अकोला कॉंग्रेसने पाळला नाना पटोलेंचा नारा, स्वतंत्र लढणार... - akola congress followed nana patoles slogan will fight independently | Politics Marathi News - Sarkarnama

अकोला कॉंग्रेसने पाळला नाना पटोलेंचा नारा, स्वतंत्र लढणार...

मनोज भिवगडे
मंगळवार, 29 जून 2021

काँग्रेसने स्वबळाची भूमिका घेतल्याने मुंबईत बुधवारी शिवसेना व राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अकोला जिल्ह्यातील नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला प्रहारचे प्रतिनिधीही उपस्थित राहतील. पोटनिवडणूक आघाडीतून लढण्याबाबत या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

अकोला : जिल्हा परिषद, पंचायत समितीची पोटनिवडणूक स्वबळावर लढायची की, आघाडीच्या माध्यमातून सामोरे जायचे, यावर चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच काँग्रेसने मात्र महाविकास आघाडीला डावलून एकला चलोची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रहार जनशक्तीला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करीत आहे. यावर उद्या मुंबईत सेना-राकाँमध्ये होणाऱ्या बैठकीतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. An attempt will be made to find a solution through a meeting to be held between Sena and Rak in Mumbai tomorrow

रिक्त झालेल्या जि.प. सदस्य पदांवर सर्वच पक्षातील दिग्गजांनी दावा केला आहे. अकोलखेड येथून निवडून आलेले कॉंग्रेसचे गजानन डाफे, शिवसेनेचे लाखपूर येथील अप्पू तिडके व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दगडपारवा येथून निवडून आलेल्या सुमन यांचेही पद रिक्त झाले. विजयी झालेल्या जागांवर त्याच पक्षाला प्राधान्य देण्यात यावे, यावर महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे अकोला येथे झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे काँग्रेसला वगळून शिवसेना आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसने आता जि.प., पं.स. निवडणुकीसाठी मंथन सुरू केले आहे. 

प्रहार जनशक्ती पक्षाला सोबत घेऊन पोटनिवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय उद्या होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बुधवारी मुबंई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. पोटनिवडणुकीतील आघाडीबाबतही ही शेवटची चर्चा असणार. या बैठकीतून तोडगा न निघाल्यास सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महाविकास आघाडीबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने सोमवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीतून कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर इतर तीन पक्षांनी काँग्रेसचा नाद सोडून चर्चा पुढे सुरू ठेवली आहे.

डॉ. शिंगणे-बच्चू कडू चर्चा
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाला पोटनिवडणुकीत सोबत घेण्यासंदर्भात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुकूल आहे. त्यासाठी अकोला जिल्ह्याचे संपर्क मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रहारचे संस्थापक व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. बच्चू कडू यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत बुधवारच्या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कळविल्याची माहिती आहे.

हेही वाचा : मुश्रीफ यांच्यावर कोणाची नाराजी? शिवसेनेला का हवाय नगरमध्ये बदल

जागा वाटपात शिवसेनेचा वरचष्मा
जिल्हा परिषदेच्या १४ व पंचायत समितीच्या २८ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागांसाठी मुंबईत होणाऱ्या बैठकीत वाटाघाटीवर चर्चा होणार आहे. जागा वाटपात सर्वाधिक जागांवर शिवसेनेचा दावा असेल. ग्रामीण भागात शिवसेनेची व्होटबँक अधिक असल्याने त्यांचा जागा वाटपात वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून किती जागांवर दावा केला जातो, यावरच चर्चेचे व महाविकास आघाडीचे भवितव्य ठरणार आहे.

काँग्रेसने स्वबळाची भूमिका घेतल्याने मुंबईत बुधवारी शिवसेना व राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अकोला जिल्ह्यातील नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला प्रहारचे प्रतिनिधीही उपस्थित राहतील. पोटनिवडणूक आघाडीतून लढण्याबाबत या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
- गोपाल दातकर, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख