रेमडिसीवर निर्यात कंपन्यांना महाराष्ट्रात विक्रीची परवानगी द्या, अन्यथा सविनय कायदे भंग - Allow export companies to sell in Maharashtra on remedic, otherwise we will violate civil laws. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

रेमडिसीवर निर्यात कंपन्यांना महाराष्ट्रात विक्रीची परवानगी द्या, अन्यथा सविनय कायदे भंग

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 एप्रिल 2021

आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासनमंत्री शिंगणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला ही चांगली बाब आहे.

मुंबई ः रेमेडिसीवीर इंजेक्शनची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रात या इंजेक्शनची विक्री करण्याची तत्काळ संमती द्यावी. अन्यथा आम्ही सविनय कायदेभंग करून या इंजेक्शनचा पुरवठा नागरिकांना करू, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. 

राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे रेमेडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा झाला आहे. या इंजेक्शनची निर्यात करणाऱ्या अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात इंजेक्शनची विक्री करण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली आहे. या संदर्भातील सर्व प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करून सरकारने त्यांना तत्काळ परवानगी द्यावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली.

यासंदर्भात आज त्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली. महाराष्ट्राप्रती असलेल्या उत्तरदायित्वामुळे आम्ही पन्नास हजार रेमेडिसीवीर इंजेक्शन राज्यात वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसाठी गुजरातच्या औषध कंपन्यांच्या मालकांची शिंगणे यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सरकारने त्यांना परवानगी दिली नाही तर आम्ही कायदेभंग करून लोकांना इंजेक्शन वाटू, असे दरेकर यांनी  प्रसारमाध्यमांना सांगितले. या इंजेक्शनचे रोजचे उत्पादन वीस हजार असल्याने राज्यातील तुटवडा संपुष्टात येईल, असेही ते म्हणाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासनमंत्री शिंगणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला ही चांगली बाब आहे.

या कंपन्यांना गुजरात सरकारने कसा प्रतिसाद दिला याचा दाखला देखील आपण मंत्र्यांना दिला आहे. या कंपन्यांना राज्यात परवानगी मिळावी यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राशी बोलणे करीत आहे. मात्र राज्य सरकारने तातडीने परवानगी दिली तरच राज्यात तत्काळ पुरवठा होऊ शकतो, असेही दरेकर म्हणाले.

परवानगी दिली नाही, तर आम्ही तसेच हे इंजेक्शन राज्यात वाटू. आम्हाला यात कोणतेही राजकारण करायचे नाही, मात्र इंजेक्शनअभावी कोणाचेही प्राण जाऊ नयेत म्हणून आम्ही हे प्रयत्न करीत आहोत, असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख