rajur mahila | Sarkarnama

राजूरमध्ये प्रस्थापितांना सामान्य महिलेचा धक्का

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

जालनाः भाजपने राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दैदिप्यमान यश संपादन केले. पण निवडणुक प्रचारात अनेक आश्‍चर्यकारक घटना देखील घडल्या.

जालनाः भाजपने राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दैदिप्यमान यश संपादन केले. पण निवडणुक प्रचारात अनेक आश्‍चर्यकारक घटना देखील घडल्या.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातील राजूर गटातून भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वःता राजुरेश्‍वराला साकडे घालत पहिली सभा घेतली होती. मात्र ज्या राजूरात मुख्यमंत्र्यानी सभा घेऊन भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले होते, त्याच राजूर गटात भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागले. शिवसेनेच्या महिला उमेदवाराने या ठिकाणी भाजपसह राष्ट्रवादीला चीत केले. त्यामुळे हा पराभव दानवे आणि भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला.

नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होण्यापुर्वी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राजूरमध्येच राज्यातील भाजप जिल्हाध्यक्षांना स्कार्पिओ गाड्या भेट देत निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले होते. पंचक्रोशीत गणपतीचे जागृत देवस्थान म्हणून राजूर प्रसिध्द आहे. राजूर गटातून भाजपच्या देवलीला पुंगळे या रिंगणात होत्या.

दानवे यांच्या आदर्श ग्राम योजनेत समावेश असलेल्या राजूरमध्ये भाजपला हमखास विजय मिळणार असा विश्‍वास दानवे यांना होता. उमेदवाराला कसलीच कमतरता भासू नये याची पुरेपूर काळजी देखील भाजपकडून घेण्यात आली होती. या उलट शिवसेनेच्या उमेदवार शोभा पुंगळे या आर्थिक दृष्ट्या कुमकूवत होत्या. तरी देखील भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत करुन त्यांनी विजय मिळवला.

मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या राजूरमध्ये सभा झाल्या होत्या. शिवसेनेचे अर्जून खोतकर यांनी शोभा पुंगळे यांच्यासाठी राजूरमध्ये एकमेव सभा घेतली होती. प्रस्थापितांना धक्का देत सामान्य महिलेने मिळवलेल्या विजयाची या भागात चर्चा होत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख