raju shetty sanjay raut blog | Sarkarnama

मंत्र्याना बदडून, गोळ्या घालून प्रश्‍न सुटतील का ? 

प्रकाश पाटील 
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

एकीकडे स्वाभिमानी नेते मंत्र्यांना बदडून काढण्याची तर दुसरीकडे संजय राऊत यांच्यासारखे नेते खूनाची भाषा करीत आहेत. शेतकरी प्रश्‍नांवर राज्यात आतापर्यंत हजारो आंदोलने झाली. शेकडो शेतकऱ्यांनी रक्त सांडले आहे. पण, कोणत्याही मंत्र्याला शेतकरी नेत्यांनी बदडून काढलेले ऐकिवात नाही. मंत्र्यांना बदडून, खून करून प्रश्‍न कायमचे सुटतील का ? याचे उत्तर लोकप्रतिनिधी असलेल्या या दोघांनी द्यायला हवे.

अवनी वाघिनीच्या मुद्यावरून शिवसेना अधिकच डरकाळ्या फोडत आहेत. तर दुसरीकडे ऊसदर प्रश्‍नावरून राजू शेट्टीही मंत्र्यांना बदडून काढण्याची भाषा केली. पुढील वर्षभर आता अशीच अराजकतेची भाषा किंवा शिवराळ शब्द कानावर पडतील. शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटलेच पाहिजेत. मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा देणे एकवेळ समजून घेता येईल. पण,मंत्र्यांना बदडून काढू ही जी दंडेलशाहीची भाषा ते करीत आहेत ती निश्‍चितपणे समर्थनीय नाही. 

शेतकरी संकटात सापडला आहे. दुष्काळी घरांमध्ये ना दिवा ना पंती. दुष्काळात गरीबांची राखरांगोळी झाली. दुष्काळ ग्रामीण महाराष्ट्राच्या जीवावर उठलाय. अस्मानी-सुल्तानी संकटे त्याची पाट सोडत नाही. कर्जमाफी देऊन पाच-सहा महिने होत नाही तोवर राज्यात अनेक तालुक्‍यात भीषण दुष्काळ पडला. आणखी आठनऊ महिने कसे काढायचे या चिंतेत तो आहे. काही केलेतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाही. पाण्यासाठी तर आतापासूनच वणवण सुरू आहे. जनावरांना चारा नाही, पाणी नाही. पिकाला भाव नाही. कस जगायचं तरी कसं शेतकऱ्यांनी ? बॅंका गरीबांना नाडतात. "जगाव की मराव' हा एकमेव प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे आहे. अशावेळी शेट्टींसारखा नेता स्वस्थ बसूच शकत. सरकारला धारेवर धरायची एकही संधी ते सोडत नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी ते नेहमीच आपला आवाज बुलंद करतात. 

हे अगदी खरे असले तरी टोकाची भाषा करण्याचे काही कारणही नाही. शेवटी राज्याला कोणीतरी मायबाप लागतोच. मंत्री लागणार. राज्यात काल कॉंग्रेसची सत्ता होतीे आज भाजपची आहे. कोणतेही सरकार येऊ द्या शेतकऱ्यांचे प्रश्‍न कधी धसास लागणार नाहीत. हे वास्तव असले तरी केवळ सवंग लोकप्रियतेसाठी मंत्र्यांना बदडून काढण्याची भाषा शेट्टींसारख्या सुसंस्कृत नेत्याच्या तोंडी शोभून दिसत नाही. मग शिवसेनेचे संजय राऊत आणि तुमच्यात फरक तरी तो काय ? शेतकऱ्यांसाठी हे सरकार काहीच करीत नाही अशी भावना शेट्टी यांची झाली आहे. खरेतर शेतीचे काही खरी राहिले नाही. संकटे शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजली आहेत की काय ? असा प्रश्‍न सातत्याने पडतो आहे. परिस्थिती भयावह असली तरी सरकारशी चर्चा करावीच लागेल. परिस्थितीची जाणीव करून द्यावी लागेल. वेळप्रसंगी आंदोलने उभारावी लागतील. 

तुमच्यासोबत वर्षानुवर्षे खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांसाठी लढलेले सदाभाऊ सरकारमध्ये बसले आहेत. प्रथम त्यांना गावबंदी करून दाखविण्याची हिम्मत शेट्टींनी दाखवावी. त्यानंतरच इतर मंत्र्यांना बदडण्याची भाषा करावी. मंत्र्यांना हात उचलल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. उलट शेतकऱ्यांची माथी भडकावून काहीच साध्य होणार नाही. उद्या तसे कुठे दुर्दैवाने घडले तर शेतकऱ्यांचाच बळी जाईल. मंत्री काय कडेकोट पोलिस बंदोबस्तात फिरतील. 

एकीकडे मंत्र्यांना बदडण्याची भाषा शेट्टीसारखे नेते करीत आहेत तर दुसरीकडे शिवसेचे संजय राऊत हे अवनी वाघिनप्रकरणावरून भाजपला टार्गेट करीत आहेत. तेही मंत्र्याना गोळ्या घालण्याची भाषा करतात. खरेतर राऊत यांची शिवसेना भाजपच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसली आहे. सरकारमध्ये बसून तुम्ही काय करता आहात ? असले प्रश्‍न त्यांना कोणी विचारायचे नाहीत. भाजपचे मंत्री काहीच काम करीत नाही आणि शिवसेनेचे मंत्री खूप भव्यदिव्य कामगिरी करीत आहेत का ? 

आज भाजपचे सरकार आहे. यापूर्वी शिवसेनेचा मुख्यमंत्री होताच ना ! सिंहावलोकन केल्यास शिवसेनेच्या राजवटीत कसा धुमाकुळ घातलण्यात आला होता हे लोक आजही विसरले नाहीत. पत्रकारांवर हल्ले, छगन भुजबळांवर झालेला हल्ला हे कसे विसरता येईल. कोणतेही सरकार असू द्या त्या सरकारविरोधात असंतोष हा खदखदत असतो.अवनीप्रकरण असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्‍न यावर सरकारवर टीका करण्याचा अधिकार विरोधकांना निश्‍चितपणे आहे. पण, अराजकाची भाषा का करायची ?वास्तविक शेट्टी-राऊत हे दोघेही संसदेचे सदस्य आहेत. लोकप्रतिनिधी आहेत. सरकार म्हणजे काय असते हे दोघानाही माहित आहे. सभागृह हे लोकप्रश्‍नांचा वाचा फोडण्याचे पवित्र मंदिर आहे. तेथे सरकारचे लक्ष वेधून घेता येते. सभागृहाबाहेरही सरकारवर टीका करण्याचा अधिकार त्यांना आहे म्हणून खूनाची भाषा करावी का ? 

मुळातच समाजातील सर्वच घटकात असंतोष खदखदत असताना त्यामध्ये तेल ओतण्याचे पाप जबाबदार नेत्यांनी करू नये इतकीच अपेक्षा. नुसती टीका करण्यापेक्षा मार्गही शोधण्याचा प्रयत्न व्हायला हवा तरच टीकेला महत्त्व राहणार आहे. केवळ शिवराळ, दंडेलेची किंवा विध्वंसाची भाषा केल्याने कोणतेत प्रश्‍न कधीच सुटणार नाही. नेत्यांनी थोडा विवेक आणि संयम बाळगावा हीच अपेक्षा. 

 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख