्हाप्रमुखाचा आरोप

दीपक क्षीरसागर
शनिवार, 30 जानेवारी 2021

लातूरमधील `सेटिंग` राज्यात चर्चेचे ठरले.

लातूर : आमदार धीरज देशमुख यांच्या लातूर ग्रामीण मतदारसंघांमध्ये शिवसेनेने काँग्रेस सोबत सेटिंग केले होते, असा आरोप भाजपाचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. या आरोपानंतर एकच खळबळ उडाली. शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी या आरोपावर मौन धारण केले असले, तरी लातूरचे माजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्रीपाद उर्फ पप्पू कुलकर्णी यांनी मात्र संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर पलटवार केला.

निलंगेकरांनी आधी आपले राजकारण तपासावे, मग शिवसेनेवर आरोप करावेत. लातूरच्या राजकारणात शिवसेनेचे सेटिंग नाही, तर संभाजी पाटील निलंगेकर व अमित देशमुख यांचेच सेटींग असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

लातूर ग्रामीणची जागा लढण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली होती. ही जागा आम्ही जिंकू शकलो असतो; परंतु मुंबईच्या एका जागेसाठी शिवसेनेने लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेससोबत सेटिंग केली आणि भाजपकडे असलेली ही जागा शिवसेनेने स्वतःकडे घेतली. मात्र शिवसेनेचा उमेदवार प्रचाराला देखील फिरकला नाही. हा एका अर्थाने लोकशाहीचा खून होता. ज्यांनी हे सेटिंग केले त्यांना भविष्यात सोडणार नाही, असा इशारा देत माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघाच्या जागेवरून झालेल्या सेटिंगचा गौप्यस्फोट नुकताच केला होता. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात काॅंग्रेसने कमकुवक उमेदवार देऊन त्याची परतफेड केल्याचा अर्थ निलंगेकर यांच्या वक्तव्यातून निघत होता.

या आरोपानंतर राज्यभरात चर्चा देखील झाली, मात्र निलंगेकर यांच्या आरोपाचे खंडन शिवसेना किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्याकडून करण्यात आले नाही. शिवसेनेचे नेते संजय राऊत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नावर `नो कॉमेंट्स` म्हणत बोलणे टाळले.  त्यानंतर लातूर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पप्पू  कुलकर्णी यांनी या वादात उडी घेत संभाजी पाटील निलंगेकर यांनाच आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.

पप्पू कुलकर्णी म्हणाले, दिवंगत गोपीनाथ मुंडे व विलासराव देशमुख त्यांच्यापासूनच जिल्ह्याच्या राजकारणात सेटिंगची परंपरा सुरू झाली. यातूनच  संभाजी पाटील निलंगेकर  उदयास आले  त्यामुळे त्यांनी  स्वतःच्या राजकारणाचे अवलोकन करावे. पुढे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यस्तरावर आणि विलासराव देशमुख यांचे तिसरे चिरंजीव धीरज देशमुख यांना राजकारणात आणण्यासाठी भाजपनेच ही सेटिंग केली होती. रमेश कराड यांना मोठे होऊ द्यायचे नाही म्हणून भाजपने लातूर ग्रामीणची उमेदवारी शिवसेनेला दिली. त्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर यांनी शिवसेनेवर आरोप करण्याआधी आपले राजकारण तपासावे.  शिवसेनेने कुठल्याही प्रकारचे सेटिंग केले नाही, तर निलंगेकर व देशमुख यांच्यातच सेटिंग झाले होते, असा दावाही कुलकर्णी यांनी केला आहे.

भाजपचे डोके ठिकाणावर आहे का? राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपच्या माजी मुख्यमंत्री ते आमदारापर्यंत सर्वांची डोकी फिरली आहेत. त्यामुळे भाजप आणि संघाच्या लोकांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मानसोपचार रुग्णालय सुरू करावीत, अशी मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहोत, अशीही तिरकस टीका श्रीपाद कुलकर्णी यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख