devendra fadanvis press conference news
devendra fadanvis press conference news

कोरोना रोखण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी सरकार पाडणार असा आरोप..

आम्ही कुठलेही समांतर सरकार चालवत नाही, राज्यातील जनतेचे दुःख आणि अडचणी सोडवणे हे विरोधी पक्ष म्हणून आमचे काम आहे. आम्ही सरकारच्या कुठल्याही जीआरचे उल्लंघन करत नाही, अधिकाऱ्यांची वेळ घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतो. त्यामुळे हे स्वतः फिरणार नाही, आणि आम्ही फिरलो तर यांना त्रास होतो.

औरंगाबादः विरोधी पक्ष सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतयं, कोरोनाच्या काळात राजकारण करतयं हा राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून आमच्यावर होणारा आरोप हस्यास्पद आहे. कोरोना रोखण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी व त्यावरून प्रसारमाध्यमांचे लक्ष दुसऱ्या विषयाकडे वळवण्यासाठीच आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न करतोय, असा खोटा आरोप सरकारकडून केला जातोय. आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही, घाई नाही, असे स्पष्ट करतांनाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आपल्याच भानगडी लपवण्यासाठी आटापीटा करत असल्याचा टोला लगावला. आंतरविरोधाने भरलेले देशाच्या इतिहासातील हे पहिलेच सरकार असेल, अशी टिकाही फडणवीस यांनी केली.

जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचे प्रमाण या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच कोविड सेंटरला भेट देत उपाययोजनांचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यानंतर पत्रकरांशी बोलतांना फडणवीस यांनी राजकीय प्रश्नासह कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर आपली स्पष्ट मते मांडली.  

देवेंद्र फडणवीस म्हणाले, लॉकडाऊन ही काही पॉलीसी नाही, कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर अधिकाधिक चाचण्या करुन रुग्णांना आयसोलोशन करण्याची व्यवस्था वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक डॉक्टर्स, स्टाफ, औषधी आणि साधन सामुग्रीची व्यवस्था राज्य सरकारने केली पाहिजे. सरकारचे कोरोना टेस्टींगचे धोरण चुकीचे आहे, त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढला. आपण कोरोनाशी नाही, तर कोरोनाच्या संख्येशी लढतो आहोत. ॲग्रेसीव्ह स्ट्रॅटीजीशिवाय आपण कोरोना रोखू शकत नाही.

खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना पेशंटची लूट केली जाते अशाही असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर कोरोना रुग्णांना महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य जीवनदायी योजनेतून उपचार देण्याचा जीआर सरकारने काढला आहे. पण यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश आहे यांच्यापेक्षा कुठल्या नाही याचीच यादी मोठी आहे. त्यामुळे रुग्णांना याचा फारसा फायदा होत नाही, तेव्हा हा जीआर तातडीने बदलण्याची गरज आहे.

सरकारकडून विरोधी पक्षावर समांतर सरकार चालवत असल्याचा आरोप केला जातोय, या प्रश्नाला उत्तर देतांना फडणवीस म्हणाले, आम्ही कुठलेही समांतर सरकार चालवत नाही, राज्यातील जनतेचे दुःख आणि अडचणी सोडवणे हे विरोधी पक्ष म्हणून आमचे काम आहे. आम्ही सरकारच्या कुठल्याही जीआरचे उल्लंघन करत नाही, अधिकाऱ्यांची वेळ घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतो. त्यामुळे हे स्वतः फिरणार नाही, आणि आम्ही फिरलो तर यांना त्रास होतो. पण त्यांना कितीही त्रास झाला तरी आम्ही फिरणं बद करणार नाही.

सारथीला मारण्याचे सरकारकडून काम..

एका चांगल्या हेतून आमच्या सरकारने सारथीची निर्मिती केली होती, पण या सरकारने सारथीला मारण्याचे काम केल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. पीजी, युपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाही अशी परिस्थीती आहे. तर दुसरीकडे सरकारने सारथीची स्वायत्ता काढून घेतली, आता आंदोलनानंतर ८ कोटीचा निधी देण्याची घोषणा केली. एवढ्या पैशाने काय होणार? असा सवालही फडणवीसांनी केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे या सरकारचे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे असा आरोप करतांनाच, बांधावर खत देऊ अशी घोषणा सरकारने केली होती, पण आता बांधावर नको, फक्त खत द्या, असे म्हणण्याची वेळ आल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला. महाबीजचचे बियाणे खोटे निघाले यापेक्षा दुसरे दुर्दैव काय? आमच्या पाच वर्षाच्या काळात कधीच खताचा तुटवडा जाणवला नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

परीक्षेच्या विषयात पॉलिटीकल इगो नको..

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षे संदर्भात मत विचारले असता, युजीसीने परीक्षा पुढे ढकलल्या आहेत त्या रद्द केल्या नाहीत. युजीसीची नियमावली हे फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी असते. सगळ्या राज्यांमध्ये कोरोना आहे, पण परीक्षेला विरोध फक्त महाराष्ट्रातच होतोय.

पण केवळ आमच्या युवा नेत्यांनी सांगितले म्हणून परीक्षा होऊ देणार नाही, ही भूमिका योग्य नाही, या विषयात कुणी पॉलीटिकल इगो करू नये असा चिमटा फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता काढला. परीक्षा न घेता निकाल कसा लावयाचा याचे मुल्यांकन सुद्धा हे सरकार ठरवू शकलेले नाही. परीक्षा घेतल्या नाही तर उद्या महाराष्ट्राच्या पदवी महत्व राहील का? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com