महाराष्ट्र स्थापनेच्या हिरक महोत्सावात ६० टक्के नागरिकांचे लसीकरण करावे

लसीच्या उत्पादनात महाराष्ट्र स्वयंपूर्ण आहे. लसीकरण करण्यात शासकीय - निमशासकीय संस्था, सहकारी संस्था, सेवाभावी संस्था यांची मदत आपण घेऊ शकतो.
mla dhiraj deshmukh Letter to Cm Thackeray news latur
mla dhiraj deshmukh Letter to Cm Thackeray news latur

लातूर : कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. हा वाढता धोका कमी होण्यासाठी राज्यातील ६० टक्के जनतेला कोरोना प्रतिबंधक लस द्यावी, अशी मागणी आमदार धिरज देशमुख यांनी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली. लसीकरणाचे हे शिवधनुष्य पेलण्याची शक्ती महाराष्ट्र शासनात नक्कीच आहे. आपल्या नेतृत्वात हे ध्येय आपण निश्चित गाठू शकतो, असा विश्वासही त्यांनी पत्रात व्यक्त केला.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससह इतर विविध राजकीय पक्षांनी केंद्र सरकारला १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने ती मान्य केली असून, ५० टक्के लसींचा साठा राज्यांसाठी राखीव ठेवून १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करून घेण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर धिरज देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्र पाठवून राज्यात ६० टक्के जनतेचे लसीकरण करावे,अशी मागणी केली. येत्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला साठ वर्षे पूर्ण होतील. १ मे २०२१ हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा हिरक महोत्सव असेल. या महत्त्वाच्या दिवशी महाराष्ट्राच्या ६० टक्के जनतेला  कोव्हीड लसीकरण करण्याच्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम आपण आखावा, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. 

६० टक्के लसीकरण झाल्यास आपण सामूहिक प्रतिकार शक्तीच्या जवळ पोहोचू. आज इस्राईल देशाने मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण करून सामूहिक प्रतिकार शक्ती मिळाल्याचे जाहीर केले. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मास्क घालण्याची गरज नाही, असे तेथील सरकारने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र शासनाची हाफकीन बायोफार्मा ही संस्था लवकरच कोव्हीड लसीचे उत्पादन सुरू करेल. 'सिरम इन्स्टिट्यूट'सारखा लस उत्पादक उद्योगही महाराष्ट्रातच आहे. लसीच्या उत्पादनात महाराष्ट्र स्वयंपूर्ण आहे. लसीकरण करण्यात शासकीय - निमशासकीय संस्था, सहकारी संस्था, सेवाभावी संस्था यांची मदत आपण घेऊ शकतो. अशा प्रयत्नांतून आपल्या नेतृत्वात ६० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्याचे ध्येय आपण निश्चित गाठू शकतो, असा विश्वासही  धिरज देशमुख यांनी पत्रात व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव कोरोनासारख्या आपत्तीच्या कालावधीतही महाराष्ट्राचे नेतृत्व ज्या सक्षमतेने करत आहेत, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. महाराष्ट्रातील जनताही मोठ्या संयमाने आणि खंबीरतेने या संकटाला तोंड देत आहे. या एकजुटीतून आणि ठोस उपाययोजनांतून आपण नक्कीच कोरोनाला हरवू शकू, असेही देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com