दिल्लीत कसं घडलं, कुणी बिघडवलं ! एक गमावला, अजून किती बळी घेणार - How it happened in Delhi, who spoiled it! One lost, how many more victims | Politics Marathi News - Sarkarnama

दिल्लीत कसं घडलं, कुणी बिघडवलं ! एक गमावला, अजून किती बळी घेणार

मुरलीधर कराळे
मंगळवार, 26 जानेवारी 2021

दिल्लीत आंदोलन वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा तत्सम नेते मात्र आज दिवसभर काहीच बोलत नाहीत. दिवसभर शेतकऱ्यांचे डोळे माध्यमांकडे लागले. तेथील इंटरनेट सेवा बंद केली.

नगर : प्रजासत्ताक दिन देशभर आनंदात साजरा केला जात असताना आज भारताची राजधानी दिल्ली मात्र हादरली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केले. ठरल्याप्रमाणे आंदोलन झालेच नाही. जीवावर उदार होऊन आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीवर चाल केली. मोठा पोलिस बंदोबस्त झुगारून लाल किल्ल्यावर झेंडा फडकविला. हे करीत असताना मात्र एका शेतकऱ्याचा बळी गेला. हे कसं घडलं. शांततेच्या मार्गाने होणारे आंदोलन हिंसक कसे झाले. शांतीच्या मार्गात कोणी खडा टाकला, हा आता संशोधनाचा विषय ठरावा.

दिल्लीत आंदोलन आक्रमक होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा तत्सम नेते मात्र आज दिवसभर काहीच बोलत नाहीत. दिवसभर शेतकऱ्यांचे डोळे माध्यमांकडे लागले. तेथील इंटरनेट सेवा बंद केली. आज संध्याकाळी उशिरा गृहमंत्री अमित शहांच्या घरी बैठकिचा फार्स केला, इकडे शेतकरी मरतोय. त्याकडे लक्ष देणार की नाही. केवळ पोलिस बळ वाढवून सरकारला अजून बळी घ्यायचेत की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

केंद्र सरकारने नवीन कायदे केल्यानंतर या कायद्याला शेतकऱ्यांनी विरोध केला. भाजप सरकारने हा कायदा शेतकऱ्यांसाठी चांगला असल्याचे सांगून तो बहुमतावर संमत केला. परंतु त्याला देशभरातील शेतकऱ्यांनी विरोध केला. हा कायदा म्हणजे व्यापारी, मोठे उद्योजक विशेषतः अंबानी, अदानी आदींसाठी फायदेशीर असून, तो उद्योजक धार्जिना आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्याच शेतीत मजुरासारखे काम करावे लागेल, आपल्या मनाप्रमाणे पिक घेता येणार नाही, अशी भावना शेतकऱ्यांची झाली आहे. असे असले, तरी केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार या कायद्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल. करार शेती वाढेल. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मात्र या कायद्याला तीव्र विरोध झाला. महाविकास आघाडी सरकारने हे कायदे मान्य केले नाहीत.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाप्रश्नी दिल्लीत 5 डिसेंबर 2020 रोजी झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली. या कायद्याविरोधात हरियाणा, पंजाबमधील शेतकऱ्यांनी हल्लाबोल केला. दिल्लीत आंदोलन छेडले. त्याला देशभरातील शेतकऱ्यांनी साथ दिली. त्याला समर्थन देत प्रत्येक राज्यात आंदोलने झाले.

आज आंदोलनाचा कळस

गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा प्रजासत्ताकदिनी कळस झाला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टररॅली दिल्लीत धडकली. हजारो ट्रॅक्टर दिल्लीत धडकले. पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गावरून ही रॅली जाणार होती, तथापि, शेतकऱ्यांनीही विचार केला नसेल, एव्हढा प्रतिसाद मिळाला. देशभरातून शेतकरी दाखल झाले. नियोजन केल्यापेक्षाही जास्त शेतकरी आले. पोलिसांचे नियोजन कोलमडले. सर्व मार्गावरील बॅरिकेटस तोडले गेले. पोलिसांनी लाठिचार्ज केला. अश्रूधुराचे नळकांडे फोडले. गोळीबारही झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. त्यात एका पोलिसाला जीव गमवावा लागला. पेटून उठलेल्या शेतकऱ्यांनी बस, इतर वाहनांवर चाल केली. पोलिस गाडीही फोडली. पोलिसांवरही हल्ले झाले. हातात तलवारी घेतलेले शेतकरी दिसून लागले. त्यामुळे पोलिसांचेही धाबे दणाणले. सायंकाळी उशिरा अधिक पोलिस कुमक मागवून आंदोलन फोडून काढण्याचा प्रयत्न झाला.लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांनी झेंडा फडकावून आंदोलन शेतकऱ्यांनीच हाती घेतल्याचे दाखवून दिले. पोलिस प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले.

बैठकांचा फार्स

सायंकाळी उशिरा नेत्यांचा बैठकिचा फार्स सुरू झाला. परंतु ठोस निर्णय उशिरापर्यंत दिला जात नव्हता. अभिनेत्री कंगना रनावतनेही वादग्रस्त वक्तव्य करून या आंदोलनाच्या बातम्यांत अधिक तेल ओतले. इतर नेते मात्र शांत राहिले. प्रतिक्रिया देण्याच्या भानगडीत कोणीही पडलेले दिसले नाही. दिल्लीत रात्रभर थंडीचा कडाका वाढत चालला आहे. हे आंदोलन आता रात्रीतून काय रुप धारण करणार, हे ती रात्रच ठरविणार आहे.

शांततेचा मार्ग मग बिघडलं कसं

हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला होता. मात्र त्याला हिंसक रुप आले. काही घुसखोरांनी हे आंदोलन बिघडवल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. हे घुसखोर कोण, त्याला राजकीय झालर आहे का, आंदोलनात राडा करून कोणाला काही वेगळेच करायचे काय, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख