जिल्हा बॅंकेत अब्दुल सत्तारांचे `चीत भी मेरी पट भी मेरी`

सत्तार काॅंग्रेसमध्ये असतांना पासून गेली पंधरा वर्ष गाढे हे सत्तार यांच्यासोबत सावली प्रमाणे वावरतांना दिसतात.
Aurangabad District Bank Election News
Aurangabad District Bank Election News

औरंगाबाद ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आज झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची खेळी अखेर यशस्वी ठरली. नितीन पाटील यांना शिवसेनेत घेतल्यानंतर त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड अपेक्षितच होती. पण उपाध्यक्षपदी देखील सत्तार यांनी आपलाच विश्वासू व्यक्ती बसवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असलेले अर्जुन गाढे हे उपाध्यक्षपदी विजयी झाले, त्यांनी कृष्णा पाटील डोणगांवकर यांचा पराभव केला. नितीन पाटील यांची बिनविरोध निवड आणि उपाध्यक्षपदी गाढे यांचा विजय यामुळे सत्तार यांच्या बाबतीत `चीत भी मेरी, पट भी मेरी`, असेच म्हणावे लागेल.

जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणुक कार्यक्रम पार पडला. तत्पुर्वी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नितीन पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला. तर मुळचे शिवसेनेचे असलेले पण विरोधी पॅनलकडून निवडणूक लढलेल्या कृष्णा पाटील व देवयांनी डोणगांवकर या नवडून आलेल्या पती-पत्नी जोडीने देखील संचालक म्हणून दुसऱ्यांदा शिववंबधन बांधून घेतले होते.

उपाध्यक्षपदासाठी जेव्हा डोणगांवकरांनी अर्ज भरला तेव्हा त्यांच्यावर देखील सत्तारांची कृपा होणार असे वाटत होते. पण अर्जुन गाढे यांनी अर्ज भरला आणि डोणगांवकरांच्या आशा मावळल्या. कृष्णा पाटील डोणगांवकर यांचा गुप्त मतदानात १३ विरुद्ध सात मतांनी पराभव झाला.

अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या वेळी मदत व्हावी या हेतूने सत्तार यांनीच डोणगांवकर जोडीला काॅंग्रेसच्या पॅनलकडून लढण्यास सांगितले होते, अशी देखील चर्चा होती. पुढे या दोघांनी शेतकरी सहकार विकास पॅनलला पाठिंबा दिल्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळाले. या पाठिंब्यांच्या बदल्यात कृष्णा पाटील यांना उपाध्यक्ष पदाचा शब्द दिला होता असे देखील बोलले जाते.

प्रत्यक्षात मात्र सत्तार यांनी डोणगांवकर यांच्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील विश्वासू असलेल्या अर्जून गाढे यांनाच पसंती दिली आणि त्यांना निवडूण देखील आणले. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही महत्वाची पदे सत्तार यांच्या समर्थकांच्या पर्यायाने बॅंकेचा कारभारच सत्तार यांच्या हाती गेला आहे.

अर्जुन गाढेच का?

अर्जून गाढे हे अब्दुल सत्तार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. अगदी सत्तार काॅंग्रेसमध्ये असतांना पासून गेली पंधरा वर्ष गाढे हे सत्तार यांच्यासोबत सावली प्रमाणे वावरतांना दिसतात. सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा येथील असलेले अर्जून गाढे हे मध्यंतरी सत्तार यांच्यावर नाराज होते. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये उमेदवारी मागून देखील सत्तारांनी त्यांच्या नावावर फुली मारून इतरांना संधी दिली होती.

या शिवाय मतदारसंघातील छोटी-मोठी कंत्राट देखील गाढे यांना मिळत नव्हती. श्रीराम महाजन वगैरे मंडळी सत्तार यांच्या अधिक जवळ गेल्यामुळे आपल्यावर अन्याय होत आहे, अशी भावना झाल्याने गाढे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय देखील घेतला होता, अशी माहिता आहे.

परंतु सत्तार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांचे बिनसले आणि गाढे यांचे अच्छे दिन सुरू झाले. सत्तार यांनी सर्वप्रथम गाढे यांना सिल्लोड बाजार समितीमध्ये सभापती केले. त्यानंतर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत उतरवले आणि थेट उपाध्यक्ष केले. ऐन विधानसभा निवडणुकीत प्रभाकर पालोदकर यांनी सत्तारांच्या विरोधात बंड पुकारत थेट निवडणूक लढवली होती.

तालुक्यातील एक मोठा मराठा नेता दुरावल्यामुळे सत्तार यांनी त्यांचेच नातेवाईक असलेले अर्जून गाढे यांना जवळ करत बळ दिल्याचे बोलले जाते. तालुक्याच्या राजकारणातून गाढे यांना सत्तारांनी थेट जिल्ह्याच्या राजकारणात आणल्यामुळे सत्तार यांच्यासाठी गाढे किती महत्वाचे आहेत हे स्पष्ट होते.

एकंदरित जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून सत्तार यांनी आपली मुत्सद्देगिरी आणि धूर्त राजकारणाची झलक पुन्हा एकदा दाखवून दिली. जिल्हा बॅंकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपा सोबत घेण्याचा निर्णय, त्याला वरिष्ठांकडून मान्यता मिळवणे, बागडे सारख्या सहकाराची जाण आणि अभ्यास असणाऱ्या ज्येष्ठ नेत्याचा पराभव घडवून आणणे, नितीन पाटील यांना पक्षात घेऊन अध्यक्षपद व गाढे यांना उपाध्यक्ष करणे या सगळ्या घडामोडी अगदी ठरल्याप्रमाणे घडल्या.

नव्हे त्या सत्तार यांनी घडवल्या. त्यामुळेच चीत भी मेरी और पट भी मेरी, असेच म्हणावे लागेल. आता जिल्हा बॅंक ताब्यात आल्याचा शिवसेनेला पक्ष म्हणून कितपत फायदा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com