नाशिक येथे होणारे अखिल भारतीय साहित्य संमेलन स्थगित; कोरोनामुळे घेतला निर्णय

अद्यापही कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढते आहे. संमेलनाची तारीख जवळ येत असतांना पुन्हा कोरोनाने डोके वर काढले.
Akhil Bhartiya Sahitya Sammelen Pospond News Aurangabad
Akhil Bhartiya Sahitya Sammelen Pospond News Aurangabad

औरंगाबाद : राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि प्रादुर्भाव पाहता सरकारने सार्वजनिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास मनाई केली आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच असल्याने अखेल नाशिक येथे २६ ते २८ मार्च दरम्यान होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी आज हा निर्णय जाहीर केला. कोरोनामुळे यंदा साहित्य संमेलन घ्यायचेच नाही असे महामंडळाने ठरविले होते. पण नोव्हेंबर २०२० च्या मध्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव व रुग्णांचे प्रमाण घटले होते.

डिसेंबरपर्यंत कोरोना पुर्णपणे आटोक्यात आल्याचे चित्र होते. त्यामुळे रसिकांची मागणी पाहता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने नाशिकच्या ‘लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ मार्च दरम्यान नाशिक येथे घेण्याचा निर्णय जाहीर केला होता.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून संमेलनाची जोरदार तयारी सुरू केली होती. निधी संकलन व इतर तयारीला वेग आला असताना  अचानक राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. अद्यापही कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढते आहे. संमेलनाची तारीख जवळ येत असतांना पुन्हा कोरोनाने डोके वर काढले.

या पार्श्वभूमीर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी उपाध्यक्षांसह अन्य पदाधिकारी व महाराष्ट्रातील चार प्रमुख साहित्य संस्थांच्या पदाधिका-यांशी चर्चा केली. स्वागताध्यक्ष  छगन भुजबळ यांच्याशी फोनवर बोलणे केले. त्यानंतर महाराष्ट्रासह भारतातून  येणा-या निमंत्रित लेखक - कवी आणि साहित्य प्रेमींच्या सुरक्षिततेचा विचार करून साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

हे संमेलन रद्द करण्याऐवजी स्थगित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा प्रभाव ओसरल्यावर संमेलन घेता येईल असेही कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. मात्र स्थगित संमेलनाचे अध्यक्ष, मावळते अध्यक्ष आणि सर्व निमंत्रित साहित्यिक यात कोणताही बदल केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com