अहमदनगरच्या भूमित हे लढले योद्धे, जाणून घ्या स्वातंत्र्यापूर्वीच्या राजकीय घडामोडी

अहमदनगर शहराचास्थापनादिन कालहोता. 28मे 1490 रोजी स्थापन झालेल्या शहराला आता 530 वर्षे पूर्ण झाली आहेत.इ. स. पूर्व काळापासून ते 1600 पर्यंतचा इतिहास या वृत्तमालेच्यापुर्वार्धात पाहिला. आजच्या उत्तरार्धात 1947 म्हणजे स्वातंत्र्यापर्य़ंतचा राजकीय इतिहास...
chandbibi
chandbibi

नगर : अहमदनगर शहराची स्थापनादिन काल (ता. 28 मे) होता.28 मे 1490 रोजी स्थापन झालेल्या शहराला आता 530 वर्षे झाली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक वास्तु अद्यापही तशाच आहे. इ. स. पूर्व काळापासून ते 1600 पर्यंतचा इतिहास या लेखाच्या पुर्वार्धात पाहिला. आजच्या लेखात स्वातंत्र्यापर्य़ंतचा राजकीय इतिहास विषद केला आहे.

चांदबिबीने शाैर्य दाखवित अहमदनगरचा भुईकोट किल्ल्याचा बुरुंंज ढळू दिला नव्हता, मात्र अंतर्गत फितुरीमुळे तिची हत्या झाली. काही इतिहासकारांच्या मते ती अचानक गायब झाली. नगरच्या इतिहासात तिच्या शाैर्य़ाची कहाणी अजरामर झाली. विरांगणा म्हणून तिच्या स्मृती आजही आहेत. इ. स. 1600 नंतर अहमदनगरवर अनेक राजे-महाराजांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. ब्रिटिश कालखंडात म्हणजे भारताला स्वातंत्र्यापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व इतर नेत्यांना नगरच्या भुईकोट किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आले होते. लोकमान्य टिळकांचे भाषणे येथे झाली. 

मुर्तझा - शहाजी राजे 
(इ. स. 1600 ते 1700) 

निजामशाहीतील पहिल्या बुऱ्हाणचा नातू मुर्तझा दुसरा याला निजामशाहीच्या गादीवर (1601) बसविण्यात आले. त्यावेळी निजामशाहीतील सरदार शहाजी राजे, मिआन राजू व मलिकंबर यांनी विशेष पुढाकार घेतला. मलिकंबर व राजू यांच्यात भांडणे होऊन मोगलांनी निजामशाहीवर चाल केली. मलिकंबरने तह करून राज्य राखले. राजधानी नगरहून हलवून दौलताबादला नेण्यात आली. त्याच्या वशिल्याने पुढे बरेच सरदार पुढे आले. मलिकंबरने मोगलांचा पराभव करून नगरचा प्रांत पुन्हा मिळविला. पुढे मुर्तझा व मलिकंबरचे जमेना. त्याने मुर्तझालाच पदच्युत केले. 

1607 मध्ये मलिकंबरने मुर्तझास पदच्युत करून बुऱ्हाण तिसरा यास गादीवर बसविले. एका लढाईत मलिकंबरचा मृत्यू झाला. त्यानंतर फत्तेखान वजीर झाला. फत्तेखानने बुऱ्हाणचा खून करून सर्व राज्यांसह तो मोगलांना शरण गेला. तेव्हा शहाजहानने त्याला जहागिरी दिली. निजामशाही मोगलांच्या ताब्यात होती. फत्तेखानने पुढे मुर्तझा दुसरा याला 1630 मध्ये गादीवर बसविले. निजामशाही मोगलांच्या हवाली केल्याने शहाजीस राग आला होता. त्याने आदिलशहाच्या मदतीने दौलताबादवर हल्ला केला. दौलताबाद जिंकले. त्यामुळे मोगल चिडले. त्यांनी तुंबळ युद्ध करुन दौलताबाद परत घेतले. हुसेनशहा मुर्तझाला पकडून मोगलांनी त्यांना दिल्लीला पाठविले. निजामशाही पुन्हा ताब्यात घेतली. 1633 मध्ये हुसेननंतर शहाजी राजे यांना गादीवर बसविण्यात आले. 

मलिकंबरनंतर शहाजीनेच खऱ्या अर्थाने निजामशाहीची सूत्रे घेतली होती. शहाजीने कोकणासह सर्व प्रांत परत मिळविला व परांड्यास 1634 मध्ये राजधानी केली. शहाजीपुढे डाळ शिजत नसल्याचे पाहून शाहिस्तेखानने शहाजहानला दख्खनमध्ये आणले. शहाजीला त्याने तोंड दिले. पुढेही दीड वर्षे शहाजीने मोगलांशी तोंड दिले. 

भातोडीची लढाई 

1664 मध्ये मुगल शहेनशहाने लष्कर खानला 12 लाखांचे सैन्य देऊन निजामशाही संपविण्यासाठी पाठविले. त्यास आदिलशहा 80 हजारांचे सैन्य घेऊन मिळाला. शहाजीकडे फक्त 20 हजार सैन्य होते. त्यातीलही दहा हजार सैनिक अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेवून दहा हजार सैन्यासह तो लढाईस तयार झाला. 12 लाख सैन्याला पाणी भरपूर लागेल, म्हणून मुगल आणि आदिलशहाच्या सैन्याने उत्तर दक्षिण वाहणाऱ्या मेखरी (सध्या मेहेकरी, चांदबीबीच्या महालाजवळील गाव) नदीजवळ छावणी उभी केली. शहाजी राजांनी उत्तरेकडील धरणाला रात्रीच तडे पाडले. रात्रीच झोपलेल्या सैन्य असलेल्या ठिकाणी पाणी घुसल्याने या छावणीची वाताहत झाली. अनेक योध्यांना शहाजी राजांनी बंदी बनविले. या लढाईत शहाजी राजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. ही भातोडीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. 

मराठे सरदार 
(इ. स. 1700 ते 1800) 

1759 मध्ये मराठ्यांनी जिल्ह्यावर ताबा मिळविला. या काळात पेशव्यांनी मोगलांकडून नगरचा भुईकोट किल्ला ताब्यात घेतला. 1767 मध्ये तोतया सदाशिव भाऊ, 1776 मध्ये पेशव्यांचे सरदार सखाराम हरी गुप्तेयांना किल्ल्यात कैद करण्यात आले होते. 1797 मध्ये भुईकोट किल्ला पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला. या शतकात अनेक मराठा सरदारांनी नगरवर राज्य केले. 

इंग्रजांचे राज्य - स्वातंत्र्य संग्राम 
(इ. स. 1800 ते 1947) 

1803 मध्ये जनरल वेलस्लीने नगरच्या माळीवाडा वेशीजवळ शिंद्यांच्या फौजेचा कडवा विरोध मोडीत काढून भुईकोट किल्ल्याला वेढा दिला. आतील शिंदे फौज शरण येत नाही, हे पाहिल्यावर भिंगारच्या देशमुखाला फितूर केले. मोक्‍याची जागा पाहून हल्ला केला. त्यामळे इंग्रजांनी किल्ला जिंकला. तेव्हापासून 1818 पर्यंत इंग्रजांचे महाराष्ट्र जिंकण्यासाठी अहमदनगर हे महत्त्वाचे केंद्र होते. 

नगर जिल्ह्यातील त्र्यंबकजी डेंगळे, राघोजी भांगरे आदींपासून झुंजार स्वातंत्र्य योद्धांनी प्रदीर्घ लढा चालू ठेवला. 1818 पासून लढा सुरू होता. राघोजी भांगरे यांच्या नेतृत्त्वाखाली बंड झाले. भांगरे यांना पंढरपूर येथे इंग्रजांनी पकडले. आणि लगेचच 1847 मध्ये फाशी देण्यात आले. विशेषतः 1857 पर्यंत इंग्रजी सत्ता स्थिरस्थावर झाली होती. त्या काळात नगर जिल्ह्यातून त्यांच्या विरोधात नेक नेते तयार होत होते. पेशवाईच्या अखेरच्या अराजकातून सुटका झाल्याबाबत लोकांमध्ये समाधान असले, तरी इंग्रजी अन्यायाविरोधात चीडही निर्माण होत होती. 

1857 च्या बंडाच्या वेळी जिल्ह्यातील उत्तरेकडील बंड करणाऱ्यांना पकडून त्यांचा नायनाट करण्याचा सपाटा इंग्रजांनी लावला होता. त्या काळात संगमनेर, राहुरी, पारनेर आदी भागातील कोळी, भिल्ल समाजाचे लोक शांत बसले नाहीत. त्यांनी इंग्रजांच्या विरोधात गुप्तपमे कारवाया चालूच ठेवल्या. त्या काळात भागोजी नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली सात हजारांपेक्षा जास्त युवक संघटित झाले होते. 

टिळकांचे कापडबाजारातील व्याख्यान

1858 च्या पुढील काळात लोकमान्य टिळकांच्या विचारांनी लोक भारावले होते. नगर जिल्ह्यातील चळवळींनी त्या काळी जोर धरला होता. या काळात बाळासाहेब देशपांडे, रा. ब. चितळे, चौकर आदी मंडळींनी केलेले कार्य गौरवास्पद होते. 1908 मध्ये सेनापती बापट परदेशातून शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतले. पारनेर तालुका ही त्यांची भूमी. त्यांच्यातील क्रांतिकारक त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी पुण्यास जाऊन लोकमान्य टिळकांची भेट घेतली व पुढील दिशा ठरविली. 31 मे 1916 रोजी नगरच्या कापड बाजाराच्या मागील प्रांगणात (इमारत कंपनी) लोकमान्य टिळकांचे व्याख्यान झाले. त्यांच्या भाषणाने भारावून गेलेल्या जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. 1920 मध्ये लोकमान्य टिळक यांचे निधन झाले. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ही चळवळ हाती घेतली.

महात्मा गांधी यांचा काळ

1921 नंतरच्या काळात महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. सेनापती दादासाहेब चौधरी, रामभाऊ हिरे, भाई सथ्थ्या, काकासाहेब चिंचोरकर आदी मंडळी या काळात नगर जिल्ह्यातून महत्त्वाचे योगदान देत होती. 1930 मध्ये झालेल्या जंगल सत्याग्रहात राष्ट्रीय पाठशाळा, पेटिट हायस्कूल (संगमनेर) येथील विद्यार्थ्यांनी योगदान दिले. 1932 मध्ये झालेल्या सत्याग्रहात खुशालचंद बार्शीकर, लक्ष्मण चिंचोरकर, नवलमल फिरोदिया, दिगंबर कस्तुरे, दामोदर गद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी काम केले. याच काळातील कायदेभंग सत्याग्रहातही जिल्ह्यातील नेते पुढे होते.  9 आॅगस्ट 1942 पासून ते 1944 पर्यंत देशभरात भारतीयांनी निःशस्त्र आंदोलनास सुरूवात केली. गांधी यांच्या काळात विविध सत्याग्रह झाले. त्यामध्ये जिल्ह्यातील नगरसह श्रीरामपूर, पारनेर, श्रीगोंदे, पुणतांबे, पेमगिरी, आश्‍वी, बेलापूर, कोपरगाव, अकोले, बेलपिंपळगाव, बोधेगाव, भिंगार अशा अनेक गावांतील कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले.  

पंडित नेहरुंना बंदिवास 

1942 च्या चले जाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभीा पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी. सी. घोष आदी राष्ट्रीय नेत्यांना नगरच्या भुईकोट किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आले होते. "डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा जगप्रसिद्ध ग्रंथ पंडित नेहरूंनी याच किल्ल्यात लिहिला. डॉ. पी. सी. घोष यांनी "हिस्टरी ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन' हा ग्रंथ येथेच लिहिला. 

15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्यदिनी भुईकोट किल्ल्याच्या फत्ते बुरजावर आचार्य नरेंद्र देव यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. याच किल्ल्यात देव यांना तीन वर्षे स्थानबद्ध करण्यात आले होते. त्याच किल्ल्यावर तिरंगा फडकावण्याचे भाग्य त्यांना लाभले.

(... उत्तरार्ध)

राज्यभरातील राजकीय घटनांच्या तातडीने अपडेटससाठी आपण `सरकारनामा`चा अॅप डाऊनलोड केलात का? नसेल तर लगेचच खालील लिंकवर क्लिक करा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com