अण्णांची इतकी भीती का वाटते? - Why is Anna so scared? | Politics Marathi News - Sarkarnama

अण्णांची इतकी भीती का वाटते?

प्रकाश पाटील
शनिवार, 26 डिसेंबर 2020

शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीत सुरू असले, तरी महाराष्ट्रातही त्याची चर्चा आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतलाय.

नगर : नव्या तीन कृषी कायद्यावरून देशातील शेतकरी आक्रमक झालेत. गेल्या काही दिवसांपासून कडक थंडीतही राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत, तर दुसरीकडे मोदी सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत आहे. चर्चा करीत आहेत. मार्ग काढत आहोत. शेतकऱ्यांचे समाधान आम्ही करू, भाजपचे नेतेमंडळी सांगत आहेत. 

तर शेतकरी आंदोलनाला बळ मिळेल 

शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीत सुरू असले, तरी महाराष्ट्रातही त्याची चर्चा आहे. राज्यातील शेतकरी नेत्यांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतलाय. आपण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहोत. केंद्र सरकारने आंदोलनासाठी दिल्लीत जर जागा उपलब्ध करून दिली, तर ते आपला आवाज बुलंद करतील, याबाबत शंका घेण्याचे मुळीच कारण आहे. आज जे शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहेत, त्यांना अण्णांच्या पाठिंब्यांमुळे अधिक बळ मिळेल आणि सरकारला नव्या कृषी कायद्यात सुधारणा करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. 

स्वामीनाथ आयोग महत्त्वाचा 

काही झाले, तरी अण्णा हजारे यांच्या शब्दाला देशभरात किंमत आहे. त्यांनी जर शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले, तर केंद्र सरकार खडबडून जागे होईल. शिवाय देशात शेतकऱ्यांत वेगळाच संदेश जाईल. हे सरकार आपले नाही, आपल्या हिताचे नाही, ही भावना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होण्यास मदत होऊ शकते. देशभरातील शेतकरी ही देशाची शक्ती आहे. तो अन्नदाता आहे. पोशिंदा आहे. जर या देशातील शेतकरी सुखी नसेल, तर काही खरे नाही. अस्मानी, सुल्तानी संकटाचा सामना करतात, तो मेटाकुटीस आला आहे. दररोज आत्महत्या करतो आहे. कोणतेही सरकार येऊ द्या, कोणीच शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय देऊ शकत नाही. स्वामिनाथन आयोगाने केंद्र सरकारला जो अहवाल दिला आहे. त्याची अंमलबजावणी सरकार करू शकत नाही. या अहवालाबाबत एक शब्दही उच्चाण्यास सत्ताधारी तयार नाहीत. मग आज विरोधी बाकावर बसलले पक्षही सत्ताधाऱ्यांइतकेच जबाबदार आहेत. जर शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला, तर शेतकऱ्यांचे सरकारला आशिर्वाद लाभतील. एकीकडे बड्या उद्योगपतींसाठी पायघड्या घातल्या जात आहेत, मात्र शेतकऱ्याला काही देताना हात का आखूड होतो, हा प्रश्‍न आहे. 

अण्णांची मनधरणी 

अण्णांनी आजपर्यंत अनेक मोठी आंदोलने केली आहे. आता शेतकऱ्यांसाठी त्यांनी आरपारची लढाई लढण्यासाठी प्रतिज्ञा घेतली आहे. जानेवारी महिन्यात ते दिल्लीत आंदोलन करण्याची शक्‍यता आहे. जरी सरकारने आंदोलनासाठी जागा दिल्ली नाही, तरी ते आंदोलन करतील, त्यांना तुरूंगाची भिती नाही वाटत. गांधींजी नेहमीच म्हणत असत, की तुरूंग हे माझ्यासाठी मंदिर आहे म्हणून. शेतकऱ्यांसाठी जर कोणाला तुरूंगात जावे लागत असेल, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. नवे कृषी कायदे रद्द केले म्हणजे शेतकरी आत्महत्या थांबतील, असेही समजण्याचे कारण नाही हे ही अण्णांनीच म्हटले आहे आणि त्यामध्ये तथ्य आहे. या कायद्याबाबत शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असतील, त्यामध्ये सुधारणा करायच्या असतील, त्या केल्याच पाहिजेत. अण्णांनी दिल्लीत आंदोलन करू नये म्हणून आतापर्यंत भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, माजी मंत्री गिरीश महाजन आदी मंडळी राळेगणला येऊन गेली. त्यांनी अण्णांची मनधरणी केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे आहे, असे या मंडळींचे म्हणणे आहे. मार्ग निघेल, असा विश्वासही ते व्यक्त करीत आहे. फक्त अण्णांनी दिल्लीत आंदोलन करू नये, यासाठी भाजपची मंडळी आग्रही आहे. पण, अण्णा याबाबत कोणतेही आश्वासन देत नाहीत. त्यांना शेतकऱ्यांसाठी आंदोलन करायचे आहे. त्यांना न्याय मिळवून द्यायचाय. 

शेवटचे आंदोलन 

अण्णाच्या आयुष्यातील शेवटचे आंदोलन शेतकऱ्यांसाठी असणार आहे. देशात किंवा महाराष्ट्रात कोणाचेही सरकार असो अण्णांचा सरकारवर अंकूश आहे. भ्रष्ट्राचार निर्मुलनासाठी त्यांनी आपले आयुष्य झिजविले. भ्रष्टाचार करताना प्रत्येकाला अण्णा का दिसतात? का त्यांची भिती वाटते! जर अण्णांनी दिल्लीत येऊ नये, असे केंद्र सरकारला वाटत असेल, तर तातडीने शेतकऱ्यांबाबत निर्णय घेतले पाहिजेत. 

सरकारचे मीठ नाही खाल्ले ! 

दिल्लीत जे शेतकरी आंदोलन करीत आहेत, त्या शेतकऱ्यांच्या नेत्यांनी आतापर्यंत केंद्र सरकारबरोबर अनेकदा चर्चा केल्या. मात्र सरकारचा जेवण, नाष्टा जावू द्या, साधे मीठही खाल्ले नाही. यावरून शेतकरी किती स्वावलंबी आहे, हे दिसून येते. उलट शेतकरीच दररोज हजारो लोकांना लंगरमध्ये भोजन देत आहे हे विशेष. दिल्लीत आंदोलनास बसलेले शेतकरी जिद्दीला पेटले आहे. त्यांना न्याय हवा आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जर का, अण्णांनी निर्धार केला आहे. अण्णांचे बळ शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकऱ्यांच्या असंतोषाला सरकारला सामोरे जावे लागेल. म्हणूनच अण्णाची भीती सरकारला वाटते. 

 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख