raju shetty-satej patil meeting in kolhapur | Sarkarnama

'महाडिक हटाव'साठी राजू शेटटी- सतेज पाटील एकत्र!

सदानंद पाटील
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

अलिकडच्या काळात या दोन्ही नेत्यांत चांगलेच सुत जुळले आहे.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेटटी व कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यात अजिंक्‍यतारा येते गुफ्तगू झाली. सुमारे अर्धा तास झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील बदलती समिकरणे, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक या विषयावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयावर रेशन बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास खा. शेटटी, आमदार पाटील यांच्यासह खासदार धनंजय महाडिक आणि विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र मोर्चानंतर आमदार सतेज पाटील हे त्यांच्या अजिंक्‍यतारा कार्यालयावर पोहोचले. त्यांच्या पाठोपाठच काही वेळात खासदार शेटटी हे देखील अजिंक्‍यतारावर दाखल झाले. 

आमदार पाटील यांचा महाडिक यांना उघड विरोध आहे. तर खासदार शेटटी यांनी देखील महाडिकांविरोधात उघड भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच अलिकडच्या काळात या दोन्ही नेत्यांत चांगलेच सुत जुळले आहे. त्यांच्या आजच्या या भेटीमागे हातकणंगले तालुक्‍यासह कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाचे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत समावेश व्हावा, यासाठी आमदार सतेज पाटील यांचा आग्रह आहे. खा.शेटटी यांनीही आमदार पाटील यांच्याबाबतचे धोरण बदलले असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच ते आमदार पाटील यांच्या विविध कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. गोकुळच्या मल्टीस्टेट विरोधी लढाईत खा.शेटटी यांनी आमदार पाटील यांना पाठिंबा दिला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची भक्‍कम फळी आहे. याचा फायदा आमदार पाटील यांना आगामी निवडणुकीत होवू शकतो. याच अनुषंगाने या दोघांमध्ये गुफ्तगू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख