raju shetty's son active in movement | Sarkarnama

मी राजू शेट्टींचा वारसदार म्हणून आलेलो नाही...!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 जानेवारी 2019

'तुम्ही उसासाठी लढता मग कांद्यासाठी का नाही?

पुणे: "राजू शेट्टी एकदाच होतो. मला काही राजू शेट्टी व्हायचे नाही. भविष्यात राजकारणात यायचा कसलाही विचार नाही मात्र साहेबांनी उभारलेल्या चळवळीत यावेसे वाटते,' असे खासदार राजू शेट्टी यांचे पुत्र सौरभ शेट्टी यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने २८ जानेवारीला एफआरपीसाठी पुण्याच्या साखर संकुलावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे म्हणून सौरभ शेट्टी यांनी पुण्यातील महाविद्यालयात जावून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले.

'तुम्हीही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात येणार का?' असं त्यांना विचारल्यावर ते म्हणाले,"मला राजू शेट्टी व्हायचं नाही, कारण ते होणं अवघड आहे. त्यासाठी कष्ट करावे लागतात. मला ते जमेल असं नाही. राजू शेट्टी एकच होऊ शकतात पुन्हा पुन्हा नाही. मला राजकारणात यायचं नाही पण साहेबांनी जो लढा उभारला आहे त्यात इतर घरातील तरुण सहभागी होतात तर मग मी का व्हायला नको. मी कधीही साहेबांचं नाव सांगून काही सवलती मिळवत नाही.  

मी त्यांना पप्पा म्हणत नाही, साहेब म्हणतो. त्यांनी माझ्यासाठी खूप कमी वेळ दिला आहे. आमच्यात एकदम कमी संवाद होतो. ते घरी असतात तेव्हा मी घरी नसतो आणि मी घरी गेल्यावर ते घरी नसतात. मी शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर असल्याने साहेबांचा सहवास कमी मिळतो. फोनवरून अभ्यासाची चौकशी करतात. मी आलोय ते त्यांचा वारसदार म्हणून नाही शेतकऱ्याचा मुलगा म्हणून, यात राजकारण नाही. या लढ्यात एक कार्यकर्ता म्हणून आलो आहे'.असे ते म्हणाले.

नाशिकच्या एका विद्यार्थ्यांने 'तुम्ही उसासाठी लढता मग कांद्यासाठी का नाही?'असं विचारलं त्यावर बोलताना शेट्टी म्हणाले,'पुण्यात शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाला हा प्रश्न पडतो ही मोठी गोष्ट आहे. कारण असा प्रश्न पडणारे तुम्ही आम्ही सगळे तरुण एकत्रित येण्याची गरज आहे.'

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख