Mind you ... the mood of farmers is changing | Sarkarnama

ध्यानात घ्या... शेतकऱ्यांचा मूड बदलतोय

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 15 मे 2020

अनेक शेतकऱ्यांनी शेतीमाल शेतात सडून दिला. त्याचा परिणाम शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यात झाली. खूप शेतीमाल पिकवायचा नाही. आपल्या कुटुंबाला पुरेल इतके धान्य झाले, तरी त्यातून गुजरान करायची, असे काही शेतकरी बोलून दाखवू लागले आहेत.

नगर : शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित झाला, की एक वाक्य सर्वांच्या तोंडून येते, ते म्हणजे `शेतकऱ्यांनी पिकविलेच नाही, तर उपाशी राहाल.` ही उक्ती खरी ठरण्याची वेळ आता येवू पाहत आहे. कारण कोरोना व लाॅकडाऊनमुळे शेतकऱ्याचे अर्थचक्र, विचारचक्र फिरले आहेत. लाॅकडाऊनमुळे बियाणे, खते योग्य किमतीत मिळण्याची शाश्वती नाही. मजूर नाहीत, अशा स्थितीत केवळ आपल्या कुटुंबाला वर्षभर पुरेल व खर्च भागण्यासाठी थोडे उत्पन्न होईल, असा विचार बळीराजा करू लागला आहे. शाश्वत बाजारपेठ नसल्याने जास्त उत्पादनाच्या फंदात तो पडू इच्छित नाही. असे झाले, तर नागरिकांना ही धोक्याची घंटा ठरू शकते.

सध्या शेतात उत्पादित केलेल्या मालाला चांगला भाव मिळत नाही. सरकारही हमी भागाने माल खरेदी करीत नाही. त्यामुळे शेतकरी आधीच त्रस्त झाला आहे. अशाच कोरोनामुळे लाॅकडाऊनचे संकट उभे राहिले. शेतातील टाॅमॅटोचा ढिक अक्षरशः शेतात सडून द्यावा लागला. शहराचे रस्ते बंद झाल्याने व कोरोनाच्या भितीमुळे माल विक्रीचा प्रश्न उभा राहिला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतीमाल शेतात सडून दिला. त्याचा परिणाम शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यात झाली. खूप शेतीमाल पिकवायचा नाही. आपल्या कुटुंबाला पुरेल इतके धान्य झाले, तरी त्यातून गुजरान करायची, असे काही शेतकरी बोलून दाखवू लागले आहेत.

मजूर नसल्याने शेती करणे अवघड
आगामी काळात मजुरांची मोठी टंचाई येणार आहे. परप्रांतीय मजूर राज्य सोडून गेल्याने उद्योग व्यवसाय तसेच शेतीवर राबणारे मजूर मिळणे मुश्किल होत आहे. स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, परंतु कुशल कामगार मिळणार नाहीत. नोकरी हरवून बसलेले लोक शेतीत रोजंदारीवर काम करू शकणार नाहीत. जे गावातील मजूर आहेत, तेही जास्त कष्टाचे काम करणार नाहीत. अशा परिस्थिीत मजुर मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनीही काही पिके घेण्याचे टाळले आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांना जेवढे काम होईल, तेवढेच पिक घ्यायचे, असेच धोरण स्विकारलेले दिसून येत आहे.

खूप पिकवून विकायचा कुठे
आगामी काळात लाॅकडाऊन किती वाढेल, हे अनिश्चित आहे. कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यास ही परिस्थिती बऱ्याच दिवस चालेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे जास्त खर्च करून पिकविलेल्या मालाला निश्चित दर व बाजारपेठ मिळेलच, याची शाश्वती राहिली नाही. साहजिकच बहुतेक शेतकऱ्यांनी आपण स्वतः विकू शकू, एव्हढाच माल पिकविण्याचा निर्णय घेतला असल्याचे पुढे येत आहे. 

केंद्रीय पॅकेज पण प्रत्यक्षात काय
शेतकऱ्यांसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी विशेष पॅकेज जाहिर केले आहे. त्याचा लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती होईल, याबाबत शेतकरी अजूनही साशंक आहेत. कारण यापूर्वी उद्योगांसाठी स्टार्ट अप, मुद्रा योजनेंतर्गत विविध सवलती जाहीर केल्या. त्यासाठी बॅंकांना काही लक्ष्यांकही दिला. परंतु नवीन उद्योजक उभे राहण्याएेवजी जुन्याच उद्योजकांनी त्याचा लाभ घेतला. बॅंकांनीही नवीन लोकांच्या फंदात पडण्यापेक्षा जुन्याच लोकांना कर्ज पुरवठा करून आपला लक्ष्यांक साध्य करून घेतला. त्याचा परिणाम नवीन उद्योजकांना कर्ज मिळू शकले नाही. त्यामुळे शासनाची ही योजना केवळ दिखावा ठरल्याचा आरोप होऊ लागला. शेतकऱ्यांसाठीच्या या योजनांचीही तीच स्थिती होऊ शकेल. अनेक योजना जाहिर केल्या तरी त्या प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याला लाभ मिळविता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात खते-बियाणे मिळाले पाहिजे. शेतीचे काम करण्यासाठी यंत्रसामग्री कमी दरात उपलब्ध झाली पाहिजे. तसे मात्र शासनाकडून होताना दिसत नाही.

उत्पादन घटण्याचा धोका
आगामी काळात लाॅकडाऊनमुळे शेतीतील उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सेंद्रीय भाजीपाल्याकडे लोक वळू लागले आहेत. त्यामुळे बाजारात मिळणारा भाजीपाला चांगला असेलच, याचा भरवसा नागरिकांना येत नाही. थेट घरपोहोच दिल्या जाणाऱ्या भाजीपाल्यावर लोकांचा विश्वास बळावत चालला आहे. त्यामुळे आपल्या आसपासच्या शहरात विक्री होईल, एव्हढाच भाजीपाला पिकण्याचे धोरण शेतकरी धरू लागला आहे. परिणामी शेतीमालाचे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. असे झाले, तर त्याचा परिणाम संपूर्ण राज्यावर होईल.

अन्नधान्यावर परिणाम शक्य

शेतकऱ्यांना शेतीत सध्या कामांची मोठी अडचण झाली आहे. लाॅकडाऊनच्या काळात कोणताही मजूर शेतीत येवू शकणार नाही. लाॅकडाऊन अजूनही वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतीत कामे करण्यास मजूर मिळणार नाही. साहजिकच बहुतेक शेतकऱ्यांनी स्वतःस कामे होतील, तेवढीच शेती पिकविण्याचे धोरण धरले आहे. त्याचा परिणाम उत्पादन कमी होण्यावर होऊ शकतो. याबरोबरच शेतीसाठी आवश्यक असणारे बियाणे, खते घेण्याचेही शेतकरी टाळणार आहे. त्यामुळे उत्पादन घट झाल्यास अन्न-धान्यावर त्याचा परिणाम होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख