वीज कनेक्शन तात्काळ जोडा, शेतकऱ्यांनाही बील भरण्याची हात जोडून विनंती करतो - Add electricity connection immediately, farmers also request to pay the bill | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

वीज कनेक्शन तात्काळ जोडा, शेतकऱ्यांनाही बील भरण्याची हात जोडून विनंती करतो

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

गावातील डीपी खराब झाली तर ती आपल्याला तात्काळ बसवावी लागते, आपण बीलच भरले नाही तर महावितरण आपल्याला डीपी कशी देणार, असा सवाल देखील उदयसिंह राजपुत यांनी उपस्थित केला.

औरंगाबाद ः शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन थकीत बीलापोटी कट करण्याची मोहिम महावितरणने हाती घेतली आहे. अतिवृष्टी, कोरोना, लाॅकडाऊनमुळे सर्वसमान्याप्रमाणेच शेतकरी देखील अडचणीत आहे. पिकं, फळांना पाणी देण्याची वेळ असतांना त्याची वीज खंडीत झाली तर तो आणखी संकटात सापडेल. तेव्हा तात्काळ शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडून द्या, शेतकऱ्यांनी देखील दोन-तीन-पाच हजार जे शक्य असेल ते बीलापोटी भरून महावितरण व सरकारला सहकार्य करावेे, अशी मी हात जोडून विनंती करतो, असे आवाहन शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना केले.

राज्यात महावितरणकडून कृषी वीज जोडण्याचा विद्युत पुरवठा थकीत बीलापोटी खंडीत करण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींना देखील आमच्या वीज जोडण्या पुर्ववत करा,अशी मागणी करणारे फोन येत आहेत. कन्नड-सोयगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपुत यांनी आज महावितरणच्या तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती.

या बैठकीत मतदारसंघातील ज्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत, ती तात्काळ आजच्या आज जोडण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकरी अडचणीत आहे, गुरा-ढोरांचा त्यांच्या चारा पाण्याचा प्रश्न आहे, शिवाय शेतातील पिकं, फळबागांना पाणी देणे आवश्यक आहे. असे असतांना महावितरणकडून मात्र थकीत वीज बिलासाठी त्यांचे कनेक्शन मोठ्या प्रमाणात कट करण्यात आले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून मला फोन येत असल्याचेही राजपूत यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

आमदार म्हणून शेतकरी अडचणीत असल्याबद्दल मला वाईट वाटत आहे, आज दोन तासाच्या आत ज्या ज्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहेत, ते सुरू करा. शेतकऱ्यांना देखील माझी हात जोडून विनंती आहे. तुमची अडचण निश्चित आहे, पण कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती देखील बिकट झाली आहे. महावितरण कंपनीची थकबाकी देखील कोट्यावधींच्या घरात गेली आहे. त्यांच्यावर देखील राज्य सरकार व वरिष्ठांचा बील वसुलीसाठी दबाव आणि तगादा आहे.

यात आपण देखील दोन-तीन-पाच हजार रुपये वीज बिलापोटी भरून सहकार्य करावे. तरच यातून मार्ग निघू शकेल. गावातील डीपी खराब झाली तर ती आपल्याला तात्काळ बसवावी लागते, आपण बीलच भरले नाही तर महावितरण आपल्याला डीपी कशी देणार, असा सवाल देखील उदयसिंह राजपुत यांनी उपस्थित केला. तोडण्यात आलेली वीज कनेक्शन आजच्या आज जोडली जातीलच, पण शेतकरी बांधवांनी देखील शक्य तितके पैसे भरून सहकार्य करावे, असे आवाहन देखील राजपुत यांनी केले.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख