हाफ चड्डीत, अंबर दिव्याच्या गाडीत, डेप्युटी कलेक्टरला पोलिसांनी पकडलं आणि.... - The Deputy Collector was caught by the police in half shorts, Amber Divya's car and .... | Politics Marathi News - Sarkarnama

हाफ चड्डीत, अंबर दिव्याच्या गाडीत, डेप्युटी कलेक्टरला पोलिसांनी पकडलं आणि....

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 जून 2020

`गाडी खाजगी आहे आणि मी आरडीसी आहे, माझी गाडी थांबवायची तुझी हिमंत कशी झाली बे`, अशी भाषा त्यांनी वापरली. खाजगी वाहनावर `अंबर दिवा लावता येत नाही, गाडी पोलीस स्टेशनला घ्या`, असे मी त्यांना म्हणालो, तेव्हा‘थांब तुझ्या एसपीलाच फोन लावतो‘ म्हणत फोन लावून माझ्यावर कुणाशी तरी बोलण्यासाठी त्यांनी दबाव आणला.

औरंगाबादः प्रशासनातील ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कायद्याची अंमबलजावणी करून घेण्याची जबाबदारी शासनाने सोपवली आहे, तेच कसे नियम पायदळी तुडवतात याचा गंभीर प्रकार हिंगोलीत पहायला मिळाला. आर.डी.सुर्यवंशी या उपजिल्हाधिकाऱ्यांनी चक्क आपल्या खाजगी वाहनावर अंबर दिवा लावत शहरात सैर केली. पोलिसांनी गाडी रोखून खाजगी गाडीवर अंबर दिवा कसा लावला? असे विचारले तर तू मला कायदा शिकवणार का? तुझी काय औकात, तुला दाखवतोच आता‘ असे म्हणत शिवीगाळही केली. या प्रकरणी तक्रार देणाऱ्या सहकाऱ्याच्या पाठीशी  उभे राहायचे तर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्याच्यावरच प्रकरण मिटवून घे, म्हणत दबाव आणला. त्यामुळे मुजोर उपजिल्हाधिकाऱ्यांवर अद्याप कुठलीच कारवाई पोलिसांनी केलेली नाही .

पोलिस उपनिरीक्षक साईनाथ भुमन्ना अनमोड यांनी दिलेल्या तक्रीरीत म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी आपल्या सहकाऱ्यांसह सकाळी आठ वाजेपासून शहरातील इंदिरा चौक तपासणी पॉईंटवर कार्यरत होतो. दुपारी साधरणतः ११ वाजून ५० मिनिटाच्या सुमारास अकोला बायपासकडून एमएच-२३- एएस-७२२३ ही चारचाकी गाडी येत होती. गाडीवर अंबर दिवा लावल्याचे निदर्शनास आल्यामुळे मी गाडी थांबवली व चालकाकडे चौकशी केली.

चालक हे ‘हाफ चड्डी‘ घालून बसले होते. गाडी सरकारी आहे की, खाजगी असा प्रश्न विचारला, तेव्हा `गाडी खाजगी आहे आणि मी आरडीसी आहे, माझी गाडी थांबवायची तुझी हिमंत कशी झाली बे`, अशी भाषा त्यांनी वापरली. खाजगी वाहनावर `अंबर दिवा लावता येत नाही, गाडी पोलीस स्टेशनला घ्या`, असे मी त्यांना म्हणालो, तेव्हा‘थांब तुझ्या एसपीलाच फोन लावतो‘ म्हणत फोन लावून माझ्यावर कुणाशी तरी बोलण्यासाठी त्यांनी दबाव आणला. पण मी नकार दिला, व सहकारी कॉन्स्टेबलला गाडीत बसा आणि पोलिस स्टेशला या असे सांगतिले.

माझे सहकारी गाडीचा दरवाजा उघण्यासाठी गेले, तर ‘अबे साल्या माझ्या गाडीचा दरवाजा सोड, गाडी कुठे घ्यायची ते सांग मी घेतो, अबे साल्या तुला आता दाखवतोच' म्हणत धमकावले. कॉन्सेटबलला त्या गाडीत बसवून मी माझ्या गाडीने पोलीस स्टेशनमध्ये आलो. त्यांनतर पोलिस निरिक्षक सय्यद साहेब यांच्या केबिनमध्ये आरडीसी यांनी पुन्हा साहेबा समक्ष ‘ तुझी काय औकात बे माझी गाडी पकडायची, तु मला कायदा शिकवणार का‘? असे म्हणत अरेरावीची भाषा वापरली, अश्लिल शिवीगाळही केली. त्यानंतर आम्ही या घटनेची सविस्तर नोंद घेतली, आमच्यानंतर पोलिस उपअधिक्षक जगताप मॅडम यांनीही रितसर नोंद घेतली. त्यानंतर आम्हाला कळाले, की सदर व्यक्ती हे उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी आहेत.

वरिष्ठांकडून मिटवून घ्याचा सल्ला..

दरम्यान, अप्पर पोलीस अधिक्षक काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी वैजने या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर प्रकरण मिटवून घ्या, असे मला सांगितल्याचे अनमोड यांनी तक्रारीरत नमूद केले आहे. तसेच उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांच्यावर कुठलीही दंडात्मक कारवाई न करता त्यांना सोडून दिले. इंदिरा चौकात खाजगी वाहनावर अंबर दिवा लावला म्हणून ही गाडी अडवण्यात आली होती. उपजिल्हाधिकारी हे त्यावेळी कर्तव्यावर नव्हते, ते हाफ चड्डीवर गाडी चालवत होते. पोलिस स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सगळे आहे.

पुरावा म्हणून तपासिक अधिकाऱ्यांनी ते ताब्यात घ्यावे, असेही साईनाथ अनमोड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. परंतु हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. अनमोड यांच्या तक्रारीची हिंगोली पोलिस ठाण्यात नोंद असली तरी त्यावर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. उलट अनमोड यांच्यावरच तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याची माहिती आहे. साईनाथ अनमोड यांचा मोबाईल देखील बंद असल्याचे समोर आले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख