रमझानच्या खरेदीसाठी दुकाने उघडण्यास परवानगी द्या; इम्तियाज जलील यांची मागणी - Allow shops to open for Ramadan shopping; Demand of Imtiaz Jalil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

रमझानच्या खरेदीसाठी दुकाने उघडण्यास परवानगी द्या; इम्तियाज जलील यांची मागणी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 मे 2021

सलग दुसऱ्या वर्षी देखील कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे त्यांच्या या व्यवसायावर पाणी फिरले आहे. रमझानाचे वीस दिवस निघून गेले, आता फक्त दहा दिवस शिल्लक आहेत.

औरंगाबाद ः शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहेत्यामुळे छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना थोडी सवलत देऊन दुकाने उघडण्याची परवानगी दिली पाहिजे. रमझानच्या महिन्यातील वीस दिवस गेले आहेत, दहा दिवस शिलल्क आहेत. त्यामुळे लोकांना खरेदीसाठी सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी द्यावी, जेणेकरून वर्षभर रमाझानची वाट पाहणाऱ्या व्यापारी, दुकानदारांना देखील काही प्रमाणात फायदा होईल, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांच्याकडे केली आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी आज पोलिस आयुक्त गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्याकडे रमझानच्या खरेदीसाठी दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, गेल्या वर्षी देखील कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे रमझानची खरेदी लोकांना करता आली नाही. शहरातील छोटे मोठे व्यापारी रमझानची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण वर्षभराची कमाई त्यांची याच काळात होत असते.

परंतु सलग दुसऱ्या वर्षी देखील कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे त्यांच्या या व्यवसायावर पाणी फिरले आहे. रमझानाचे वीस दिवस निघून गेले, आता फक्त दहा दिवस शिल्लक आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी झाला आहे. जिथे रोज दीड हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळत होते, ते प्रमाण आता साडेतीनशेवर आले आहे. निश्चितच यामध्ये आरोग्य विभाग, पोलीस, जिल्हा प्रशासन व महामारीच्या काळात ज्यांनी कुणी काम केले त्या सगळ्यांच्या संयमाचा आणि नियमांचे पालन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा देखील मोठा वाटा आहे.

आता पुन्हा शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू नये याची आपल्या सगळ्यांना काळजी घ्यायचीच आहे. पण हे करत असतांनाच शहराती जे छोटे-मोठे व्यापारी आहेत, जे वर्षभर रमझानमध्ये होणाऱ्या व्यवसायाकडे नजरा लावून बसलेले असतात, किंवा त्यांना उत्पन्नाचे इतर दुसरे कुठलेही साधन नाही, अशा दुकानदारांना रमझानच्या खरेदीसाठी दुकाने खुली करण्याची परवानगी दिली गेली पाहिजे. राज्य शासनाने जे नियम, अटी कोरोना काळात घालून दिल्या आहेत, त्याचे पालन करत ही परवानगी दिली गेली, तर त्याचा फायदा छोटे व्यापारी आणि सर्वसामान्यांना देखील होईल.

सरकारला प्रस्ताव पाठवणार..

या संदर्भात पोलिस आयुक्तांशी आपले बोलणे झाले आहे. मात्र कोरोना काळात कडक निर्बंध घालण्याचा नि्र्णय राज्यपातळीवर घेण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कुठलाही निर्णय घेणे शक्य नाही. हा प्रस्ताव आजच आपण राज्य सरकारकडे पाठवू. त्यानंतर जो निर्णय घेतला जाईल त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी आपल्याला दिले आहे. उद्यापर्यंत या संदर्भात राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा असल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख