अहमदनगरचा आज स्थापना दिन ! जाणून घ्या नावाचं रहस्य आणि राजकीय इतिहास

अहमदनगर शहराचा आज स्थापना दिन. 28 मे 1490 रोजी `कोटबाग निजाम` हा राजवाडा बांधून नगरची स्थापना झाली. मलिक अहमदशहा बिहरी याने 1490 मध्ये सीना नदीकाठी वसाहत स्थापन केली. अहमदशहाच्या नावावरूनच `अहमदनगर` हे नाव पडले. शहराचाहा पुरातन राजकीय इतिहासरोचक आहे.
ahmednagar fort
ahmednagar fort

नगर : अहमदनगर शहराचा आज स्थापना दिन. 28 मे 1490 रोजी `कोटबाग निजाम` हा राजवाडा बांधून नगरची स्थापना झाली. मलिक अहमदशहा बिहरी याने 1490 मध्ये सीना नदीकाठी वसाहत स्थापन केली. तेथेच अहमदनगर वसण्यास सुरवात झाली. अहमदशहाच्या नावावरूनच `अहमदनगर` हे नाव पडले. अहमदनगर जिल्ह्याचा हा राजकीय इतिहास अत्यंत पुरातन व रोचक आहे.

नगरची भूमी संतांची. तसेच योद्‌ध्यांचीही. विविध राजवटीच्या रक्ताने माखलेल्या या भूमीचा इतिहासही तसा रक्तरंजीत म्हणावा लागेल. कारण अनेक लढाया या मातीने झेलल्या. अंगाखांद्यावर योद्‌ध्यांनी आपले कसब पणाला लावले. गतप्राण झाले अन्‌ अनेक जिंकलेही. संघर्षमय इतिहास असलेल्या या जिल्ह्याला पौराणिक संदर्भही आहेत. अगदी रामायम, महाभारतापासून ते राष्ट्रकुट वंश, चालुक्‍य, निजामशाही, मराठ्यांचे राज्य, इंग्रजी राजवटीची झालर त्याला आहे. 

पौराणिक संदर्भ 

नगर जिल्ह्याचे पौराणिक संदर्भ पाहिल्यास रामायण, महाभारतात काही संदर्भ जिल्ह्याशी निगडित आहेत. अगस्त्य ऋषींनी विंध्य पर्वत ओलांडून गोदावरी तीरी वास्तव्य केले. श्रीरामपूर तालुक्‍यातील दायमाबाद येथील उत्खननातून सिंधू संस्कृतीचे अस्तित्व येथे असल्याचे सिद्ध झाले. डोंगरगणमधील श्रीराम, सीतेचे वास्तव्य, महाभारतातील अर्जुन रडल्याने पार्थ-रडी म्हणून नाव पडलेले पाथर्डी याच जिल्ह्यातील. नवनाथ संप्रदाय याच जिल्ह्याच्या भूमीत अनेक काळ वास्तव्यास राहिला. गोरक्षनाथांची कर्मभूमी, कानिफनाथांची समाधी याच भूमीत आहे. नाथांनी ठिकठिकाणी वास्तव्य केल्याच्या खूना आहेत. देवादिकांची भूमी म्हणून गर्भगिरी पर्वतराईतील काही भाग नगर जिल्ह्याच्या भूमीचेच अंग आहे. संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथांचे वास्तव्य, ज्ञानेश्‍वरीची रचना आदी संतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी नगर जिल्हा राज्यभरात प्रसिद्ध आहे. 

सम्राट अशोका - राष्ट्रकुट वंश 
(इ. स. 240 ते 1000) 

सम्राट अशोकाच्या काळात (इ. स. 240) पैठणजवळील महत्त्वाचे स्थान म्हणून हा प्रांत (नगर) प्रसिद्ध होता. पुढे वाकाटक राजवंश इ. स. 250 च्या दरम्यान होता. त्याची राजधाणी वत्सगुल्म (सध्याचा वासिम जिल्हा) येथे होती. नंतरच्या काळात इ. स. 753 ते 982 दरम्यान राष्ट्रकुट राजवटीतील राजांनी राज्य केले. या काळातील राजा अमोघवर्षा याच्या काळात जैन धर्माचा प्रसार झाला. याच काळात वेरुळच्या लेण्या कोरण्यात आल्या. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतराईत या लेण्या कोरल्या गेल्या. औरंगाबादजवळची वेरुळची लेणी ही राष्ट्रकुट राजांची कला क्षेत्रातील अनुपम देणगी आहे. या गुफेत बौद्ध, हिंदू, जैन धर्मातील देव-देवतांची शिल्पे आहेत. या लेण्यातील 12 ते 34 पर्यंतच्या लेण्यांमध्ये रामेश्‍वर (सिताची नहाणी), दशावतार, कैलास, इंद्रसभा नावांनी काही लेण्या प्रसिद्ध आहेत. त्याच काळाचा संदर्भ डोंगरगण (ता. नगर) येथील रामेश्‍वर (सिताची नहाणी) येथील असावा. तसेच याच काळात करडवाडी (ता. पाथर्डी) येथेही लेणी कोरण्याचा प्रयत्न झाला होता. महादेवाच्या पिंडीच्या आकाराची गुफा आजही आहे. सह्याद्रीची जशी सातमाळ पर्वतरांग आहे. तशीच गर्भगिरी पर्वतरांगही सह्याद्रीचीच शाखा आहे. गर्भगिरीच्या डोंगररांगेत त्याच काळात लेण्या कोरण्याचा प्रयत्न झाला असावा. राष्ट्रकुट वंश हा कलाप्रिय होता. राज्याच्या मोठ्या विभागाला राष्ट्र म्हणत. राष्ट्रकुट घराण्याचे तीन घराणे प्रसिद्ध होते. त्यातील तिसरे घराणे औरंगाबाद परिसरात उदयास आले. या घराण्याचा राजा दंतीदुर्ग (इ. स. 758) हा विख्यात होता. त्याने दक्षिण गुजरात, महाराष्ट्र, विदर्भ जिंकून 45 वर्षे राज्य केले. 

यादव - निजामशहा 
(इ. स. 1000 ते 1500) 

1190 पर्यंत पुन्हा पश्‍चिमी चालुक्‍य वंशाच्या राजांनी राज्य केले. हरिश्‍चंद्र गडावरील गुहांचे काम, त्यावरील नक्षी त्याच शैलीतील आहे. 1190 च्या दरम्यान देवगिरी यादवांनी चालुंशी संघर्ष करून मिळविली. सध्याचे दौलताबाद (जि. औरंगाबाद) ही यादवांची राजधानी होती. याच काळातील यादवांचे मंत्री हेमाडी यांनी मोडी लिपीचा शोध लावला. नगर जिल्ह्यात सुमारे 26 मंदिरे हेमाडपंती आहेत. रतनवाडीचे (अकोले) अमृतेश्‍वराचे मंदिर हे हेमाडपंती बांधकाचा उत्कृष्ठ नमुना होय. त्यांचे अस्तित्व आजही आहे. संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी लिहिताना यादव वंशातील राजा रामदेवराय यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे आढळते. 1294 मध्ये यादवांचा पराभव करून वजीर आदिल खिलजीने राज्य मिळविले. अर्थात हे राज्य मुघल बादशहा जलालुद्दीन खिलजी यांच्या ताब्यात आले. पुढे 1318 पर्यंत मुघल साम्राज्याचा विस्तार होत गेला. 

1338 मध्ये दिल्लीचा बादशहा मोहंमद तुघलकाने दौलताबाद सोडले. राजाविना राज्य झाले. त्यामुळे मंत्र्यांनी लुटालूट केली. त्यातील गंगू ब्राह्मण याचा शिष्य अलादिन हसन गंगू याने सर्वांना हरवून राज्य स्थापन केले. त्यामुळे हे राज्य बहामनी राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. बहामनी राज्याचा काळ मोठा होता. या साम्राज्यातील 13 राजांनी सुमारे दीडशे वर्षे या भूमीवर राज्य केले. त्या काळातही कट-कारस्थाने करण्यात राज्यातील मंत्री कमी नव्हते. 1460 नंतर 1472, 73 मध्ये मोठा दुष्काळ पडला. या आपत्तीचा सामना करण्यात प्रधानमंत्री मोहंमद गवान असफल झाला. लगेचच त्याच्याविरोधात इतर मंत्र्यांनी कारस्थाने रचली. 

1487 मध्ये त्याला मारण्यात आले. अंतर्गत बंडाळी वाढून बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यातूनच निघालेल्या मलिक अहमदशहा बिहरी याने 1490 मध्ये सीना नदीकाठी वसाहत स्थापन केली. तेथेच अहमदनगर वसण्यास सुरवात झाली. अहमदशहाच्या नावावरूनच अहमदनगर हे नाव पडले. 28 मे 1490 रोजी `कोटबाग निजाम` हा राजवाडा बांधून नगरची स्थापना झाली. तो म्हणजे आजचा भुईकोट किल्ला होय. 1494 मध्ये शहर स्थापन झाले. पुढे निजामशहाची राजधानी बनले. 


बुऱ्हाणशहा - चांदबीबी 
(इ. स. 1500 ते 1600)
 

1508 मध्ये अहमदशहाचा मृत्यू झाला. त्याचा मुलगा पहिला बुऱ्हाणशहा सात वर्षांचा असताना गादीवर आला. त्याचे बहुतेक आयुष्य लढण्यात गेले. 1553 मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याला पाच मुले होती. त्यातील थोरला मुलगा हुसेनशहा पहिला हा गादीवर आला. या वेळी त्याच्याशी त्याच्या भावांचे भांडण सुरू झाले. याच काळात विजापूर, गोवळकोंडा व विजापूर येथील राजांनी नगरला वेढा दिला. या वेळी तह झाला. पुढील एका लढाईनंतर त्याचा मृत्यू झाला. चांदबीबी ही हुसेनशहाचीच मुलगी. तिचा विवाह आदिलशहाशी झाला. 1555 मध्ये चौथा निजाम मुर्तझा हा गादीवर आला. त्याने सलाबतखान (दुसरा) याची वजीर म्हणून नेमणूक केली. सलाबतखानाने नगरला पाण्यासाठी खापरी नळ योजना तयार केली. त्याचे काम पाहून प्रजेला तो आवडत असे. त्यानेच शहा डोंगरावर अष्टकोनी महाल बंधला. चांदबिबीचा महाल म्हणून तो आजही सुस्थितीत आहे. सलाबतखानाच्या मृत्यूनंतर महालात त्याची कबर करण्यात आली. 

चांदबीबी 

चांदबीबी ही अहमदनगरचा निजामशहा पहिला हुसेनशहाची मुलगी. विजापूरच्या पहिल्या आदिलशहाची पत्नी. तिला अरबी, फारसी, मराठी, कन्नड, तुर्की या भाषा अवगत होत्या. आदिलशहाच्या मृत्यूनंतर (1580) आदिलशाहीत अंतर्गत संघर्ष सुरू झाला. सुमारे दहा वर्षे हा संघर्ष चालला. आदिलशाहीची थोडी घडी बसविल्यानंतर चांदबीबी अहमदनगरच्या निजामशाहीत परत आली. हुसेनचा मुलगा मुर्तझा पहिला हा लहानपणीच गादीवर (1586 ते 89) बसला. त्याचा मुलगा मिरनशहा याला गादीवर बसविले. तो व्यसनी असल्याने त्याचा चुलतभाऊ इर्सल शहाला 1589 मध्ये गादीवर बसविले. मुर्तझाच्या बुऱ्हाण नावाच्या भावाचा हा इर्सल शहा मुलगा. इर्सलचा मृत्यू 1594 मध्ये झाल्यानंतर त्याचाच भाऊ इब्राहिम शहाने सूत्रे हाती घेतली. त्याच्या दरबारात दुफळी झाल्याने विजापूरकरांशी त्याचे युद्ध झाले. युद्धात त्याचा मृत्यू झाला. फक्त चारच महिने त्याला राज्य करता आले. त्यानंतर वजीर मियान अंजू याने अहमद नावाचा आपला मुलगा गादीवर बसविला.

1595 मध्ये हा अहमद गादीवर बसला. तो निजामाचा वारीस नव्हता. हा वाद प्रजेत सुरू झाला. त्यामुळे त्याने दिल्लीकर अकबराचा मुलगा मुराद याच्या मदतीने नगरास वेढा दिला. या वेळी अहमदशिवाय इतर तिघेजण निजामशाही राज्यावर आपला हक्क सांगत होते. त्यापैकी बहादूर नावाच्या हक्कदारास चांदबीबीचा पाठिंबा होता. मुरादने वेढा दिला, त्यावेळी चांदबीबीनेही युद्धात भाग घेऊन 1595 मध्येच सत्ता ताब्यात घेतली. चांदबीबीने इब्राहिमचा पुत्र बहादूरशहाला गादीवर बसविले आणि स्वतः कारभार हाती घेतला. तिच्याच राज्यातील महंमद नावाच्या वजिराने मुरादला पुढे करुन तिच्या विरोधात कट कारस्थाने सुरू केली. याच दरम्यान चांदबीबी व वजीर नेहंगखान यांच्यातही वाद सुरू होता. मुराद नगरवर चाल करणार होता; परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 1599 मध्ये अकबराने दानियल यास नगरवर चाल करण्यास पाठविले. तो आल्यानंतर चांदबीबीचा वजीर नेहंगखान पळून गेला. त्यामुळे चांदबीबी एकटी पडली. याच काळात हमीद खोजा व त्याच्या मंडळींनी चांदबीबीचा खून केला. त्यामुळे नगरचे राज्य मोगलांना आयतेच मिळाले. बहादूरशहाला अकबराने कैद केले आणि नगरचा कारभार दानियल याच्याकडे 1600 मध्ये सोपविला. 
(...पुर्वार्ध)

बातम्यांचे अपडेट्स तातडीने मिळण्यासाठी 'सरकारनामा'चा ॲप डाऊनलोड करा.. सोबतची लिंक ओपण करा https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com