हॅलो नगरकर ! मी `सीनामाई` बोलतेय, माझं थोडं ऐका ना ! - Hello Nagarkar! I'm talking about 'Cinamai', don't listen to me! | Politics Marathi News - Sarkarnama

हॅलो नगरकर ! मी `सीनामाई` बोलतेय, माझं थोडं ऐका ना !

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 26 जून 2020

माझं नाव सीना. सीना नदी म्हणतात मला. नगर शहरातून वाहत जाणारी मी सर्वांच्याच परिचित आहे. माझ्या नावामागं एक सुंदर अख्यायिका आहे बरं का. एकदा काय झालं...

नगर : हॅलो नगरकर ! मी सीनामाई बोलतेय. ऐका ना, मी काय म्हणते, पुढाऱ्यांचं नाही माझ्याकडं लक्ष, पण तुम्हीतरी मला दुर्लक्षित करू नका. मी तुमच्यावर खरोखर प्रेम करतेय, पण तुम्ही मला का तुसुड्यासारखं करताय. माझं पाणी शुद्ध, पण तुम्हीच अशुद्ध करून माझी बदनामी करताय. या चिखलफेकीतून मला बाहेर काढा ना, नगरकर माझं थोडं ऐका ना !

तुम्हाला फोन करण्याचं कारण, की आता पावसाळा आलाय. म्हणून म्हटलं, काही गोष्टी तुमच्याशी `शेअर` कराव्यात. त्यातील आजची गोष्ट खूपच `इंटरेस्टिंग` आहे बरं का. नगर शहराच्या पुर्वेला गर्भगिरीची डोंगररांग आहे. खूप सुंदर आहेत ते डोंगर. आैषधी वनस्पतींनी ओतप्रोत झालेल्या डोंगरात नाथ सांप्रदाय राहिला. वाढला. फुलला. याच डोंगरावर गोरक्षनाथ अनेक दिवस राहिले. कानिफनाथांनी समाधी घेतलेली मढी हे स्थळ याच गर्भगिरीत आहे. जालिंदरनाथांची समाधी असलेली येवलवाडी, मच्छिंद्रनाथांची समाधी असलेला मायंबा गड, तारकेश्वरगड याच डोंगरात स्थित आहे. गहिनीनाथांचे स्थान याच परिसरात आहे. एव्हढेच नव्हे, सर्व जगताची माय असलेली माता मोहटादेवीचे स्थान मोहटादेवी म्हणून याच डोंगरात स्थित आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पहिली ओवी याच डोंगरात वृद्धेश्वर येथे लिहिली बरं का. सितामाईचे डोंगरगण, काळ भैरवनाथांचे आगडगाव, अजून काय काय सांगू. सांगण्यासारखं खुप आहे. इतिहासकाळात भातोडीची लढाई याच डोंगरात झाली. शहाजीराजांचे बंधू शरीफजी याच डोंगरात धारातीर्थ पडले होते. राज्यात प्रसिद्ध असलेला चांदबिबीचा महाल या अष्टकोनी इमारतीचा महिमा सांगावा तरी किती. या डोंगरात अनेक दुर्मिळ आैषधी वनस्पती आहेत. या औषधी वनस्पतींचा अर्क या डोंगरातील पाण्यात उतरतो. त्यामुळेच इंग्रजांनी कापूरवाडी येथे बांधलेल्या तलावातील पाणी म्हणजे अनेक दुःख हरण करणारे अमृत असल्याचे एका ग्रंथात म्हटले आहे. या पाण्याने आंधोळ केल्यास अनेक व्याधी बऱ्या होतात, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्या काळात इंग्रज लोक या तलावात स्नान आवर्जुन करायचे. हे सर्व सांगण्याचे कारण की माझा जन्म याच पवित्र अशा गर्भगिरी या देवभूमित झालाय. कोणालाही जन्मभूमीचा आदर असतोच ना, तसा मलाही आहे.

नगर शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर जेऊर, ससेवाडी हे गाव आहे. ससेवाडी आणि आगडगाव या दोन गावांच्या मध्ये भव्य डोंगर आहेत. त्या डोंगरात सीनाशंकर म्हणून प्रसिद्ध स्थान आहे. समुद्रसपाटीपासून या भागाची उंची 300 मीटर म्हणजेच 980 फूट आहे. तेथे महादेवाची पिंड, गोमुख आहे. या गोमुखातून येणारे पाणी म्हणजेच तेथेच माझा उगम आहे. चोहूबाजुंनी निसर्गसाैंदर्याने नटलेला परिसर, भव्य डोंगरातील निर्झर, सुंदर मंदिर, विविध आैषधी वनस्पतींनी ओतप्रोत भरलेले या डोंगरातील कसदार, काळीभोर माती माझ्या पाण्यात मिश्रीत होते. औषधी वनस्पतींचे औषधी अर्क माझ्या पाण्यात असतात. हे शुद्ध पाणी ससेवाडीतून शेंडी गावामार्गे नगर शहरातून जाते. म्हणजे माझा उगम सीनाशंकर येथून होऊन नगर शहरातून मी वाहत जाते. पुढे नगर जिल्ह्यासह उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्याची शेती फुलविते. माझी लांबी तब्बल 55 किलोमीटरची आहे बरं का. माझ्या अंगाखांद्यावर खेळणारे शेतकरी म्हणजे माझे मुलं, मला खूप आवडतात. 

माझं नाव सीना. सीना नदी म्हणतात मला. नगर शहरातून वाहत जाणारी मी सर्वांच्याच परिचित आहे. माझ्या नावामागं एक सुंदर अख्यायिका आहे बरं का. एकदा काय झालं, रामायणाच्या काळात श्री प्रभुरामचंद्र, लक्ष्मण, माता सीता या भागातून जात होते. डोंगरगण परिसरात सीता थांबली, तेथे सितेची न्हाणी आजही प्रसिद्ध आहे. रामेश्वराच्या मंदिराजवळ हे स्थान आहे. राम-सीता- लक्ष्मणाच्या येथे मूर्ती आहेत. मी येथून जवळच म्हणजे अवघ्या पाच-दहा किलोमीटर अंतरावर वाहते. तर मी सांगत होते, माझ्या नावाची अख्यायिका. रामायण काळात श्री प्रभुरामचंद्र वसवासात असताना मी वाहत असलेल्या ठिकाणावर आले. चालून खूप दमले होते. पाय चिखलाने भरले होते. माझ्या पाण्याने आपले हात-पाय स्वच्छ धुतल्यावर त्यांचा सीन हलका झाला. त्यांना खूप बरं वाटलं. तेव्हा ते म्हणाले, खूप चाललो, आता सीन गेला. तेव्हापासून माझं नामकरण झालं सीना. सीना नदी. आहे की नाही माझ्या नावात गंमत. माझ्या तिरावर नगर शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर दहिगाव आहे. या ठिकाणी श्रीरामाचं पुरातन मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असून, ते अहल्यादेवी होळकर यांनी बांधलेले आहे. ते 900 वर्षांपूर्वीचे आहे, असा ऐतिहासिक पुरावाही आहे बरं का. उगीच नाही फुशारकी मारीत मी.

माझ्याविषयी आणखी सखोल माहिती सांगते, भीमा नदी सर्वांना परिचित आहे. तिची लांबी 375 किलोमीटर आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून उगम पावणाऱ्या या नदीचे तीन शीर्षप्रवाह मानले जातात. पहिला म्हणजे नगर शहराच्या पश्चिमेस असलेल्या पारनेर तालुक्यातील जामगावजवळ, दुसरा प्रवाह ईशान्येस पिंपळगाव उजणी व जेऊर येथून उगम पावतात. तिसरा प्रवाह म्हणजे ससेवाडीजवळील सीनाशंकर. या तिनही प्रवाहांचा एकत्रित मिलाफ म्हणजे मी सीना नदी. त्यापैकी सीनाशंकर हेच माझ्या जन्माचे स्थान मानले जाते. मी दक्षीण दिशेला वाहते. त्यामुळे मला दक्षिणवाहिनी असे म्हणतात. थोडे पुढे गेल्यानंतर मी अग्नेय दिशेने वाहते म्हणून मला अग्नेयवाहिनी म्हणतात. माझ्या एका बाजुचा तीर नगर जिल्ह्यात, तर दुसऱ्या बाजुचा तीर हा बीड जिल्ह्याचा असतो. असा सुमारे 55 कि. मी. ची नैसर्गिक हद्दच बनली आहे. नगर शहराजवळ मला खारा ओढा, भिंगार नाला, तुक्कड ओढा या लहान नद्या मिळतात. 

नगर जिल्ह्यातील चाैंडी हे गाव तुम्हाला माहितीच असेल. तिथं पुण्यश्लोक अहल्यादेवी यांचे मंदिर आहे. या ऐतिहासिक ठिकाणापासून मी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. या जिल्ह्यातील खांबेवाडी या गावापासून माझ्यामुळे सोलापूर-उस्मानाबाद जिल्ह्याची सरहद्द तयार झाली आहे. उस्मानाबादमधील परांडा तालु्क्यातून वाहताना सीना-कोळगाव हे धरण बांधण्यात आलंय. ते परांडा तालुक्यातील कोळगाव येथे आहे. मी ज्याभागातून वाहते, त्या भागात माझ्या तिरावर अनेक मंदिरे आहेत. डोमगाव (ता. परांडा) येथे रामदास स्वामी यांचे शिष्य कल्याण स्वामी यांची समाधी आहे. तेथे श्रीरामाचे प्राचीन मंदिर आहे. जवळच सोनारी हे गाव आहे. तेथे कालभैरवाचे प्राचीन मंदिर आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील म्हैसगावपासून माझा प्रवाह कर्नाटक राज्यात जातो. कर्नाटक राज्य आणि सोलापूर जिल्हा यांच्या सरहद्दीवर असलेल्या कुडल या गावाजवळ मी भीमा नदीस जावून मिळते. माझं पात्र उथळ आहे. त्यामुळे माझ्या पाण्याचा वेग खूप नसला, तरी माझ्या नादी कोणी लागायचं नाही. कारण माझा विस्तार प्रसंगी जास्त होतो. उन्हाळ्यात अनेकदा मी कोरडीच असते. 

माझीही एक उपनदी आहे बरं का. मेहेकरी असं तिचं नाव. बीड जिल्ह्यामध्ये सांगवीजवळ ती माझ्यात मिळते. त्यामुळे माझं शरीर अधिक जाडजुड होतं. या शिवाय तलवार, इंचाना, कामुही, भेंडी, नल्की, चांदणी आदी माझ्या लहान-लहान उपनद्या आहेत. त्या मला बळ देतात. सीना-निमगाव व सीना-कोळेगाव हे माझ्यावरील मोठे प्रकल्प आहेत. त्यामुळे परिसरातील शेती फुलते. सीना-कोळेगाव योजनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे 9300 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येते. माझ्या तिरावर ऐतिहासिक चोंडी (नगर जिल्हा), वडवळ, कुडल (सोलापूर जिल्हा), ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. नगर शहरात माझ्यावर इंग्रजांंनी बांधलेला लोखंडी पूल ऐतिहासिक ठेवा समजला जातो. नगरची आैद्योगिक वसाहत ते बुरुडगाव हा सुमारे 14 किलोमीटरचा पट्टा महानगर पालिका हद्दीत आहे. 

आज बस एव्हढंच. आज माझा इतिहास झाला, उद्या काय सांगते ते महत्त्वाचे आहे बरं का.
(पुर्वार्ध)
  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख