ऊर्जामंत्री तनपुरेंच्या जिल्ह्यात शेतकरी विरुद्ध महावितरण `सामना` - Power Minister vs. Power Distribution `Match` in Tanpur District | Politics Marathi News - Sarkarnama

ऊर्जामंत्री तनपुरेंच्या जिल्ह्यात शेतकरी विरुद्ध महावितरण `सामना`

मुरलीधर कराळे
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे नगर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी दोन्हीमंध्ये समन्वय घडवून आणणे गरजेचे आहे.

नगर : रब्बीची पिके ऐन बहरात असताना महावितरण कंपनीने रोहित्रे उतरवून घेत शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. वीजबिलांचा तगादा लावला आहे. एखाद्या रोहित्रावरील विजेचा लोड लक्षात घेता तेव्हढी विजबिले वसुली होत नसल्याने ही कारवाई होत असल्याची सांगितली जाते. ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे मात्र कार्यक्रमांतून शेतकऱ्यांना सहकार्याची भाषा करतात. तिकडे अधिकारी थेट रोहित्रच उतरवून कारवाईला सज्ज झाले आहे. तनपुरेंच्याच जिल्ह्यात गंभीर झालेला हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनाचा ठाव घेणारा ठरत आहे.

वीजपुरवठा सुरळीत केल्यावरच बिल भरू 

श्रीरामपूर तालुक्‍यातील भोकर वीज उपकेंद्रातून भोकर-कमालपूर फिडरवरील शेतकऱ्यांना मागील पंधरा दिवसांपासून कमी दाबाने वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे विहिरीत पाणी असूनही ते पिकांना देता येत नाही. महावितरणने प्रथम वीजपुरवठा सुरळीत करावा; त्यानंतरच आम्ही वीजबिल भरू, असा पवित्रा कमालपूर, घुमनदेव परिसरातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. हीच स्थिती अनेक ठिकाणी आहे. पिके जळून गेल्यानंतर पूर्ण दाबाने वीज दिल्यास त्याचा उपयोग होणार नाही. काही शेतकऱ्यांनी बिले भरली आहेत. असे असताना त्यांनाही पुरेशी विज मिळू शकत नाही. साहजिकच शेतकरी विरुद्ध विजवितरण कंपनी असाच सामना रंगताना दिसत आहे.

हेही वाचा... लंकेंनी सोडविला हा प्रश्न

रब्बी हंगामात दोन महिने वीजपुरवठा सुरळीत होता. आता ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर कांदा व गव्हाला पाण्याची गरज आहे. नेमका याच वेळी महावितरणकडून कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे विहिरीत पाणी असूनदेखील ते पिकांना देता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. 

शेतकऱ्यांनीही वसुलीला सहकार्य करावे

 

कोणतीच गोष्ट फुकट मिळत नाही, हे शेतकऱ्यांनी आधी लक्षात ठेवावे लागेल. महावितरणला सहकार्य करण्याचे धोरण आवश्यक आहे. एखाद्या रोहित्रावरील शेतकऱ्यांनी बिले भरून प्रामाणिकपणा दाखवून द्यावा. याच परिस्थितीत आकडे टाकणाऱ्या शेतकऱ्यांनी अशी अवैध पद्धतीने वीज चोरू नये. त्या ऐवजी अधिकृतपणे कोटेशन घेणे आवश्यक आहे. शेतकरी वीज बिले भरीत नाहीत, त्यामुळे अधिकारी त्यांची वीज कपात करते किंवा बंद करते, अशी भूमिका महावितरणची आहे.

हेही वाचा... ठाकरे सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न

चुकते कोणाचे

महावितरण कंपनीकडून विजबिले देताना गोंधळ होत आहे. अनेक शेतकऱ्यांना चुकीची बिले देतात. ती पुन्हा लवकर दुरूस्त होत नाहीत. आकडे टाकून वीज वापरणाऱ्या शेतकऱ्यांकडून वायरमन पैसे घेऊन अशा वीज चोरीला प्रोत्साहनच देतात, अशा तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत. त्यामुळे संबंधित रोहित्रावर ताण येऊन जे बिले इमानदारीने भरतात, त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होतो, असा सूर शेतकऱ्यांमधून आळवला जात आहे. 

तनपुरे समन्वय घडवणार का

ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे नगर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी दोन्हीमंध्ये समन्वय घडवून आणणे गरजेचे आहे. रब्बीचे पीक वाया गेल्यानंतर शेतकरी बिले भरणार नाहीत, हे सत्य असले, तरी तनपुरे यांनी कंपनी व शेतकऱ्यांमध्ये समन्वयाची भूमिका घेणे आवश्यक आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख