निवडणुकीतील पराभव विसरून वर्षभरानंतर आजी-माजी आमदार एकमेकांना भेटले.. - After a year of forgetting the election defeat, the present and former MLAs met each other | Politics Marathi News - Sarkarnama

निवडणुकीतील पराभव विसरून वर्षभरानंतर आजी-माजी आमदार एकमेकांना भेटले..

जगदीश पानसरे
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

कौटुंबिक संकट सगळ्यावरच येत असतात पण त्यातून देखील सुखरूप मार्ग काढून बाहेर येता येते असे म्हणत राजपूत यांनी जाधव यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तर तुमचेे काम चांगले आहे, असेे म्हणत जाधव यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवला.

औरंगाबाद ः कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव व विद्यमान शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत हे एकमेकांचे राजकीय विरोधक नुकतेच एकमेकांना भेटले. विधानसभा निवडनुकीतील पराभवानंतर तब्बल वर्षभराने हे दोन आजी-माजी आमदार भेटले आणि त्यांच्यात मनमोकळेपणाने चर्चा देखील झाली. लोकसभा आणि त्या पाठोपाठ विधानसभा असे सलग दोन पराभव आणि कौटुंबिक कलहामुळे अडचणीत सापडलेल्या हर्षवर्धन जाधव यांची आमदार उदयसिंह राजपूत यांनी घेतलेली भेट त्यामुळेच चर्चेचा विषय ठरत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघाचे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. कारण गेली वीस-पंचवीस वर्ष शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या औरंगाबाद लोकसभेतील पराभवाला माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कारणीभूत ठरले होते. शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात जाधव यांनी निवडनुक लढवून तब्बल २ लाख ८३ हजार मते घेतली होती. मोठ्या प्रमाणात हिंदुच्या मतांचे धुव्रीकरण होऊन शिवसेनेला पराभवाचा धक्का बसला होता.

त्यामुळे कन्नड विधानसभा निवडणुकीत शिवसेना लोकसभेतील पराभवाचे उट्टे कसे काढते याकडे राज्याचे लक्ष लागले होते. अर्थात पुढे घडले ही तसेच जाधव यांचा पराभव झाला आणि सातत्याने कधी अपक्ष, राष्ट्रवादीकडून नशिब आजमावणाऱ्या उदयसिंह राजपूत यांचे नशिब अखेर शिवसेनेत आल्यानंतर फळफळले. शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असलेली कन्नडची जागा उदयसिंह राजपूत यांनी जिंकली आणि २० वर्षाच्या संघर्षानंतर ते आमदार झाले.

लोकसभा- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे प्रचंड अडचणीत सापडले. कौटुंबिक कलह, वाद चव्हाट्यावर आले, पुण्यात एका वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्या प्रकरणी त्यांना महिना-दीड महिना तुरुंगात जावे लागले. ग्रामपंचायत निवडणुकीत गावची सत्ता देखील जाधव यांना राखता आली नाही. विरोधक संकटात असला की त्याचा फायदा उचलत राजकीय उट्टे काढण्याची संधी सहसा कुणी सोडत नाही. पण आमदार उदयसिंह राजपूत त्याला अपवाद ठरले.

निवडणूक संपली, वैर संपले..

निवडणुका संपल्या, जय-पराजय कुणाच्या तरी नशिबी येतच असतो, त्यामुळे तो विसरायचा आणि ज्या जनतेची सेवा करण्याचे ध्येय घेऊन आपण राजकारणात आलो, त्यासाठी स्वःताला समर्पित करायचे असे म्हणत राजपूत यांनी नुकतीच हर्षवर्धन जाधव यांची कन्नडमध्ये सदिच्छा भेट घेतली. गेल्या वर्षभरात तुम्ही कसा चुकीचा आमदार निवडूण दिला, तो तुमची काम करू शकत नाही अशी टीका जाधव यांच्याकडून केली गेली. पण ती फारशी मनावर न घेता राजपूत यांनी जाधव यांची भेट घेऊन त्यांच्यांशी विविध विषयांवर संवाद साधला.

कौटुंबिक संकट सगळ्यावरच येत असतात पण त्यातून देखील सुखरूप मार्ग काढून बाहेर येता येते असे म्हणत राजपूत यांनी जाधव यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तर तुमचेे काम चांगले आहे, असेे म्हणत जाधव यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवला. ज्यांच्या विरोधात लढून राजपूत यांना सलग तीन वेळा विजयाने हुलकावणी दिली त्या राजकीय विरोधकाबद्दल सहानुभूती दाखवत सदिच्छा भेट घेणे हे राजकारणातील एक आदर्श उदाहरणच म्हणावे लागेल.

दुसरीकडे ज्या राजपूत यांच्यांमुळे राजकारणातून आपण बाहेर फेकले गेलो, याबद्दल राग किंवा आकस न बाळगता हर्षवर्धन जाधव यांनी देखील राजपूत यांच्या वाटलाचीला शुभेच्छा दिल्या, यामुळे कन्नड तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या तरी खेळकर झाले आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख