राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश - rajwardhan patil joins politics through cooperation | Politics Marathi News - Sarkarnama

राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश

डाॅ. संदेश शहा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता या जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून निवडून आल्या आहेत. त्या पाठोपाठ आता त्यांचे चिरंजीवही कारखान्याच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करीत आहेत. 

इंदापूर : भाजपा नेते तसेच माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव युवानेते राजवर्धन पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय प्रवेश केला.

तालुक्यातील शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदासाठी त्यांनी शुक्रवारी (10 जानेवारी) आपला उमेदवारी अर्ज बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे  दाखल केला. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज हे हर्षवर्धन पाटील यांच्या पॅनलचे असल्याने ही  निवडणूक बिनविरोध होणार असून, कारखाना संचालक मंडळ तसेच राजवर्धन पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवडून आल्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

हर्षवर्धन पाटील हे निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक असून कारखान्याची स्थापनेपासून गेली 20 वर्षे संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध होत आहे.  राजवर्धन पाटील हे उच्च शिक्षित असून त्यांनी लंडन येथे पदवी घेतलेली आहे.

कारखान्याच्या सन 2020 ते 2025 च्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी 21 जागांसाठी एकुण 22 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचाही उमेदवारी अर्ज भरलेल्यामध्ये समावेश आहे. सोमवारी( दि.13) रोजी उमेदवारी अर्जांची छाननी आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी बावडा उत्पादक गट तसेच उत्पादक सहकारी संस्था/ बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था मतदार संघातून अर्ज दाखल केला आहे. सुजाता गायकवाड ( अनुसूचित जाती जमाती ), राजवर्धन पाटील, प्रतापराव पाटील, उदयसिंह पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, मच्छीन्द्र वीर, दत्तात्रय शिर्के, लालासो पवार, कृष्णाजी यादव, बबनराव देवकर, भागवत गोरे, दत्तू सवासे( सर्व उत्पादक गट ), उदयसिंह पाटील ( उत्पादक सहकारी संस्था/ बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था ), चंद्रकांत भोसले ( अनुसूचित जाती जमाती ), संगीता पोळ व जबीन जमादार ( महिला ), कांतीलाल झगडे ( इतर मागासवर्गीय ) तसेच विलास वाघमोडे ( भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग ) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख