कोरोनाने जगण्याचा हा दिला मंत्र

हिरोशिमा, नागासाकी उद्‌ध्वस्त केल्यानंतरही ही शहरे नव्या जोमाने उभी राहिली आणि जगात सर्वांत आघाडीचे तंत्रज्ञान घेऊन बाहेर पडली. हीच स्थिती आता सर्व जगाची होईल.
Corona
Corona

नगर : स्वातंत्र्यानंतर भारतात हरितक्रांती झाल्याने शेती फुलली. दुग्धोत्पादन वाढले. मागील शतकाच्या उत्तरार्धात इंटरनेटने सर्वांना मोहजालात ओढून घेतले. एकविसाव्या शतकाच्या सुरवातीलाच मोबाईलक्रांती होऊन प्रत्येकाच्या घरातील तो सदस्य बनला. आता खूप प्रगती केली, या आविर्भावात असलेल्या माणसाला कोरोनाने जागेवर आणले. खरी गरज काय आहे, आपण काय करायला हवं, याचं आत्मपरीक्षण करायला लावलं. आता खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांतीचे पर्व सुरू झाले असे म्हणावे लागेल. "वर्क फ्रॉम होम', "सोशल डिस्टन्स', "होम क्वारंटाईन' या नवीन शब्दांनी प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. आगामी काळात या शब्दांना कवेत घेऊन पुढे चालावे लागणार आहे. हिरोशिमा, नागासाकी उद्‌ध्वस्त केल्यानंतरही ही शहरे नव्या जोमाने उभी राहिली आणि जगात सर्वांत आघाडीचे तंत्रज्ञान घेऊन बाहेर पडली. हीच स्थिती आता सर्व जगाची होईल. परिस्थितीशी लढून भरारी घेण्याचे ते बळ देईल. त्यामुळेच आता प्रत्येकाला कोरोनारूपी संकटाशी समरस होऊन जगावं लागणार आहे. रडत बसण्यापेक्षा उंच भरारी घेण्यासाठी पंख बळकट करावे लागणार आहेत. 

जपानचा आदर्श सर्वांना दिशादर्शक 
अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर 1945 मध्ये बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात 80 हजार नागरिकांचा बळी गेला. बॉम्बहल्ल्यातील उष्णतेने लोक अक्षरशः होरपळून गेले. गंभीर आजाराने ग्रासल्यानंतर आगामी काळात लवकरच सुमारे दीड लाख लोक मरण पावले. आधी हिरोशिमावर हल्ला झाल्यानंतर जपानने आत्मसमर्पण न केल्याने नागासाकी शहरावर बॉम्ब टाकून शहर उद्‌ध्वस्त करून टाकले. त्यामुळे जपानने हार पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. त्याचे परिणाम जगाने अनुभवले. तरीही ही शहरे, हा देश नव्या दमाने उभा राहिला. आपण अमेरिकेच्या पुढे जायचेच, हा ठाम निश्‍चय करून तंत्रज्ञानात जगात नंबर एकचा देश बनला. हाच आदर्श आगामी काळात भारतीयांनीही घ्यायला हवा. कोरोना ही एक झलक आहे. आगामी काळात यापेक्षाही मोठ्या "त्सुनामी' येऊ शकतात. कोणत्याही संकटात एकमेकांना बळ देणे, स्वतःच रक्षण स्वतःच करणे ही शिकवण कोरोनाने दिली. ही शिदोरी घेऊन सद्यःस्थितीशी लढायचं शिकायला पाहिजे. जपानचा आदर्श घेऊन जिद्द ठेवून भारतीयांनी पुढे येण्याची वेळ आता आली आहे. 

आता कोरोनासोबत जगायचं शिका 
अमेरिका, इटली या प्रगत राष्ट्रांना हतबल करणाऱ्या कोरोनाचं भारतात खूप काही चाललं नाही, असं म्हणावे लागेल. कारण भारतीयांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याचे अनेक उदाहरणांमुळे स्पष्ट झाले आहे. भारतीय संस्कृतीत निसर्गाशी समरस होऊन जगण्याला दिलेले महत्त्व, दगडाला, झाडाला, पाण्याला आणि एकूणच निसर्गाला देव मानण्याच्या भूमिकेमुळे भारतात निसर्गाचे रक्षण होते आहे. हीच जमेची बाजू ठरली आहे. तरीही आगामी काळात कोरोना नष्ट होईलही, परंतु अशा परिस्थितीशी जगायचं शिकावं लागेल. आता कोरोना आहे, आगामी काळात अजून एखादा मोठा व्हायरस येऊ शकेल. त्याच्याशी सामना करण्याची रंगीत तालीम कोरोनाने करून दिली आहे, असे समजून कोरोनाशी जगायचं शिकलं पाहिजे. 

पाण्यात पडलात, आता पोहावेच लागेल 
कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. व्यवसाय बंद पडले आहेत. आगामी काळात ते तितक्‍या क्षमतेने सुरू होतील, याची शाश्वती नाही. नोकरीहून घरी आलेला नोकरदार, पुन्हा त्याला नोकरी मिळेल, याची शक्‍यता सध्या तरी नाही. काहीही झाले, तरी प्रत्येकाला जगावेच लागेल. आपले कुटुंब जगवावेच लागेल. या भूमिकेतून मिळेल ते काम करावे लागेल. आता पाण्यात पडलाच आहात, तर जगण्यासाठी हात-पाय हलवावे लागतील. त्यातूनच पोहायचे प्रशिक्षण आपोआप मिळेल. त्यामुळे धीर धरून प्रयत्न करा, त्यातूनच नवीन क्रांती येऊन प्रत्येक जण स्वावलंबी होऊ शकेल, अशी आशा आहे. कामाची लाज बाळगू नका. एकमेकांना हसू नका. मित्रांना, आप्तेष्टांना, गरिबांना आधार द्या. एकमेकांना या महामारीतून सावरण्यासाठी बळ द्या. आपल्यासोबत आपला समाज असेल, तरच आगामी काळात जगण्याला अर्थ आहे; अन्यथा दुजाभाव करून कुढत जगणे व्यर्थ आहे, हे लक्षात ठेवावे लागेल. 

डिजिटलायझेशनची कास धरा 
आगामी काळ डिजिटलायझेशनचाच असेल, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. शिक्षणक्षेत्रातही झपाट्याने बदल होणे अपेक्षित आहे. शाळा, विद्यार्थी, शिक्षक या संकल्पनेत आता डिजिटल तंत्रज्ञानाची उपकरणे आवश्‍यक असणार आहेत. विद्यार्थ्यांच्या वह्या-पुस्तकांच्या दप्तरात टॅबसारख्या उपकरणांची भर पडणार आहे. प्रत्येकाचा मोबाईल हा अनेक कामे करणारा रोबोट असणार आहे. तो एका नोकरासारखे आपले काम लीलया करेल. एका ठिकाणी बसून आठ तासांची नोकरी या संकल्पनेला छेद बसतो आहे. वेळेचे भान न ठेवता काम करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे आता डिजिटलायझेशनची कास धरा. आपल्याला हे जमत नाही, असे म्हणून चालणार नाही. घरातील लहान मुलांना डिजिटल तंत्रज्ञानाचे गुरू करा. ते सर्व शिकवतील. नावीन्याचा शोध घेण्याचे बाळकडू त्यांना मिळालेले आहे. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्यातच या पिढीचे भले आहे. 

सुरक्षा, चांगले आरोग्य हीच संपत्ती 
पैसा हा घटक जगण्याला आवश्‍यक असला, तरी तो अंतिम सत्य नाही. माणसाची सुरक्षा, चांगले आरोग्य असणे, हीच संपत्ती खरी असल्याचे कोरोनाने दाखवून दिले. कोणत्याही मानवी हालअपेष्टांची वाटणी होणार नाही, तर त्यामध्ये सर्वांना होरपळावे लागेल, ही शिकवण कोरोनामुळे मिळाल्याने समाज सुरक्षित असण्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. राज्याची, देशाची संपत्ती किती मोठी आहे, यापेक्षा नागरिकांचे आरोग्य कसे आहे, कार्यक्षमता किती आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. तीच परिस्थिती प्रत्येक कुटुंबाची असणार आहे. औषधोपचारांवर होणारा खर्च आगामी काळात आरोग्य चांगले ठेवण्यावर होण्यासाठी माणूस विचार करेल, यात शंका नाही. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com