am talking about Sunil Kendrekar, divisional commissioner visit corona affected area | Sarkarnama

मी सुनील केंद्रकर बोलतोय, कोरोनाबाधित भागात साधला संवाद..

जगदीश पानसरे
मंगळवार, 5 मे 2020

वयोवृध्द किंवा ज्यांना आधीपासून काही जुने आजार आहेत, अशा लोकांना कोरोनाची लागण लवकर होते हे आतापर्यंतच्या पाहणीतून लक्षात आले आहे. त्यामुळे विशेषःत बाहेर फिरणाऱ्या तरुणांना ज्यांना आम्हाला काही होणार नाही असा फाजील आत्मविश्वास आहे, त्यांनी ते बाहेर जाऊन हा रोग आपल्या घरातील इतर सदस्यांना देत आहेत याची जाणीव ठेवली पाहिजे.

औरंगाबादः जयभीमनगरवासियांनो नमस्कार, मी सुनील केंद्रकर विभागीय आयुक्त तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे, असे म्हणत केंद्रकरांनी महापालिकेतील प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांच्यासह या भागातील नागरिकांशी संवाद साधला. या भागात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळ्यामुळे केंद्रेकरांनी या भागाला भेट देऊन नागरिकांना धीर देत काही महत्वाच्या सूचनाही केल्या. बाहेर पडू नका, एकमेकांशी गप्पा मारू नका, आपल्या कुटुंबासोबत घरातच थांबा आणि लवकरात लवकर कोरोना सारख्या महामारीपासून आपली सुटका करून घ्या, असे आवाहन केंद्रेकरांनी यावेळी केले.

शहरातील कोरोनाबाधित व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत कोरोनाने अकराजणांचे बळी घेतले आहेत, तर ३२१ रुग्णांना याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच-सहा दिवसांत जयभीनगर भागातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे हा संपुर्ण भाग सध्या सील करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रकर यांनी अकरा मिनिटे या भागातील लोकांशी संवाद साधून त्यांना या रोगाशी मुकाबला करण्यासाठी काही गोष्टी समजावून सांगितल्या.

केंद्रेकर म्हणाले, हा भाग सील केला असला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. इतरांपासून आणखी कुणाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक होते. बाहेरील कुणी या भागात आले नाही, किंवा इथून कुणी बाहेर गेले नाही, तर आणखी नवे रुग्ण आढळणार नाही. आज तुम्हाला हा निर्णय जरी जाचक वाटत असला, तरी तुमच्यासह कुटुंबियांचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे होते.

वयोवृध्द किंवा ज्यांना आधीपासून काही जुने आजार आहेत, अशा लोकांना कोरोनाची लागण लवकर होते हे आतापर्यंतच्या पाहणीतून लक्षात आले आहे. त्यामुळे विशेषःत बाहेर फिरणाऱ्या तरुणांना ज्यांना आम्हाला काही होणार नाही असा फाजील आत्मविश्वास आहे, त्यांनी ते बाहेर जाऊन हा रोग आपल्या घरातील इतर सदस्यांना देत आहेत याची जाणीव ठेवली पाहिजे.

कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्याचे प्रमाण अधिक असले तरी, जे दोन-तीन वयस्कर रुग्ण या रोगामुळे दगावत आहेत, त्यामध्ये आपल्या घरातील कुणाचा समावेश असू नये यासाठी तुम्ही काळजी घ्या. लॉकडाऊनचे पालन करून घरात बसाल, आपली आणि कुटुंबाची काळजी घ्याल, तर लवकरच हा भाग कोरोनामुक्त होऊन इथला लॉकडाऊन देखील हटवला जाईल. हे प्रशासनाच्या नाही तर तुमच्याच हातात आहे. लॉकडाऊनमध्ये उन्हातान्हात पोलीस बाहेर उभे आहेत, ते हौस म्हणून नाही, तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला काही होऊ नये यासाठी आहेत.

हा रोग नवा असल्यामुळे अमेरिके सारख्या प्रगत राष्ट्रांत आतापर्यंत ६५ हजाराहून अधिक रुग्ण दगावले आहेत. यावर अजून औषध किंवा लस निघालेली नाही, तरी महापालिकेसह शासकीय रुग्णालयातील डॉक्टराना अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. वृध्द रुग्णांचे दगावण्याचे प्रमाण अधिक असले तरी ते स्वःत कुठे बाहेर फिरायला गेले नव्हते, तर त्‍यांच्याच कुटुंबातील कुणाकडून तरी त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात न येता घरातच थांबणे हाच कोरोनावर मात करण्याचा सर्वात मोठा उपाय असल्याचे केंद्रेकरांनी सांगितले.

सुट महागात पडते..

लोकांच्या अडचणी समजून घेऊन प्रशासनाने वेळोवेळी लॉकडाऊनमधून जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सुट देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा लोकांनी गैरफायदा घेतला. भाजीमंडई आम्ही मोकळ्या मैदानात भरवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोकांनी अशी गर्दी केली, जणू काही वर्षभराचा भाजीपाला भरून ठेवायचा आहे. त्यामुळे आम्हाला भाजीमंडई बंद करावी लागली. या परिस्थीतून लवकर बाहेर पडायचे असेल तर लॉकडाऊनच काटोकोरपणे पालन करा, असे आवाहनही केंद्रेकरांनी शेवटी केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख