सिझन गेला, पुढे काय? कलाकारांपुढे चमकतात `तारे`

या कलाकारांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे. कलेच्या माध्यमातून `प्रतिष्ठित` झालेल्या या मंडळींना कोणापुढे हातही पसरता येईनात. संपूर्ण सिझन गेला, आता पुढील महिने संसार कसा जगवायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.
gondhali
gondhali

नगर : लाॅकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्राप्रमाणे कला क्षेत्रावरही झाला आहे. गोंधळी, वाघ्या मुरळी, बॅण्ड पथक, संगीत जलसा, भारुड, सोंगी असे पच्छिम महाराष्ट्रात सुमारे 50 हजार कलाकार उपासमारीच्या गर्तेत आहेत. मुख्यमंत्र्यांशी विनवणी करूनही त्याचा उपयोग झाला नाही. विशेष म्हणजे गेल्या गेल्या तीन महिन्यांपासून कलाकारांचे मानधनही सरकारने दिले नाही. ज्येष्ठ कलावंत चातकाप्रमाणे या तोडक्या मानधनाची वाट पाहत आहेत. चित्रपट कलावंत, बॅक स्टेज आर्टिस्ट यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आता या कलाकारांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे. कलेच्या माध्यमातून `प्रतिष्ठित` झालेल्या या मंडळींना कोणापुढे हातही पसरता येईनात. संपूर्ण सिझन गेला, आता पुढील महिने संसार कसा जगवायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.

मराठी चित्रपट कलावंत, संगीतबारी, लावणी नृत्य कलावंत, पडद्या मागील कलावंत (बॅक स्टेज आर्टीस्ट) राज्यातील नाथपंथी, भराडी, गोंधळी, तमाशावाले, नाटककार बहुरूपी, वादक, शाहीर, तबला वादक या सर्वांचे हातावरचे पोट आहे. या कलाकारांकडून नेहमी कला सादर केली जात आहे. पंरतु आजच्या या घडीला एका चित्रपटात तसेच एका तमाशा फडात 100 ते 150 कलाकार काम करत असतात. यातुनच त्यांच्या संसाराचा गाडा हाकला जातो. मात्र कोरोना पुढे हे चित्रपट, तमाशा कलावंत हतबल झाले आहेत. जगायचं कसं, असा थेट सवाल यानिमित्ताने हे कलाकार उपस्थित करीत आहेत.

बँड, संगीत, वादन पथक तसेच ऑर्केस्ट्राचे कलाकार हे या कलेच्या आधारे स्वतःच्या कुटुंबाचा उदरनर्वाह करतात. उन्हाळा आला की कलावंत खुश होतात, कारण त्यांचा सुगीचा काळ असतो. उन्हाळ्यात चित्रपटांच्या शूटिंग, लग्न समारंभ, उरूस, जत्रा, वेगवेगळे कार्यक्रम आणि अशा कार्यक्रमांना बँड, तमाशा, लोककलावंतच्या कला यांचे कार्यक्रम असायचे, परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ऐन हंगामाच्या काळात कोरोना विषाणुमुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे या कलाकारांनाच्या हातालाही काम राहिले नाही .त्यामुळे पैसे मिळत नाहीत. या कलाकार व लोककलावंतवर व कला पथकावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

दशावतार कंपन्या अडचणीत
कोरोना या महामारी सदृश्य आपत्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्रसह सिंधुदुर्ग कोकणात विशेषतः गोव्यात होणारे कोकणातील दशावतार प्रयोग थांबले आहेत. मेअखेर चार हजार दशावतार प्रयोग सर्वच दशावतार कंपन्यांनी थांबवल्यामुळे सुमारे पाच हजार दशावतार कलाकार आर्थिक संकटात सापडले आहेत. एका कलाकारावर त्याचे कुटुंब अवलंबून असते. दशावतार कंपनीमध्ये काम करणारे कलाकार हे नाट्य प्रयोगाच्या मानधनावर आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. चित्रपट, मालिकांचं चित्रिकरण थांबल्यामुळे तसंच चित्रपट प्रदर्शित होत नसल्यामुळे बॅकस्टेज कलाकार, स्पॉटबॉय, तंत्रज्ञ खर्‍या अर्थाने अडचणीत सापडले आहेत. सर्वच कलाकार त्यांना मदतीचा हात देण्याच्या प्रयत्नात आहेत. पण तो प्रत्येक गरजू कलाकार पर्यंत जाताना दिसत नाही.

फिल्म इंडस्ट्रीला फटका
फिल्म, टिव्ही इंडस्ट्रीला देखील याचा फटका बसला आहे. चित्रीकरणाची कामे रखडल्याने या इंडस्ट्रीवर विसंबून असलेले कलाकार आणि कामगारांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर इंडियन ब्रॉडकास्टर्स फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शुक्रवार २२ मे रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा देखील केली आहे. यामध्ये मोठे काही कलाकार तंत्रज्ञ सोडता अनेकजन ग्रामीण भागातील आहेत, परंतु ते ही आज गावाकडे आल्याने आणि हे काम ग्रुपचे असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळून किंवा वर्क टू होम कसे होणार, हा प्रश्न आहे. अनेक संघटना व मंडळामध्ये ही हेवेदावे असल्याने गरजवंत या मदतीपासून वंचित राहिला नको, ही सुद्धा खबरदारी घेणे गरजेचे आहे. 

मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष

ग्रामीण भागातील लोककलावंतांची अनेक मंडळे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील या हजारो कलाकारांना लगेच उत्पन्न देईल, असा रोजगार आज आणि येणाऱ्या वर्षभरात उपलब्ध होईल, याची शाश्वती नाही. आजपर्यंत कलाकारांनी कला सादर करूनच अर्थिक मदत घेतली आहे. एवढेच नव्हे, तर अनेक संकटसमयी कलेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य जमा करून शासनाला दिले आहे. पंरतु आजच्या या परिस्थितीत हे सर्व मार्ग बंद झाले आहेत आणि म्हणूनच सरकारने या कलाकारांवरील आर्थिक संकटाचा विचार करून अर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ' महाराष्ट्रतील लोककला व लोककलावंत संवर्धन चळवळीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

त्यांना मदतीची गरज ः नेटके

कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर शुटिंग बंद झाल्या आहेत. त्यामुळे कलाकारासोबतच बॅक स्टेज आर्टिस्ट, कॅमेरामन, एडिटर यांना रोजार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. सध्या मराठी चित्रपट सृष्टीत काम करताना खूप मानधन मिळत नाही. केवळ लोकांपर्यंत जाण्याच्या उद्देशाने अनेक कलावंत काम करीत आहेत. सध्या मात्र त्यांच्या रोजीरोटीचाच प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे सगळंच बंद झालंय. जगणं बंद होण्यापूर्वी सरकारनं या कलावंताच्या कलेची कदर करुन मदतीचा हात पुढे करावा. अशी मागणी 'महाराष्ट्र लोककला व लोककलावंत संवर्धन चळवळीचे' प्रणेते अभिनेते प्रशांत नेटके यांनी केली आहे. 
 

ज्येष्ठ कलावंतांना मृत्यूनंतर मानधन देणार का ः उडाणशिवे

ज्येष्ठ कलाकारांना सरकार महिन्याला सुमारे दोन हजारांपर्यंत मानधन देते. तेही वेळेत मिळत नाही. गेल्या तीन महिन्यांपासून तर काहीच मिळाले नाही. ज्येष्ठांना काळजी घेण्याचे सांगणाऱ्या सरकारने ज्येष्ठ कलाकारांची उपेक्षाच केली आहे. वेगळी मदत मिळणे तर सोडाच परंतु मागील तीन महिन्यांचेही मानधन दिले नाही. ज्येष्ठ कलाकार हे सत्तरी ओलांडलेले आहेत. माणसाचा क्षणाचा भरवसा नसताना मृत्यूनंतर सरकार मदत देणार का, असा सवाल महाराष्ट्र राज्य शाहीर परिषदेचेे जिल्हाध्यक्ष तथा पोतराज वाजंत्री संघटनेचे संस्थापक भाऊसाहेब उडाणशिवेे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com